मुंबई : मुंबईतील जोगेश्वरी पूर्व विधानसभा मतदारसंघाचे शिवसेना (उबाठा) आमदार अनंत (बाळा) नर (MLA Bala Nar) हे पहिल्यांदाच विधानसभेवर आमदार म्हणून निवडून गेले आहेत. नुकतंच पार पडलेलं अर्थसंकल्पीय अधिवेशन हे त्यांचं पहिलंच अर्थसंकल्पीय अधिवेशन होतं. या अधिवेशनात काम करताना काय अनुभव आला, मतदारसंघातील कोणते प्रश्न विधानसभा सभागृहात मांडले?, याबाबत आमदार बाळा नर यांनी 'ईटीव्ही भारत'शी संवाद साधलाय.
काय म्हणाले बाळा नर? : आमदार नर म्हणाले, "विधानसभेत आपल्या मतदारसंघातील प्रश्न सोडवणे याला आमचं प्राधान्य होतं. माझ्यासाठी हे पहिलं अधिवेशन असलं तरी जनतेचे, सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी विविध खात्यांचे मंत्री, राज्यमंत्री यांच्या माध्यमातून प्रश्न सोडवताना नेमकं काय करावं लागतं याचे धडे मी घेतले. प्रश्न, समस्या सभागृहात मांडताना, त्याचं गांभीर्य लक्षात येणं गरजेचं आहे. येथे काम करताना सभागृहातील जुन्या, ज्येष्ठ आमदारांचं काम पाहिलं. मतदारसंघातील प्रश्न सोडवण्यासाठी मी आग्रही होतो. मुंबई महापालिकेत दोन वेळा नगरसेवक असल्यानं मुंबई महापालिकेच्या कामकाजाची पद्धत माहित होती. विधानसभेत थोडीसी वेगळी पद्धत आहे. मात्र, मतदारसंघातील प्रश्न, मुंबईच्या समस्यांची जाण असल्यानं त्याचा लाभ झाला. मतदारसंघातील आरे कॉलनी प्रश्न, झोपडपट्टी प्रश्न, पाणी प्रश्न, आरे झोपडीवासीयांचा प्रश्न, असं विविध मुद्दे विधानसभेत मांडण्यात आले."
मुंबई महापालिकेतील कामाची पद्धत मुंबई केंद्रित होती. विधानसभा मतदारसंघाचं काम करण्याचं वेगळेपण आहे. महापालिका आणि विधानसभेची कामं वेगळी आहेत, अधिकार वेगळे आहेत. त्यामुळं त्या पद्धतीनं काम करण्यात आलं. मुलभूत सेवा सुविधा पुरवणे हे महापालिकेचं क्षेत्र आहे. तर, विधानसभेत कायदा बनवणे, विविध धोरणात्मक निर्णय होतात. प्रथमच आमदार झालोय. आम्ही विरोधी पक्षाचे आमदार असल्यानं समाजाची बांधिलकी लक्षात ठेऊन काम होण्याची गरज आहे. मात्र, सत्ताधाऱ्यांकडून विरोधी पक्षांना काहीशी वेगळी वागणूक मिळत असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.
सत्ताधाऱ्यांवर टीका : पुढं ते म्हणाले की, "सत्ताधारी असो की विरोधी, जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी एकत्रपणे काम करण्याची गरज आहे. मात्र, प्रत्यक्षात राक्षसी बहुमतामुळं सत्ताधाऱ्यांमध्ये मुजोरी आली आहे," असा आरोप त्यांनी केला. विरोधी पक्षाच्या आमदारांना बोलण्यासाठी अध्यक्षांकडून जास्त वेळ दिला जात नाही, अशी खंत त्यांनी व्यक्त केली. तसंच विधिमंडळाच्या विविध आयुधांचा वापर करुन विविध प्रश्न मांडले. लोकांनी ज्या विश्वासानं निवडून दिलंय, तो विश्वास सार्थ ठरवणार असा निर्धार आमदार बाळा नर यांनी व्यक्त केला.
हेही वाचा -