मुंबई- राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी रात्री मनसे प्रमुख राज ठाकरे यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेऊन चर्चा केली. रात्री झालेल्या स्नेह भोजनाच्या माध्यमातून डिनर डिप्लोमसी करत शिंदे यांनी आगामी मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोर्चेबांधणी केल्याची चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरू झालीय. या भेटीदरम्यान राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत, अमित ठाकरेदेखील उपस्थित होते. विधानसभा निवडणुकीत माहीम मतदारसंघातील लढतीनंतर राज आणि शिंदे यांच्यामध्ये काहीसा दुरावा निर्माण झाल्याचे चित्र होते. ते चित्र पुसण्याचा प्रयत्न शिंदे यांनी केलाय.
ही केवळ सदिच्छा भेट होती : या भेटीबाबत बोलताना एकनाथ शिंदे यांनी या भेटीत राज ठाकरेंसोबत कोणतीही राजकीय चर्चा झाली नसल्याची माहिती दिली. ही केवळ सदिच्छा भेट होती आणि या चर्चेत बाळासाहेबांच्या आठवणीत रमलो असल्याचे शिंदे म्हणाले. आम्ही दोघांनी एकत्र काम केलंय, मुंबईतील सिमेंटच्या रस्त्यासंदर्भात आपली चर्चा झाली. विधानसभा निवडणुकीनंतर आम्हाला एकत्र गप्पा मारायच्या होत्या, त्यासाठी ही भेट झाल्याचा दावा शिंदेंनी केलाय. या भेटीवेळी आणि स्नेहभोजनाला उपस्थित असलेले उद्योगमंत्री उदय सामंत यांनी राज ठाकरे आमच्यासोबत आले तर आपल्याला नक्कीच आनंद होईल, असंही वक्तव्य केलंय.
एकनाथ शिंदेंना राज ठाकरेंकडून स्नेहभोजनाचे निमंत्रण : याबाबत बोलताना मनसेचे मुंबईचे अध्यक्ष संदीप देशपांडे म्हणाले की, दोन नेते भेटले की राजकीय चर्चाच होते, असे नाही. एकनाथ शिंदे यांना राज ठाकरेंनी स्नेहभोजनाचे निमंत्रण दिले होते. त्यामध्ये बाळासाहेब ठाकरे यांच्या आठवणींना उजाळा मिळाला. या भेटीत कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही, केवळ वैयक्तिक चर्चा झाली, राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे हे बाळासाहेब ठाकरेंचे हिंदुत्ववादी विचार पुढे नेत आहेत, त्यामुळे आमच्यामध्ये कोणतेही वैचारिक मतभेद नाहीत, विचारांची तफावत नाही, असे देशपांडे यांनी स्पष्ट केलंय. युतीबाबत सध्या कोणतीही चर्चा नसून जेव्हा याबाबत काही चर्चा होईल, तेव्हा माहिती दिली जाणार आहे, असे देशपांडे यांनी सांगितलंय.
हेही वाचा :