कोल्हापूर : राज्यातील विधानसभा निवडणुकीत महायुतीला मिळालेल्या अभूतपूर्व यशानंतर मुख्यमंत्री म्हणून तिसऱ्यांदा देवेंद्र फडणवीस यांची वर्णी लागली. आता मंत्रिमंडळ विस्ताराकडे अवघ्या राज्याचं लक्ष लागलं आहे. पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यातील विधानसभेच्या 26 जागांपैकी तब्बल 23 जागांवर महायुती आणि मित्र पक्षाचे उमेदवार विजयी झाले. त्यामुळं यंदा पश्चिम महाराष्ट्रातील शिवेंद्रराजे भोसले, हसन मुश्रीफ, विनय कोरे, राजेश क्षीरसागर, प्रकाश अबिटकर, गोपीचंद पडळकर या आमदारांची राज्य मंत्रिमंडळात वर्णी लागण्याची दाट शक्यता असून पश्चिम महाराष्ट्रातल्या सहकाराला यामुळं बूस्ट मिळणार आहे, असं राजकीय जाणकारांना वाटतंय.
केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या एकहाती सत्तेनंतरही पश्चिम महाराष्ट्रात विशेषतः सहकाराच्या राजकारणात भाजपाला पक्षाची पाळेमुळे रोखण्यात यश आलं नव्हतं. मात्र, देशाचे पहिले सहकारमंत्री म्हणून अमित शाह यांनी या मंत्रालयाची जबाबदारी स्वीकारली आणि गेल्या 5 वर्षात पश्चिम महाराष्ट्रातील सहकाराच्या राजकारणावर भाजपानं वर्चस्व निर्माण केलं. कोल्हापूरसह सांगली आणि सातारा जिल्ह्यात असलेल्या एकूण 63 सहकारी आणि खासगी साखर कारखान्यांचं कार्यक्षेत्र असलेल्या भागांमध्ये महायुतीच्या शिलेदारांनी काँग्रेस-राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यात आव्हान उभं केलं आहे.
एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत इच्छुकांची संख्या अधिक : राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेत कोल्हापुरातून इच्छुक आमदारांची मंत्री होण्याची संख्या अधिक आहे. राजेश क्षीरसागर, प्रकाश अबिटकर तसंच शिवसेनेच्या कोट्यातून आमदार झालेले राजेंद्र पाटील-यड्रावकर हे विजयी झाल्यापासूनच मंत्रिपदासाठी फिल्डिंग लावत आहेत. मात्र, मुख्यमंत्री असताना जाहीर सभेत एकनाथ शिंदे यांनी राधानगरीतून हॅट्रिक साधलेल्या प्रकाश अबिटकर यांना मंत्रिपदाचा शब्द दिला होता. आता उपमुख्यमंत्री शिंदे हा शब्द पूर्ण करणार का? तसंच यड्रावकर की क्षीरसागर यांच्यापैकी कुणाला मंत्रिपदाची संधी मिळणार? याकडे जिल्ह्याचं लक्ष लागलं आहे. तर उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या पक्षातून एकमेव आमदार असलेल्या हसन मुश्रीफ यांना कोणत्या खात्याचं मंत्रिपद मिळतं, हे पाहणंही औत्सुक्याचं ठरणार आहे.
सांगली, साताऱ्यात मंत्रिपदासाठी चुरस : सातारा जिल्ह्यातून 8 पैकी 8 तर सांगली जिल्ह्यातील 8 पैकी 5 जागा महायुतीनं जिंकल्या. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू सहकारी असलेल्या आमदार शिवेंद्रराजे भोसले यांना मंत्रिपदाची संधी आहे. तर सांगलीतून गोपीचंद पडळकर यांनाही ताकद देण्यासाठी महायुतीचे प्रयत्न सुरू आहेत. सहकारी साखर कारखाने, संस्था, दूधसंघ आणि सूतगिरण्यांचं संघटनात्मक राजकारण असलेल्या कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यात महत्त्वाची मंत्रिपदं देऊन गेली अनेक वर्ष काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसनं राखलेला गड यंदाच्या विधानसभा निवडणुकीत महायुतीनं सर केला. आता सहकारातील मातब्बर नेत्यांना आणि पक्ष संघटनेत चांगला परफॉर्मन्स दिलेल्या आमदारांना मंत्री करून सहकार क्षेत्राला बूस्टर डोस देण्याचा प्रयत्न महायुती करणार आहे. सहकार क्षेत्रात कार्यरत असणाऱ्यांना मंत्रिपदं निश्चितच मिळतील असं ज्येष्ठ पत्रकार गुरुबाळ माळी यांनी ईटीव्ही भारतशी बोलताना सांगितलं.
हेही वाचा