Buddha Purnima 2025 : भगवान बुद्धांचा जन्म इ.स.पूर्व 563 मध्ये भारताला लागून असलेल्या दक्षिण नेपाळच्या तराई प्रदेशात असलेल्या लुंबिनीच्या बागेत झाला. ही तारीख वैशाख महिन्यातील पौर्णिमा होती. म्हणून दरवर्षी गौतम बुद्धांचा जन्मदिवस 'बुद्ध पौर्णिमा' म्हणून साजरा केला जातो. यावर्षी 12 मे रोजी 'बुद्ध पौर्णिमा' आहे. हा दिवस जगभरात वेगवेगळ्या नावांनी ओळखला जातो. काही ठिकाणी याला 'बुद्ध जयंती', तर कुठं 'पीपल पौर्णिमा' असं म्हणतात.
गौतम बुद्धांचा जन्म : 'वैशाख पौर्णिमा' (Vaishakh Purnima) म्हणजेच 'बुद्ध पौर्णिमा' होय. जागतिक स्तरावर या पौर्णिमेला फार महत्त्व आहे. कारण जगाला शांती, करुणा, मैत्रीचा संदेश ज्या तथागत गौतम बुद्धांनी दिला आहे. त्या बुद्धांच्या जीवनातील महत्त्वपूर्ण तीन घटना या पौर्णिमेच्या दिवशी घडल्या आहेत. बोधी सत्व सिद्धार्थ गौतमाचा जन्म इसवी सन पूर्व 563 मध्ये 'लुंबीनी' या ठिकाणी झाला. ती पौर्णिमा म्हणजे वैशाख पौर्णिमा होय. तथागत गौतम बुद्ध यांनी 29 वर्ष घरामध्ये राहून त्यानंतर गृह त्याग केला.
बुद्धांच्या जीवनातील महत्त्वपूर्ण तीन घटना : भगवान बुद्धाच्या जीवन काळातील त्यांचा 'जन्म', त्यांची 'ज्ञानप्राप्ती' आणि त्यांचं 'महापरिनिर्वा'ण या तिन्ही घटना वैशाख पौर्णिमेला झाल्यामुळं या पौर्णिमेला 'बुद्ध पौर्णिमा' असं म्हटलं जातं. हा दिवस म्हणजे अत्यंत महत्त्वाचा दिवस म्हणून ओळखला जातो. जर बुद्ध या जगात जन्माला आले नसते, तर खऱ्या अर्थाने अंधश्रद्धा, रूढी, परंपरा आजही चालूच राहिल्या असत्या. ज्यामुळं देश लयास केला असता जगाला बुद्धाच्या विचाराने प्रेरित केल्याने जगामध्ये शांती नांदत आहे. अशा बुद्धांचा जन्म या देशात झाला, आज बुद्धांच्या विचारांची गरज आज जगाला आहे. "युद्ध नको बुद्ध हवा" आहे असं संपूर्ण जग म्हणत आहे. जगातील लोक ही बुद्ध पौर्णिमा मोठ्या उत्साहामध्ये आनंदामध्ये साजरी करतात.
बुद्ध पौर्णिमा कशी साजरा करतात? : या दिवशी विविध देशांतील लोक त्यांच्या संस्कृतीनुसार विविध कार्यक्रमामध्ये भाग घेतात. भारतासह बहुतेक देशांमध्ये, बौद्ध धर्मावर विश्वास ठेवणारे लोक आपली घरे, बौद्ध विहार, बौद्ध मठ हे फुलं, हारं आणि रंगीबेरंगी दिव्यांनी आकर्षकपणे सजवतात. मंदिर आणि इतर आवडत्या ठिकाणी सामूहिक भंडारा आयोजित केला जातो. अनेक ठिकाणी बौद्ध धर्मातील तज्ञ भगवान बुद्धांच्या शिकवणीचा प्रचार करतात. या दिवशी सरकारी सुट्टीही असते. काही ठिकाणी लोक या निमित्तानं मिरवणुका काढतात. यानिमित्तानं अनेक लोक भगवान बुद्धांच्या शिकवणीचं जीवनात पालन करण्याचा प्रयत्न करतात.
भारतात बुद्ध जयंतीचा इतिहास : 2 मे 1950 रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली भारतात पहिल्यांदाच 'बुद्ध जयंती' दिल्ली येथे सार्वजनिक रूपात साजरी करण्यात आली होती. त्यावेळी बाबासाहेबांनी बुद्धांच्या जीवनकार्यावर आपले विचार मांडले होते. बुद्ध जयंती समारोहाला देशातील नामांकित वकील, विचारवंत भिक्षु समुदायासह सुमारे वीस हजार लोक उपस्थित होते. तेव्हापासूनच बुद्ध जयंती साजरी करण्यास सुरुवात झाली होती. त्यानंतर 151 मध्ये बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली तीन दिवसीय बुद्ध जयंती महोत्सव साजरा करण्यात येतो.
वैशाख पौर्णिमा कधी आहे ? : हिंदू पंचांगानुसार वैशाख पौर्णिमा 11 मे संध्याकाळी 6:55 वाजता सुरू 12 मे संध्याकाळी 7:22 वाजता संपेल. उदय तिथीप्रमाणे यावर्षी 'वैशाख पौर्णिमा' 12 मे रोजी साजरी केली जाणार आहे.
'वैशाख पौर्णिमा' शुभ मुहूर्त काय? :
- ब्रह्म मुहूर्त : पहाटे 04:04 ते पहाटे 04:46
- अभिजित मुहूर्त : सकाळी 11:46 ते दुपारी 12:40
- विजय मुहूर्त : दुपारी 2:28 ते दुपारी 3:22 पर्यंत
(टीप - सदरील लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे. या लेखातील माहितीशी 'ईटीव्ही भारत' सहमत असेलच असं नाही.)
हेही वाचा -