मुंबई Science Behind Stampede : भारतीय नागरिक आणि उत्साह हे जणू समीकरणच आहे. खेळ असो, सण असो व मनोरंजन असो कुठल्याही वेळी भारतीयांचा सळसळता उत्साह नेहमीच दिसून येतो. पण हाच सळसळता उत्साह बऱ्याचदा त्यांच्या जीवाशी बेततो. याचं ताजं उदाहरण म्हणजे, आरसीबीच्या विजय जल्लोषात बंगळुरुमध्ये झालेली चेंगराचेंगरी आणि त्यात उद्ध्वस्त झालेले 11 कुटुंबाचं भवितव्य. श्वास रोखणारी बाब म्हणजे जनता ज्या क्रिकेट हीरोंना बघण्यास आली होती, ते क्रिकेट हीरो स्टेडियमच्या आत जल्लोषात न्हाऊन निघत होते आणि बाहेर मात्र चेंगराचेंगरीत कित्येक निष्पाप चाहते आपला अखेरचा श्वास घेत होते, ही अत्यंत दुर्दैवाची बाब.
हे सगळं आपण या आधी एखाद्या फूल पॅक ऍक्शन चित्रपटात बघितलंय. पण ते सगळं प्री-प्लॅन असतं केवळ मनोरंजनासाठी. मात्र जगातील सगळ्यात मोठ्या मनोरंजनाचं व्यासपीठ असणाऱ्या क्रिकेटच्या बाबतीत ही गोष्ट सत्यात उतरली आणि अनेकांना धक्का बसला. यामागचं राजकारण, दोषारोप, सरकारची बाजू, क्रिकेट असोसिएशनची बाजू या सगळ्या गोष्टी तात्काळ घडत गेल्या. मात्र या चेंगराचेंगरीची नेमकी सुरुवात कशी झाली? चेंगराचेंगरी होण्याइतपत परिस्थिती कशी चिघळली? चेंगराचेंगरी होण्या मागचं विज्ञान नेमकं काय असतं? चेंगराचेंगरीत लोकांचा जीव कसा जातो? चेंगराचेंगरी दरम्यान लोक गुदमरत असताना प्रसंगवधान रखतांना कुठल्या अडचणी येतात? कुठल्या गोष्टींची काळजी घेतली असती तर बंगरुळुमध्ये आरसीबीच्या विजायाला गालबोट लागलं नसतं? हे सगळे प्रश्न उपस्थित होतात. याच प्रश्नांची उत्तरं आपण जाणून घेऊयात.

चेंगराचेंगरी कुठून सुरु होते? : या भीषण घटनेचा उगम खरंतर एका साध्या भावनेत आहे, ती म्हणजे घबराट. कोणतंही नियंत्रण नसलं, तर मोठ्या प्रमाणावर जमलेली गर्दी काही सेकंदात संकटात रुपांतरित होऊ शकते, हे बंगळुरुच्या घटनेनं पुन्हा सिद्ध केलं. ज्यावेळी लोकांना वाटू लागतं की "आपण अडकतोय" किंवा "आपल्याला श्वास घेता येत नाही", तिथून सुरु होतो मानसिकतेचा विस्फोट. लोकांच्या मनात गर्दीतून बाहेर पडण्याचे उलटे चक्र फिरायला लागतात. त्यांचा जीव घाबरायला लागतो. घाबरलेल्या मनःस्थितीत अॅड्रेनालाईनचं प्रमाण वाढतं, त्यामुळं हृदयाचा ठोका आणि रक्तदाब वाढतो, शरीर सतर्क होतं. पण एकत्र असलेल्या हजारो लोकांमध्ये ही घबराट 'संक्रमित' व्हायला सुरुवात होते आणि मग भीतीच्या लाटा सैरभैर गर्दीत धावायला लागतात. कोण कुणाला ढकलतंय, कोणी पडलंय, हे लक्षात येण्याआधीच शरीरांच्या ढिगाऱ्यात अनेक निष्पाप जीव अडकतात. यावेळी कुणालाच कोण पडतंय का? आपण कुणाच्या अंगावर पाय देऊन जातोय का? आपण कुणाला धक्का दिला का? या कुठल्याच प्रश्नांची जाणीव होत नसते कारण प्रत्येकाला आपल्या जिवाची पर्वा असते.

चेंगराचेंगरी मागचं विज्ञान काय : चेंगराचेंगरी फक्त मानसिकतेमुळंच घडत नाही. त्यामागे शारीरिक विज्ञानही दडलेलं असतं. 'फोर्स ट्रान्सफर' म्हणजेच एक व्यक्ती दुसऱ्यावर ढकलली गेली की त्याचा जोर पुढच्या व्यक्तीवर जातो, हा साखळी प्रकार थांबत नाही. हजारोंच्या संख्येतील या 'लहरी' अनेकदा इतक्या वेगानं आणि प्रचंड दाबानं पुढं सरकतात की लोक काही मीटरपर्यंत लोटले जातात. तो दबाव इतका जबरदस्त असतो की आपली शक्ती त्यापुढं सपशेल कमी पडते. आणि या दरम्यान तोल ढळून जर कोणी चुकून पडला तर तिथंच तयार होतो 'डोमिनो इफेक्ट' एक पडला की बाकीच्यांनाही आधार उरत नाही, तेही पडतात. शरीरांवर शरीरं आदळत जातात. सावरण्याची कसलीच संधी मिळत नाही आणि पाहता पाहता श्वास घेता न येणं, गुदमरणं, बेशुद्ध होणं आणि शेवटी मृत्यू हे सगळं काही मिनिटांच्या आत घडतं. इथं सगळ्यांची शुद्ध हरवलेली असते त्यामुळं कुणीच कुणासाठी उभं राहू शकत नाही. त्यामुळं क्षणात होत्याचं नव्हतं होतं.
"बेंगळुरुतील नुकत्याच घडलेल्या चेंगराचेंगरीच्या घटनेनं आपल्याला पुन्हा एकदा जागं केलं आहे की, गर्दी ही केवळ लोकांची संख्या नसते तर ती एक जीवंत, गुंतागुंतीची प्रणाली असते. चेंगराचेंगरी होण्यामागे शारीरिक आणि मानसशास्त्रीय घटकांचा एकत्रित परिणाम असतो. विज्ञानाच्या दृष्टीनं, गर्दी जर 'क्रिटिकल डेन्सिटी' म्हणजे प्रति चौरस मीटरमध्ये चारपेक्षा अधिक व्यक्ती या मर्यादेपलीकडे गेली, तर व्यक्तींना स्वतंत्र हालचाल करता येत नाही. यामुळं माणसे एकमेकांवर ढकलली जातात, नियंत्रण सुटतं आणि लवकरच घबराटीचं वातावरण तयार होतं. या घबराटीचा मानसशास्त्रीय परिणाम म्हणजे हर्ड बिहेवियर जेव्हा व्यक्तींची विचारशक्ती मागे पडते आणि ते केवळ आजूबाजूच्या गर्दीच्या वर्तनाचं अनुकरण करतात. त्यात 'स्वतःला वाचवायचं' ही मूलभूत प्रवृत्ती जागी होते आणि त्यामुळं अनेकदा इतरांचा जीव धोक्यात येतो. चेंगराचेंगरी ही एखाद्या एका व्यक्तीच्या चुकीमुळं होत नाही, तर ती नियोजनातल्या त्रुटींचं, अपुऱ्या व्यवस्थापनाचं आणि गर्दीच्या मानसशास्त्राचं एक क्लिष्ट मिश्रण असते. ही घटना आपल्याला केवळ सहानुभूतीची नाही तर शहाणपणाची आठवण करून देते की, सार्वजनिक कार्यक्रम, पूजाअर्चा, सेल्स किंवा कोणताही मोठा जमाव असलेला प्रसंग अत्यंत शिस्तबद्ध आणि वैज्ञानिक पद्धतीनं हाताळणं आवश्यक आहे." - डॉ. संदिप शिसोदे, मानसोपचारतज्ञ
चेंगराचेंगरी कशी थांबवता येते : आता चेंगराचेंगरी मागचं विज्ञान समजून घेतल्यानंतर प्रश्न उरतो की ही चेंगराचेंगरी थांबवता आली असती का? तर याचं उत्तर आहे हो! कारण व्यवस्थापन असलं तर कुठलीच गोष्ट अशक्य नसते हा नियम आहे. किंबहुना कधी एखाद्या दाट भागात प्रचंड जनसमुदाय लोटला आणि चेंगराचेंगरी सदृश परिस्थिती निर्माण झाली तर अशावेळी प्रसंगावधान राखून केवळ 3 गोष्टी लक्षात ठेवायला हव्यात...

गर्दीचा अचूक अंदाज न घेण्याची चूक : जेव्हा आयोजक किंवा प्रशासन लोकसंख्येचा अचूक अंदाज घेत नाहीत, तेव्हा आपत्ती सुरु होते. बंगळुरुच्या घटनेतही हेच झालं. सीएम सिद्धरामय्या यांनी मान्य केलं की त्यांना इतकी गर्दी अपेक्षितच नव्हती. एक लाख लोक विधानसभेजवळ आणि तीन लाख लोक चिन्नास्वामी स्टेडियमजवळ दाखल झाले. अशा वेळी आयोजकांनी उपस्थित लोकसंख्येच्या प्रमाणात जागेचं नियोजन केलं असतं, प्रवेश आणि निर्गमनासाठी स्वतंत्र मार्ग आखले असते, तर कदाचित ही जीवितहानी टळली असती.

एकाच दिशेनं धावणारी अनियंत्रित गर्दी : या प्रसंगात झालं काय की प्रत्येकाला आपल्या आवडत्या खेळाडूंना बघायचं होतं. त्यामुळं ते स्टेडियमच्या आतमध्ये जरी जावू शकत नव्हते, तरी आपले खेळाडू आपल्याला बाहेर आल्यावर दिसतील या हेतूनं सगळ्यांनी एकाच ठिकाणी गर्दी केली. गर्दी जेव्हा एकाच वेळी एका दिशेनं हलते, तेव्हा तिच्यावर नियंत्रण ठेवणं अशक्य होऊन जातं. स्टेडियमबाहेर आरसीबीचे खेळाडू आले आणि त्यांच्या एका झलकसाठी हजारो लोक एकाच क्षणी एका दिशेनं सरसावले. जर बॅरिकेड्स, वेगवेगळ्या मार्गांचं नियोजन आणि स्टॅगरड एंट्री सिस्टीम ठेवली गेली असती, तर लोकांची हालचाल टप्प्याटप्प्यानं झाली असती आणि गोंधळ टाळता आला असता.

माहितीचा अभाव, अफवा आणि अंधार : जेव्हा लोकांना काहीच माहिती नसतं, तेव्हा घाबरणं, अफवा पसरवणं आणि चुकीच्या प्रतिक्रिया देणं सुरु होतं. बंगळुरुच्या घटनेत काही लोक नाल्यावर ठेवलेल्या स्लॅबवर उभे होते. स्लॅब तुटला, काहीजण पडले, पण मागच्या रांगेतील लोकांना याची कल्पनाच नव्हती. त्यामुळं पुढं सुरु असलेला गोंधळ बघून मागची मंडळी धास्तावली आणि इथं चेंगराचेंगरीला सुरुवात झाली. पब्लिक अॅड्रेस सिस्टीम, सूचना फलक, प्रशिक्षित स्वयंसेवक आणि सोशल मीडिया लाईव्ह फीड यांचा योग्य वापर झालेला असता, तर ही चूक नियंत्रणात आणता आली असती.

एकंदरीतच, बंगळुरुमध्ये आतापर्यंत समोर आलेला मृतांचा आकडा, चेंगराचेंगरीबाबतची वेगवेगळी कारणं याकडे एका सखोल दृष्टिकोनातून बघितलं तर नियोजनाचा अभाव, गरजेपेक्षा कमी असलेली सुरक्षा व्यवस्था आणि प्रशासनाचा चुकीचा अंदाज ही मुळ कारणं यातून समोर येतात. मात्र या सगळ्यात कुठेतरी जनतेनं सुद्धा जागरुक राहणं गरजेचं आहे. आपला उत्साह, आपल्या भावना सगळं मान्य आहे. मात्र आपण अशा गर्दीच्या ठिकाणी जावून आपल्या कुटुंबाचा जीव धोक्यात घालतो आहोत, तेही केवळ आपल्या आवडत्या क्रिकेटरच्या किंवा कलाकाराच्या एका झलकीसाठी हे अत्यंत चुकीचं आहे. कुठल्याही कलेचा आदर करा आपण त्यासाठी जीव धोक्यात घालून आपलं भविष्य उद्ध्वस्त करु नका. आपण प्रत्येकानं एक जबाबदार नागरिक म्हणून गर्दीत स्वतःला आणि इतरांना सुरक्षित ठेवण्याचा प्रयत्न केला पाहिजे.
हेही वाचा :