दौंड - राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एका भाषणामध्ये धीरुभाई अंबानी हे पेट्रोल सोडून कोट्यधीश बनले असल्याचं विधान केलं आहे. याबाबत काही ठिकाणी अजित पवार यांनी पेट्रोल चोरून कोट्यधीश बनले असल्याबाबत विधान केल्याची चर्चा सुरू आहेत. यामुळे पुन्हा एकदा नव्या वादाला सुरुवात झाली आहे. तर याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी अजित पवार यांची खोट्या बातम्या दाखवून बदनामी करू नका असं आवाहन केलं आहे.
अजित पवार यांचे स्पष्टीकरण - यासंदर्भात स्वतः उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्टीकरण दिलय. त्यांनी यापूर्वी काही विधानं केली होती. त्याची आठवण करुन देऊन अशा विधानाची आपण जबर किंमत मोजल्याचं स्पष्ट म्हटलय. तसंच आपण जबाबदार राजकारणी असून अशी वक्तव्ये आता करुच शकत नाही. आपण योग्य शब्दच वापरला होता. जर वेगळा शब्द वापरला असेल तर राजकारण सोडेल, असं स्पष्टीकरण अजित पवार यांनी आज बारामतीमध्ये दिलय.

याबाबत अजित पवार यांच्या विधानाचा विपर्यास केला जात असल्याचं राष्ट्रवादी काँग्रेसकडून सांगण्यात येत आहे. हवं तर अजितदादांच्या धिरुभाई अंबानी यांच्या संदर्भातील भाषणाची फॅारेंन्सिक टेस्ट करा. परंतु विनाकारण ध चा मा करून चुकीच्या बातम्या प्रसारित करू नका. भाषणामधील वाक्यामध्ये पेट्रोल "सोडून" ऐवजी "चोरून" हा शब्द उच्चारल्याचे सांगितले जात आहे. दोन्ही शब्दांमध्ये 3 अक्षरं आहेत."चोरून" म्हणायचं असतं तर मधल्या अक्षराचा उच्चार "र" असायला हवा होता. परंतु भाषणामध्ये अगदी स्पष्टपणे मधल्या अक्षराचा उच्चार "ड" असा आहे. म्हणजे भाषणातील वाक्य "धीरुभाई अंबानी हे पेट्रोल सो‘डू‘न एवढे मोठे उद्योगपती झाले" असाच आहे आणि ते "सो‘डू‘न" या शब्दामधील "ड" या अक्षराच्या उच्चारासह स्पष्टपणे ऐकू येत आहे. तरीही काही प्रसारमाध्यमे चुकीच्या बातम्या प्रसारित करत आहेत हे दुर्दैवी आहे.
जर तरीही कुणाला शंका असेल तर अजित दादांच्या त्या भाषणाची "फॅारेंन्सिक टेस्ट" करावी. परंतु चुकीच्या बातम्या दाखवून एका महान उद्योगपतीच्या संदर्भाने अजितदादांच्या नावावर न बोललेल्या खोट्या वाक्याचे बिल फाडू नये. - उमेश पाटील, माजी मुख्य प्रवक्ता एनसीपी