मुंबई- राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची आज जयंती दरवर्षीप्रमाणे देशभर साजरी केली जात आहे. मुंबई येथील मणिभवन येथे काँग्रेस पक्षाच्या वतीने महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यात आलेय. या दरम्यान महाराष्ट्र काँग्रेस प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी केंद्र आणि राज्य सरकारवर टीकास्त्र डागलं आहे. वापरा आणि फेकून द्या अशा प्रकारची रणनीती भाजपाची असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. खरं तर राष्ट्रपिता महात्मा गांधींजी यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन कार्यक्रमानिमित्त महात्मा गांधीजींचे पणतू तुषार गांधी, काँग्रेसचे महाराष्ट्रातील प्रभारी रमेश चेन्नीथला, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले, खासदार आणि मुंबई काँग्रेस अध्यक्षा वर्षा गायकवाड यांच्यासोबत मणिभवन येथे भेट देऊन महात्मा गांधीजींच्या स्मृतींना अभिवादन केले.
गांधींचा आदर्श डोळ्यांसमोर ठेवा: देशाला महात्मा गांधींच्या विचारसरणीची गरज आहे. केंद्रातील सरकार जाती-धर्मात लढाई लावून तेढ निर्माण करीत आहे. त्यामुळे गांधींचा आदर्श डोळ्यांसमोर ठेवून अहिंसेचा मार्ग अवलंबिला तर देशात एकता आणि बंधुता टिकून राहू शकते. इराण आणि इस्रायल युद्धातील दोन्ही देशांच्या नेत्यांनीदेखील महात्मा गांधींच्या विचारातून प्रेरणा घेतली पाहिजे. देशाचे पंतप्रधान फक्त महात्मा गांधी यांचे नाव घेतात, पण त्याच्या आदर्शांप्रमाणे चालत नसल्याचा आरोप महाराष्ट्र काँग्रेस प्रभारी रमेथ चेन्नीथला यांनी केलाय.
देशाच्या गृहमंत्र्यांनी पराभव स्वीकारला: आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने महाविकास आघाडीच्या बैठकांचे सत्र सुरू आहे. सोमवार आणि मंगळवारीदेखील महाविकास आघाडीची बैठक झाली. आमच्यात कोणत्याही जागेवरून वाद नाही. जनतेमध्ये संभ्रम निर्माण करण्यासाठी अशा प्रकारची चर्चा निर्माण केली जात आहे. विधानसभा निवडणूक आम्ही महाविकास आघाडी म्हणून सामोरे जाणार असल्याचे चेन्नीथला यांनी सांगितले. तसेच देशाचे गृहमंत्री यांनी काल सांगून टाकले 2029 भाजपाचे सरकार येणार आहे. त्यामुळे 2024 त्यांनी सोडून दिलंय. देशाच्या गृहमंत्र्यांनी पराभव स्वीकारल्याचं त्यांनी कबूल केले असल्याचं चेन्नीथला म्हणालेत. म्हणून 2024 ला महाविकास आघाडी सरकार येणार हे निश्चित असल्याचे रमेश चेन्नीथला यांनी सांगितले. तसेच भाजपा आपल्यासोबत असलेल्या मित्र पक्षांचा फक्त वापर करतो आणि त्यांना संपविण्याचे काम करतो, हे अनेक वेळा जनतेने पाहिले आहे, असंही चेन्नीथला यांनी सांगितलं.
सरकारी तिजोरीत पैसे नाही: विधानसभा निवडणूक वेळेत घोषित करणे अपेक्षित आहे. दरम्यानच्या काळात सत्ताधारी अनेक निर्णय घेत आहेत. मंत्रिमंडळ निर्णयाची अंमलबजावणी होणार नाही, कारण सरकारी तिजोरीत पैसे नाही. त्यामुळेच सरकारकडून मोठमोठ्या घोषणा केल्या जात आहेत हे जनतेच्या लक्षात आले असल्याचे चेन्नीथला म्हणालेत.
हेही वाचा