नागपूर : केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सरकार येऊन आता ११ वर्ष पूर्ण झाले आहेत. या ११ वर्षाच्या काळात त्यांनी देशासाठी काय-काय केलं याचा लेखा-जोखा जनतेसमोर मांडावा, अशी मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे. ते नागपूर येथे बोलत होते. तसंच विधानसभा निवडणुकीत झालेल्या मतांच्या हेराफेरीवरुनही सपकाळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्लाबोल केलाय.
आश्वासनांवर बोला : "दरवर्षी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे बगलबच्चे हे स्वतःची पाठ थोपटून घेण्यात समाधान मानत असतात. मात्र, त्यांनी तसं करू नये. गरीब आणखी गरीब होत आहे, तर श्रीमंत अधिक श्रीमंत होत आहे. २०१४ साली त्यांनी दरवर्षी २ कोटी नौकरी देऊ असं आश्वासन दिलं होतं. शेतकऱ्यांचे उत्पन्न हे दुप्पट करू, स्वामीनाथन आयोग लागू करणार, दरवर्षी १०० स्मार्ट सिटी तयार करणार अशी विविध आश्वासनं दिली होती. त्यावर त्यांनी बोललं पाहिजे," अशी मागणी सपकाळ यांनी केली आहे.
ठाकरे बंधूंपेक्षा राज्यात...: दोन्ही ठाकरे बंधूंची भेट ही परदेशात झाल्याची चर्चा सुरू आहे. यावर बोलताना ते म्हणाले की, "या भेटीबद्दल तेच चांगल्या पद्धतीने सांगतील. महाराष्ट्रात अनेक समस्या व शेतकरी मुद्दे आहेत. बी-बियाणांचा तुटवडा निर्माण झालेला आहे. शेतकऱ्याला हेक्टरी ५० हजार रुपये दिले गेले पाहिजे. लक्ष विचलित करण्यासाठी हे सगळं सुरू आहे. जे आमच्यासोबत असतील त्यांना आम्ही सोबत घेऊन पुढे जाऊ."
देवेंद्र फडणवीस खरे सूत्रधार : "विधानसभा निवडणुकीत भाजपानं मतांची चोरी केली. याचे सूत्रधार जरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असले तरी देखील प्रशासकीय अधिकारी किरण कुलकर्णी त्याचे सूत्रधार आहेत. संध्याकाळी सहा वाजल्यानंतरच ७४ लाख मतदान कसं वाढलं हे तर ओपन सिक्रेट आहे. त्यामुळे किरण कुलकर्णी यांची नार्को टेस्ट झाली पाहिजे. त्यानंतर मतांची चोरी कशी झाली आहे हे पुढे स्पष्ट होईल," अशी मागणी करत हर्षवर्धन सपकाळ यांनी मुख्यमंत्र्यांवर गंभीर आरोप केलेत.
निवडणूक आयोगावर हल्लाबोल : "निवडणूक आयोगाकडे लेखी तक्रार या अगोदर सुद्धा केल्या आहेत. निवडणूक आयोग तर अमित शाह यांच्या सूचनेनुसार काम करत असल्याचं स्पष्टचं आहे. देवेंद्र फडणीस हे मुख्यमंत्री होण्यापूर्वी काँग्रेसचे शिष्टमंडळ पुराव्यांशी निवडणूक आयोगात गेले होतो. पाच वाजल्यानंतर मतदान कसं काय वाढलं यावर प्रश्न उपस्थित केला. निवडणूक आयोगानं आम्ही मागणी केल्यनंतर लगेच नियम बदलले. त्यामुळेचं केंद्रीय निवडणूक आयोगाची भूमिका संशयास्पद वाटत आहे," असा घणाघात हर्षवर्धन सपकाळ यांनी केलाय.
हेही वाचा -