संगमनेर Sangamner Australia Womens Match : क्रिकेट प्रेमींसाठी पर्वणी ठरलेल्या संगमनेरमधील क्रिकेट सामन्यात ऑस्ट्रेलियन महिला क्रिकेट संघानं दमदार कामगिरी करत विजय मिळवला. क्रिकेट असोसिएशन ऑफ संगमनेर आणि जयहिंद लोक चळवळ यांच्या संयुक्त विद्यमाने हा सामना आयोजित करण्यात आला होता. संगमनेर शहरातील सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात क्रीडा संकुलात पार पडलेल्या या मैत्रीपूर्ण सामन्यासाठी माजी मंत्री बाळासाहेब थोरात, आमदार सत्यजित तांबे यांच्यासह मोठ्या संख्येनं क्रिकेटप्रेमी उपस्थित होते.
अटीतटीचा झाला सामना : या सामन्यासाठी ऑस्ट्रेलियन महिला क्रिकेटपटूंच्या उपस्थितीमुळं संपूर्ण मैदान गजबजलेलं दिसत होतं. चौकार-षटकारांच्या आतषबाजीत रंगलेल्या या सामन्यात ऑस्ट्रेलियन इलेव्हन संघानं संगमनेर इलेव्हन विरुद्ध रोमांचक विजय मिळवला. विशेष म्हणजे हा सामना इतका रोमांचक झाला की सामना सुपर ओव्हरमध्ये गेला आणि अखेर ऑस्ट्रेलिया इलेव्हन संघानं 4 धावांनी विजय मिळवला.

सामन्याचे नियम कसे : प्रत्येकी आठ षटकांच्या या सामन्यात ऑस्ट्रेलियन इलेव्हन संघात 6 ऑस्ट्रेलियन व 5 संगमनेरमधील स्थानिक खेळाडूंचा समावेश होता. संगमनेर इलेव्हन संघात 6 स्थानिक तरुणींसह 5 ऑस्ट्रेलियन खेळाडूंनी सहभाग नोंदवला. ऑस्ट्रेलियन संघातील प्रमुख खेळाडूंमध्ये ओलिविया मोरिया, स्टुआर्ट जेम्स, जेम्स अल्विन, अँजेलिना ऍनी, शिवानी मेहता, हॉली ली, गॅब्रियल जॉय, रेचल एमी, ओलिविया केट, जॉय एलिस, ग्रेस लॉन्स, एमी रेनी, चैतन्य मारकवार, नेतली मोर्थ आणि प्रशिक्षक क्रिस्तेन जॅक यांचा समावेश होता.
परदेशी खेळाडूंचा महाराष्ट्रीयन पद्धतीनं सत्कार : विधान परिषदेचे पदवीधर मतदार संघाचे आमदार सत्यजित तांबे यांनी ग्रामिण भागातील मुलींना क्रिकेटचं सखोल ज्ञान मिळावं व प्रोत्साहन मिळावं यासाठी थेट परदेशी खेळाडूंना आणत हा समाना आयोजित केला होता. यावेळी सामना संपल्यावर परदेशी खेळाडूचा खास मराठमोळा फेटा घालत ट्रॉफी, शॉल आणि बुके देऊन मान्यवरांच्या हस्ते सत्कारही करण्यात आला.

हेही वाचा :