नागपूर Nitin Gadkari PM Post Offer : लोकसभा निवडणुकीच्या निकालाचं चित्र स्पष्ट झाल्यानंतर लगेच 'मला पंतप्रधान पदाची ऑफर होती' असा गौप्यस्फोट केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी केला आहे. विरोधीपक्षाच्या एका नेत्यानं मला पंतप्रधान पदाची ऑफर दिली होती, असं देखील ते म्हणाले. पंतप्रधान होणं माझ्या जीवनाचं लक्ष्य कधीही नव्हतं. मी माझ्या पक्षाशी एकनिष्ठ असल्याचं त्यांनी सांगितलं. नितीन गडकरींच्या या वक्तव्यानं राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
काय म्हणाले गडकरी : लोकसभा निवडणुकीवेळी मला विरोधी पक्षातील एका नेत्याकडून पंतप्रधान पदासाठी पाठिंब्याची ऑफर आली होती. मी त्यांची ऑफर धुडकावली होती. मी त्यांना स्पष्टपणे सांगितलं की, तुम्ही मला पाठिंबा का द्याल आणि मी तुमचा पाठिंबा का बरं घेऊ असं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी स्पष्ट केलं आहे. नितीन गडकरी यांनी नागपुरात एका कार्यक्रमात बोलताना खळबळजनक दावा केला आहे. तसंच मी माझ्या तत्त्वाशी तडजोड करत नसल्याचं ते म्हणाले. नितीन गडकरी यांनी पंतप्रधानपदाची ऑफर नाकारल्याचं स्पष्ट केलं असलं तरी यामुळं राष्ट्रीय स्तरावर आणि महाराष्ट्रातही पुन्हा एकदा गडकरींच्या नावाची चर्चा सुरु होऊ शकते.
प्रामाणिक नेत्यांचा सन्मान व्हायलाचं पाहिजे : याच कार्यक्रमादरम्यान बोलताना नितीन गडकरी म्हणाले, 'एक भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे नेते मला भेटण्यासाठी आले होते. चर्चा सुरु असताना मी त्यांना सहज म्हणालो नागपूर आणि विदर्भात ए.बी. वर्धन मोठे नेते होते. त्यावर ते म्हणाले, ए.बी. वर्धन तर संघाचे विरोधी होते?' त्यावर मी म्हणालो, 'प्रामाणिकपणे विरोध करणाऱ्यांचाही सन्मान करायला हवा. ज्याच्या विरोधात बेइमानी आहे, त्यांचा सन्मान कोण करेल' असा प्रश्न मी त्यांना केला असं नितीन गडकरी म्हणाले आहेत.
हेही वाचा :