ETV Bharat / politics

भाजपा-शिवसेनेत 'मोठा-छोटा' भावावरुन रंगलं राजकारण, दोन्हीकडून स्वबळाची भाषा; मुंबईत समीकरण कसंय?

राज्यात लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर होणार आहेत. त्यामुळं भाजपा आणि शिवसेनेनं कंबर कसली आहे.

bmc election 2025 bjp shivsena power
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (File Photo)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : June 6, 2025 at 5:16 PM IST

3 Min Read
Choose ETV Bharat

मुंबई : मागील महिन्यात सुप्रीम कोर्टानं राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढील चार महिन्यात घेण्याचे आदेश राज्य निवडणूक आयोगाला दिले आहेत. यानंतर आता राज्य निवडणूक आयोगाकडून पालिका निवडणूक घेण्याबाबत हालचाली सुरू झाल्या आहेत. तर दुसरीकडे राजकीय पक्षांनीही पालिका निवडणुकीसाठी मोर्चेबांधणी सुरू केली आहे.

राजकीय समीकरण कसे? : याचाच एक भाग म्हणून दुसऱ्या पक्षातील माजी नगरसेवकांना गळाला लावले जात आहे. तर शिवसेना आणि भाजपा हे दोघेही मुंबईसह राज्यातील आपली ताकद आणि पक्षीय बलाबल याचीही चाचपणी करताहेत. दोन्ही पक्षाकडून आम्हीच पालिका निवडणुकीत मुंबईत मोठा भाऊ असल्याचं सांगताहेत. दरम्यान, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्वबळाचे संकेत दिलेत. त्यामुळे सध्या दोन्ही पक्षातील राजकीय समीकरण काय आहेत? भाजपा-शिवसेनेचे पक्षीय बलाबल काय आहे? यावरुन राजकीय वर्तुळात चर्चेला उधाल आलं आहे.

भाजपाकडून स्वबळाचा नारा? : काही दिवसांपूर्वी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे महाराष्ट्र दौऱ्यावर होते. त्यावेळी त्यांनी तिन्ही पक्षाच्या मुख्य नेत्यांसोबत वेगवेगळी बैठक घेतली होती. दरम्यान, या बैठकीत एकनाथ शिंदेंनी मुंबईतील 227 जागांपैकी 107 जागांची मागणी केल्याची माहिती समोर येत आहे. याबाबत माध्यमात बातम्या सुद्धा आल्या. दुसरीकडे आमची आता मागील 20-25 वर्षात मुंबई, ठाण्यासह राज्यात ताकद वाढली आहे. त्यामुळे आम्ही पालिका निवडणुका स्वबळावर लढू शकतो, असे संकेत भाजपा प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी दिले होते. त्यामुळं निवडणुकीच्या कामाला लागण्याचे कार्यकर्त्यांना आवाहन त्यांनी केले होते. "याबाबत कोणी निवडणुका स्वबळावर लढायच्या? की एकत्र लढायच्या? हा निर्णय घेण्यास अजून अवधी आहे. यावर पक्षाचे तिन्ही मुख्य नेते एकत्र बसून चर्चा करतील आणि निर्णय घेतील. निवडणुकीला अजून वेळ आहे. म्हणून एकत्र निवडणूक लढवणार? की स्वबळावर लढवणार? हे आताच सांगणे उचित ठरणार नाही," अशी प्रतिक्रिया शिवसेना प्रवक्ते संजय शिरसाट यांनी दिली.

भाजपाच राज्यात मोठा भाऊ : पालिका निवडणुकीसाठी कुणाची किती ताकद आहे, याबाबत भाजपा-शिवसेनेकडून चाचपणी करण्यात येत आहे. तसेच कुठल्या विभागात मतांचे समीकरण, राजकीय समीकरण आणि पक्षीय बलाबल याची सुद्धा चाचपणी करण्यात येत आहे. सध्या भाजपा पक्षाचा राज्यात विस्तार मोठ्या प्रमाणात झालेला आहे. "ज्याचे वय जास्त असते त्याला मोठा भाऊ म्हणतात. तसे राजकारणात ज्यांचे संख्याबळ अधिक म्हणजे ज्यांचे आमदार, माजी नगरसेवक जास्त तोच राजकारणात मोठा भाऊ असतो. आमची राजकारणात मोठी ताकद आहे, त्यामुळं आम्हीच मोठा भाऊ आहोत," अशी प्रतिक्रिया भाजपा आमदार आणि मंत्री नितेश राणे यांनी दिली. "युतीत कोण मोठा भाऊ आणि कोण लहान भाऊ हे आताच सांगणे कठीण आहे. आणि आता पालिका निवडणुकीत लहान भाऊ, मोठा भाऊ याचा विचार न करता तिन्ही पक्षातील मुख्य नेते वरिष्ठ पातळीवर जो निर्णय घेतील, तो आम्हाला मान्य असेल," अशी प्रतिक्रिया शिवसेना प्रवक्ते संजय शिरसाट यांनी युतीतील लहान भाऊ, मोठा भाऊ यावर चाललेल्या चर्चेवर दिली.

शिवसेना - उबाठा पक्षाला घरचा रस्ता दाखवायचा असेल तर... : सध्या भाजपा-शिवसेनेकडून मोठा भाऊ, छोटा भाऊ यावरून राजकारण रंगत आहे आणि भाजपाकडून स्वबळावर निवडणूक लढवण्याचे संकेत देण्यात आले आहेत. त्यामुळे आपल्या पक्षाची काय तयारी सुरू आहे? तुम्ही स्वबळावर लढणार? की एकत्र निवडणूक लढणार? असा प्रश्न शिवसेना आमदार आणि मंत्री प्रताप सरनाईक यांना विचारला असता, याबाबत आमच्यात कुठलाही वाद नाही. आमच्यात लहान भाऊ किंवा मोठा भाऊ कोण? किंवा निवडणुकीत स्वबळावर लढवणार का? यावर ज्या सध्या चर्चा सुरु आहेत. त्यावर तिन्ही पक्षातील मुख्य नेते एकत्र बसून यावर निर्णय घेतील, असं ते म्हणाले. "निवडणुकीला ही अजून अवधी आहे. पण जरी भाजपाकडून स्वबळावर निवडणूक लढविण्याचे वक्तव्य येत असली तरी जर मुंबईत शिवसेना - उबाठा पक्षाला घरचा रस्ता दाखवायचा असेल तर आम्ही एकत्रच निवडणूक लढवू," अशी प्रतिक्रिया 'ईटीव्ही भारत'शी बोलताना मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली.

मुंबईत भाजपा तर ठाण्यात शिवसेना मोठा भाऊ ठरेल : "1995 पासून मुंबईत शिवसेनेची सत्ता आहे. शिवसेनेमुळे भाजपाने राज्यात हळूहळू आपली ताकद वाढवली. पण सध्याची परिस्थितीपाहता मुंबईत भाजपाच मोठा भाऊ म्हणून सरस ठरेल आणि शिंदेंच्या शिवसेनेला धाकटा भाऊ म्हणूनच मान मिळेल. तर दुसरीकडे ठाण्यात शिंदेंच्या शिवसेनेला मोठा भाऊ असा मान मिळेल आणि भाजपा हा लहान भाऊ असेल. अजित पवार यांना फारसं काही महत्त्व राहणार नाही. राज ठाकरे यांचा भाजपा वापर करून घेईल. शिवसेना आणि भाजपा स्वबळावर निवडणूक अजिबात लढणार नाहीत. एकत्रच निवडणूक लढवतील, आता जरी शिवसेना-भाजपामधील नेत्यांची स्वबळावर लढण्याबाबत वक्तव्य येत असली तरी ही निवडणूक एकत्रच लढवली जाईल. वेगवेगळी लढवण्याची शक्यता फारच कमी आहे," असं मत राजकीय विश्लेषक जयंत माईणकर यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना व्यक्त केलं.

मुंबईत २०१७ च्या निवडणुकीत पक्षीय बलाबल कसे?

पक्ष जागा

  1. शिवसेना - ८४
  2. भाजपा - ८२
  3. काँग्रेस - ३१
  4. राष्ट्रवादी - ९
  5. मनसे - ७

हेही वाचा -

  1. महायुतीमध्ये मोठा भाऊ कोण? अजित पवारांनी स्पष्टच सांगितलं
  2. कोल्हापूर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका रंगणार, महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशीच लढत होणार, सहकाराच्या पंढरीत कोण मारणार बाजी? जाणून घ्या
  3. प्राधान्य महायुतीलाच, पण वेळप्रसंगी स्वबळाची आमचीही तयारी; शिवसेनेचा अहिल्यानगरमध्ये मेळावा