अमरावती Volleyball Craze in Melghat : सातपुडा पर्वतनं वेढलेल्या मेळघाटच्या जंगलात दुर्गम आणि अती दुर्गम गावात गेलं, तर त्या ठिकाणी व्हॉलिबलची नेट ही लागलेली दिसतेच. व्हॉलिबॉल हा मेळघाटातील आदिवासी तरुणांचा सर्वात प्रिय खेळ असून व्हॉलिबॉल हा खेळ आता मेळघाटची ओळख बनलाय. व्हॉलिबल खेळाच्या माध्यमातून आदिवासी युवकांना नोकरीची संधी मिळाल्याचे अनेक उदाहरणं आहेत. मेळघाटतील आदिवासी युवकांमध्ये व्हॉलिबॉल खेळाबाबत असणाऱ्या प्रेमासंदर्भात 'ईटीव्ही भारत'चा हा स्पेशल रिपोर्ट.

प्रत्येक गावात व्हॉलिबलचं वेड : अमरावती जिल्ह्यातील चिखलदरा आणि धारणी या दोन तालुक्यात विस्तारलेल्या मेळघाटात तीनशेपेक्षा अधिक गावं आहेत. यापैकी अनेक गावं खोल दरीत आहेत तर काही गावं ही पहाडाच्या उंच टोकावर वसली आहेत. प्रत्येक गावात वेगवेगळ्या अडचणी समस्या असताना या सगळ्या गावात व्हॉलिबॉल हा खेळ मात्र अतिशय लोकप्रिय आल्याचं आढळतं. अतिशय नीटनेटकं स्वच्छ अशा ठिकाणी प्रत्येक गावात व्हॉलिबलची नेट लावून सकाळी आणि रात्री व्हॉलीबॉल खेळणारी मुलं दिसतात. आपल्या जवळ जशी दुचाकी असावी असा अट्टाहास असतो तसंच मेळघाटातील युवकांचं स्वप्न तितकंच किंव्हा त्यापेक्षा अधिक वेड हे व्हॉलिबॉल खेळबाबत असल्याचं जाणवतं.

व्हॉलिबॉल खेळाची संपूर्ण माहिती : आपल्या गावात सगळ्यात जास्त काय प्रिय असा प्रश्न माध्यमिक शाळेतील मुलांपासून पंचवीस तीस वर्षाच्या युवकांपर्यंत कोणालाही विचारलं तर त्याचं उत्तर व्हॉलिबॉल खेळण्याची जी मजा आहे त्यापेक्षा गावात दुसरं काहीही प्रिय नाही असंच मिळतं. जंगलानं वेढलेल्या गावात एखाद्या विद्यार्थ्याला शिक्षणातही फारशी माहिती नसेल मात्र व्हॉलिबॉल हा खेळ कसा खेळायचा, त्या खेळाचे काय नियम हे अगदी तोंडपाठ.
गावात सायंकाळी रंगतो खेळ : मेळघाटातील गावातले रहिवासी युवक दिवसभर शेतीत किंव्हा इतर ठिकाणी कामाला जातात. दिवसभर काम केल्यावर सायंकाळी घरी आल्यावर सलग दोन तास व्हॉलिबॉल खेळणं हा या भागातील युवकांचा नित्यनियायम झालाय. गावात असणारे वनकर्मचारी, शाळेचे शिक्षक या खेळात सहभागी होतात. सायंकाळ झाली की व्हॉलिबलचा खेळ गावात रंगतो अशी माहिती सेमाडोह येथील रहिवासी महेश मावसकर या तरुणानं 'ईटीव्ही भारत'शी बोलताना दिली.
रात्रीच्या वेळी खेळाची रंगत : दिवसभर मजुरी काम केल्यावर व्हॉलिबॉल खेळण्यासाठी सायंकाळी सहा ते आठ या दोन तासात खेळाची रंगत मेळघाटातील गावांमध्ये पाहायला मिळते. व्हॉलिबॉलच्या मैदानावर रात्री प्रकाशाची व्यवस्था व्हावी म्हणून लाईट लावला जातो. रात्रीच या खेळाची रंगत अनेक गावात पाहायला मिळते, असं महेश मावसकर म्हणाला. मेळघाटातील अनेक गावं ही अतिशय घनदाट जंगलात वसली असून त्या गावात वीज पुरवठाही नाही. घनदाट जंगल परिसरात असणाऱ्या अशा गावात रात्री अस्वल, वाघ येण्याची भीती आल्यानं तरुणांना सायंकाळी सहा नंतर खेळणं कठीण होतं. आमच्या गावात किमान खेळायला मिळावं यासाठी तरी वीज पुरवठा व्हावा अशी अपेक्षा माडीझडप या गावातील खेळाडू युवक मनोहर बेठेकर यानं व्यक्त केलं.

मेळघाटात कसं वाढलं व्हॉलिबॉल प्रेम : मेळघाटात जिल्हा परिषद शाळेसह आश्रमशाळेच्या मैदानावर व्हॉलिबलचं मैदान पाहायला मिळतंच. तीस, पस्तीस वर्षापूर्वी मेळघाटातील अनेक दुर्गम गावांतील आदिवासी बांधवांचा कुठल्याही शहरांशी संपर्क येत नव्हता. वर्षातून एखादेवेळी चिखलदरा, धारणी या मेळघाटातील तालुक्याच्या ठिकाणांसह मेळघाटच्या पायथ्याशी असणाऱ्या परतवाडा या शहरात काही मोजकी मंडळी यायची. एकूणच मेळघाटबाहेरचं जग माहीत नसणाऱ्या या गावांमध्ये बाहेरुन आलेले वन कर्मचारी, जिल्हा परिषद शिक्षक, आरोग्य विभागाचे कर्मचारी हे विरंगुळा म्हणून व्हॉलिबॉल खेळायाचे. अतिशय चपळाई असणारा हा खेळ पाहून आदिवासी मुलांना अगदी लहानपणापासून व्हॉलिबॉलचं आकर्षण वाटायचं. हळूहळू आदिवासी युवक खेळत सहभागी व्हायला लागले. हा खेळ त्यांना समजायला लागला. काही कळल्यानंतर दोन चार गावं मिळून खेळाची स्पर्धा सुरु झाली आणि व्हॉलीबॉल हा खेळ आदिवासी बांधवांच्या आयुष्यात आणि सातपुडा पर्वतात कायमचा रुजला.

शाळांना मिळतो निधी : आदिवासी भाग असणाऱ्या मेळघाटात क्रीडांगण विकास योजना आणि व्यायामशाळा विकास योजनेअंतर्गत राज्य शासन आणि जिल्हा प्रशासनाकडून निधी दिला जातो. क्रीडा साहित्य पुरवठा आणि बांधकामासाठी निधी दिला जातो. मेळघाटातील 30 टक्के मुलं विविध खेळांमध्ये सहभागी होतात.आदिवासी विभागाच्या स्पर्धा मेळघाटात होतात. या स्पर्धेच्या माध्यमातून आदिवासी युवकांना शासकीय नोकरीत पाच टक्क्यांचा लाभ मिळतो. यामुळं मेळघाटात खेळांना फार महत्व आहे. व्हॉलिबॉल सोबत कबड्डी आणि खो-खो हे खेळ मेळघाटात आदिवासी युवक खेळतात, अशी माहिती जिल्हा क्रीडा अधिकारी गणेश जाधव यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना दिली.
व्हॉलिबॉल खेळाला होऊ शकते मदत : आज मेळघाटातील जिल्हा परिषदेच्या शाळेत कबड्डी आणि व्हॉलीबॉल या खेळांना प्रोत्साहन देण्यासाठी जिल्हा नियोजन अंतर्गत शासकीय अनुदानात शाळांना निधी दिला जातो. आज व्हॉलिबॉल खेळातून राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर खेळणाऱ्या आदिवासी युवकांना सैन्य आणि पोलीस दलात नोकरी लागल्याचे अनेक उदाहरणं आहेत. ग्रामपातळीवर खेळणाऱ्या युवकांना खेण्यासाठी अधिक प्रोत्साहन मिळावं यासाठी आमदार स्थानिक विकास निधींतर्गत ग्रामपंचायतला निधी देता येतो. याद्वारे गावातील युवकांचा खेळण्यात आणखी जोश वाढेल. यासाठी ग्रामपंचायत स्तरावर ठराव घेऊन ते क्रीडा विभागाकडे सादर करावा लागेल, असा प्रस्ताव आला तर त्या ग्रामपंचायतीला सर्व क्रीडा साहित्य उपलब्ध करुन देऊ, असं जिल्हा क्रीडा अधिकारी गणेश जाधव यांनी स्पष्ट केलं.

खेळल्यानं आज शासकीय सेवेत : आमच्या मेळघाटातील अनेक मुलं ज्या काही आश्रमशाळेत शिकायला जातात त्याठिकाणी व्हॉलिबॉल हा खेळ खेळला जातोच. आमच्या कारा गावात दररोज व्हॉलिबॉल हा खेळ खेळताना युवक दिसतील. हा केवळ खेळ नसून आमच्या भागातील युवकांना शाकीय सेवेचा मार्ग आहे. या खेळाच्या माध्यमातूनच मी राज्य राखीव पोलीस दलात आज सेवा देतो आहे असं कारा गावातील रहिवासी सुधीर जावरकर 'ईटीव्ही भारत'शी बोलताना म्हणाले.
हेही वाचा :