छत्रपती संभाजीनगर : जून महिना सरत आलाय. मात्र यापुढे याच वर्षात होणाऱ्या घडामोडी अजून वेदनादायी असू शकतात अशी शक्यता अंकशास्त्र तज्ज्ञ श्वेता जुमानी यांनी व्यक्त केली आहे. २०२५ हे वर्ष सर्वांसाठी अतिशय अवघड जाणारे आहे. युद्ध, अपघात, आग अशा घटना घडत आहेत, जगासाठी हा काळ अवघड असला तरी यात भारताला अधिक नुकसान होण्याची शक्यता कमी आहे. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुढचे वर्ष संघर्षमय असल्यानं त्यांनी अधिक सतर्क राहावं असं त्यांनी सांगितलं. छत्रपती संभाजीनगर नाव बदलल्याने शहराला चालना मिळेल मात्र, नुसते संभाजीनगर म्हटले तर अधिक प्रभावी होईल असं देखील जुमानी यांनी सांगितलं.
पुढील काही महिने अवघड : २०२५ वर्ष कसे जाणार याबाबत डिसेंबर महिन्यात आम्ही शक्यता वर्तवल्या होत्या आणि त्यातील बहुतांश घटना घडल्या आहेत. मात्र, आगामी महिन्यातील भाकित वर्तवण्यास भीती वाटत आहे असं मत अंकशास्त्र तज्ज्ञ श्वेता जुमानी यांनी सांगितलं. अजून खूप खूप काही वाढून ठेवलंय. जगातील देश युद्धाच्या तयारीत आहेत. सर्वत्र वातावरण खराब आहे. हे वर्ष मंगलमय असेल असं लोकांना वाटत होतं, पण तसं नाही हे मंगळ असणारे वर्ष आहे. सर्वांनी स्वतःवर नियंत्रण ठेवणं आवश्यक आहे. अंकशास्त्रानुसार भारत नावाचा अंक ६, इंडिया नावाचा अंक ३, तर भारताला स्वातंत्र्य मिळून ७८ वर्ष झाली हे सर्व अंक चांगले असल्याने देशाला जास्त धोका नाही. येणाऱ्या परिस्थितीला देश चांगले तोंड देईल, आर्थिक स्थिती भक्कम होईल असं अंकशास्त्र तज्ज्ञ श्वेता जुमानी यांनी सांगितलं.
मोदींसाठी पुढील वर्ष आव्हानात्मक : पंतप्रधान नरेंद्र मोदी ७६ वर्षात पदार्पण करणार आहेत, वर्ष त्यांसाठी थोडं काळजी करण्यासारखं आहे. त्यांचं आरोग्य आणि इतर बाबींसाठी काळजी घ्यावी लागेल अशी शक्यता जुमानी यांनी वर्तवली आहे. नरेंद्र मोदी यांची जन्म तारीख १७ सप्टेंबर १९५० आहे. अंक गणितानुसार त्यांचे ७६ वर्ष लागल्यावर त्यांना काही अडचणी येणार आहेत. त्यामुळं त्यांनी निर्णय घेताना काळजी घेणं योग्य होईल. याआधी त्यांच्या निवडणुकांमध्ये निकालाबाबत आम्ही भाष्य केलं होतं, ते खरं झालं आहे. यापुढेच्या काळात ते मागे राहून नियंत्रण ठेवू शकतात, मात्र त्यांची संन्यास घेण्याची शक्यता तूर्तास नाही असं देखील जुमानी यांनी सांगितलं.
नुसते संभाजीनगर म्हटले तर योग्य : औरंगाबाद जिल्ह्याचं नाव छत्रपती संभाजीनगर करण्यात आलं, हा निर्णय जिल्ह्यासाठी अतिशय चांगला झाला. मी स्वतः २१ वर्षांपूर्वी शहरात आले होते. त्यावेळी नाव बदलण्याचं सुचवलं होतं, मी म्हणत नाही की, त्यामुळंच नाव बदललं. औरंगाबादच्या येणाऱ्या अंकापेक्षा छत्रपती संभाजीनगरचे अंक सकारात्मक आहेत, मात्र इतके चांगले नाहीत. त्यामुळं कागदोपत्री छ. संभाजीनगर असं असलं तरी, उच्चार करताना किंवा कुठे बोलताना फक्त संभाजीनगर असा उल्लेख केल्यास या प्रसारासाठी अधिक सकारात्मक होईल असं जुमानी यांनी सांगितलं. शिवाय मी राजस्थान, बिकानेर येथे गेले तिथे जसे आहे तसेच आहे. मात्र संभाजीनगर खूप बदलले आहे. चांगली विकास कामे दिसत आहेत, आधुनिकता वाढली असल्याचं त्यांनी सांगितलं.
चांदीत गुंतवणूक करणं योग्य : सर्व लोक सोन्यामध्ये गुंतवणूक करत असतात, मात्र यापुढे चांदीमध्ये गुंतवणूक करणं योग्य आणि फायदेशीर होईल असं मत श्वेता जुमानी यांनी व्यक्त केलं. भविष्यात सोलार, डिफेन्स निगडीत गुंतवणूक करणं योग्य राहील. चांदीमध्ये गुंतवणूक लाभदायी होईल असं मत त्यांनी व्यक्त केलं.
हेही वाचा -
- योग दिन 2025 वन अर्थ वन हेल्थ : 'योगानं जगाला जोडून ठेवलं, जीवनाला दिशा दिली': पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विशाखाट्टणममध्ये 'योगाभ्यास'
- पंतप्रधान मोदींनी ट्रम्प यांच्याशी साधला संवाद; म्हणाले, "भारत दहशतवादाविरोधात ठामपणे उभा"
- डोनाल्ड ट्रम्प यांच्या निमंत्रणावरुनही मोदी अमेरिकेला का गेले नाहीत? पंतप्रधानांनी स्वतः सांगितलं कारण