हैदराबाद: अक्षय्य तृतीयेच्या (Akshaya Tritiya 2025) मुहूर्तावर सोने खरेदीला विशेष महत्त्व आहे. 'अक्षय्य तृतीया' हा हिंदू धर्मानुसार शुभ दिवस मानला जातो. 'अक्षय' या शब्दाचा अर्थ “शाश्वत” किंवा “कधीही कमी न होणारा” असा होतो, तर तृतीया म्हणजे “तिसरा” दिवस. त्याच्या नावाप्रमाणेच, असं मानलं जातं की या दिवशी केलेलं चांगलं काम, गुंतवणूक किंवा सुरुवात चिरस्थायी यश आणि समृद्धी आणते. या दिवशी कोणत्याही कामाची सुरुवात केल्यास ती शुभ मानली जाते.
अक्षय्य तृतीयेच्या पूजेचा शुभ मुहूर्त : बुधवार, (३० एप्रिल) रोजी पहाटे ५ वाजून ३१ मिनिटांपासून अक्षय्य तृतीयेच्या पूजेचा शुभ मुहूर्त सुरू होईल आणि तो दुपारी १२ वाजून १८ मिनिटांपर्यंत असेल.
सोने खरेदी करण्याचा शुभ मुहूर्त : ३० एप्रिल रोजी पहाटे ५ वाजून ४१ मिनिटांपासून ते दुपारी २ वाजून १२ मिनिटांपर्यंत असेल. तसेच तुम्ही जर सोने-चांदीची खरेदी करू शकत नसाल, तर अक्षय्य तृतीयेला तुम्ही माती, पितळेची भांडी किंवा पिवळी मोहरीदेखील खरेदी करू शकता.
अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर का करावे सोने खरेदी? : अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोनं खरेदी करणं, अत्यंत शुभ मानलं जातं. पण अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर सोने का खरेदी केले जाते?. तर या दिवशी सोनं खरेदी केल्यानं लक्ष्मी देवीची कृपा होते अशी मान्यता आहे. सोनं हे देवी लक्ष्मीचं रूप देखील मानलं जातं, यामुळं सोनं खरेदी केल्यास देवी लक्ष्मी आपण घरात आणतो, अशी मान्यता आहे. यामागील पौराणिक कथा अशी आहे की, देव आणि दानवांच्या समुद्र मंथनादरम्यानही सोने बाहेर आले होते. जे भगवान विष्णूंनी परिधान केले होते. या कारणामुळं सोनं माता लक्ष्मीनारायणाचं रूप मानलं जातं. म्हणून अक्षय्य तृतीया आणि धनत्रयोदशीला सोनं खरेदी करण्याची परंपरा आहे. त्यामुळं, जर आपण अक्षय्य तृतीयेला सोनं किंवा सोन्याचे दागिने विकत घेऊन घरी आणता, तेव्हा त्यासोबत देवी लक्ष्मीही आपल्या घरात प्रवेश करते, अशी मान्यता आहे. याशिवाय अक्षय्य तृतीयेच्या दिवशी ज्या संपत्तीची खरेदी केली जाते, तिथेही लक्ष्मीचा वास असतो आणि ती संपत्ती सदैव तुमच्याकडं राहते, असंही म्हटलं जातं.
टीप - सदरील लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे. या लेखातील माहितीशी 'ईटीव्ही भारत' सहमत असेलच असं नाही.
हेही वाचा -