वेळप्रसंगी रक्तही सांडू, पण...; अमित शाहांच्या गुजराती भाषणावरून विरोधकांचा हल्लाबोल
भाषण केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांनी गुजरातीमधून केल्यानंतर हे भाषण कुणाला कळलं असेल का? यावरून विरोधकांनी अमित शाहांवर निशाणा साधला आहे.


Published : May 27, 2025 at 8:06 PM IST
|Updated : May 27, 2025 at 8:25 PM IST
मुंबई - केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे मुंबई दौऱ्यावर आहेत. मुंबईत माधवबाग लक्ष्मी नारायण मंदिराला 150 वर्ष पूर्ण झाली आहेत. त्यानिमित्ताने अमित शाहांनी लक्ष्मी-नारायणाचं दर्शन घेतलं. मंदिराला 150 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं होतं. दरम्यान, या कार्यक्रमात बोलताना संपूर्ण भाषण अमित शाहांनी गुजराती भाषेतून केलंय. या माधवबाग मंदिरामध्ये गुजरातीसह मराठी, उत्तर भारतीय असे बहुभाषिक लोक मंदिरात दर्शनासाठी जातात. या कार्यक्रमालाही गुजरातीसह उत्तर भारतीय आणि अन्य समाजातील लोक उपस्थित होते. परंतु संपूर्ण भाषण केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांनी गुजरातीमधून केल्यानंतर हे भाषण कुणाला कळलं असेल? मंदिराबद्दल त्यांनी ज्या भावना व्यक्त केल्या त्या कोणाल्या समजल्या का? यावरून विरोधकांनी अमित शाहांवर निशाणा साधला आहे.
मराठीसाठी काहीही करायला तयार...: दरम्यान, मराठी भाषेसाठी मनसे काहीही करायला तयार आहे. समोर मित्र असो किंवा शत्रू असो. त्यालाही अंगावर घ्यायला तयार आहे, असा आदेश आम्हाला राजसाहेबांनी दिला आहे. परंतु अमित शाहांनी संपूर्ण भाषण गुजरातीतून केले हे कुणाला कळले. मोदी-शाहांचा मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याचा डाव आहे. त्यांची ही सुप्त इच्छा गेल्या कित्येक दिवसापांसून आहे. मुंबई ही त्यांना गुजरातमध्ये न्यायची आहे. पण मुंबईचे आम्ही गुजरातीकरण होऊ देणार नाही. त्यांचा हा डाव आम्ही यशस्वी होऊ देणार नाही. मुंबईत गुजराती लादण्याची त्यांची मानसिकता आहे. मराठी भाषेच्या आणि मराठी माणसाच्या आड जर कोणीही येत असेल तर आम्ही शांत बसणार नाही. अमित शाहांनी मुंबईत येऊन फक्त गुजरातीतून भाषण करणे हे अत्यंत चुकीचे आहे. जर समोर बसणारे उत्तर भारतीय, मराठी किंवा अन्य समाजातील लोक आहेत. अशावेळी त्यांनी हिंदी किंवा गुजराती भाषण करणं अपेक्षित होते. पण केवळ गुजरातीमधून बोलणं यातून त्यांचे वेगळे मनसुबे दिसताहेत. मुंबईत आम्ही गुजराती भाषा चालू देणार नाही, असा इशारा मनसे नेते यशवंत किल्लेदार यांनी "ईटीव्ही भारत"शी बोलताना दिलाय.
तर प्रसंगी पुन्हा रक्त सांडू...: दुसरीकडे अमित शाहांच्या संपूर्ण गुजराती भाषणावरून माजी महापौर आणि ठाकरे गटाच्या माजी नगरसेविका किशोरी पेडणेकर यांनीही अमित शाहा यांच्यावर टीका केलीय. संयुक्त महाराष्ट्रासाठी 105 हुतात्म्यांना बलिदान द्यावे लागले. त्यावेळी रक्त सांडले होते. त्या हुतात्म्यांचा अपमान आज अमित शाहांनी केलाय. मोदी-शाहांना मुंबई ही गुजरातमध्ये न्यायची आहे. हा त्यांचा कित्येक वर्षांपासूनचा डाव आहे. परंतु तो डाव आम्ही यशस्वी होऊ देणार नाही. मराठीच्या आड कोणीही आला तर आम्ही शांत बसणार नाही. जर तशी वेळ आली तर वेळप्रसंगी आम्ही पुन्हा संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यासारखे रक्त सांडू, पण मुंबई आणि महाराष्ट्रामध्ये असले गुजरातीचे अतिक्रमण होऊ देणार नाही, अशी प्रतिक्रिया मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी "ईटीव्ही भारत"शी बोलताना दिलीय.
...म्हणून ते गुजराती बोलले असतील : माधवबाग मंदिर हे 150 वर्षांपूर्वीचे आहे. मंदिराला मोठी परंपरा आहे. इथे जो भाविक आहे तो केवळ गुजराती नाही तर उत्तर भारतीय, मराठी, दक्षिण भारतीय असं सर्व समाजातील लोक आहेत. पण अमित शाहांनी फक्त गुजरातीमधून भाषण केल्यामुळे अन्य लोकांना त्यांचे भाषण कळले का? असा सवाल उपस्थित केला जातोय, असा प्रश्न भाजपा प्रवक्ते गणेश हाके यांना विचारला असता, जर समोर बसलेली जनता ही बहुसंख्येनं गुजराती समाजातील असेल, तर तिथे गुजराती भाषेतून बोलणे क्रमप्राप्त आहे. ही मंदिरांची संस्था गुजराती समाजातील आहे. तिथे मोठ्या संख्येनं भाविक हे गुजराती समाजातील होते. त्यामुळं अमित शाहांनी गुजराती भाषेतून भाषण केले असावे, अशी प्रतिक्रिया "ईटीव्ही भारत"शी बोलताना गणेश हाके यांनी दिलीय.
हेही वाचाः

