जळगाव : सुरेश धस यांनी धनंजय मुंडे यांची भेट घेतल्यानं विरोधकांनी धस यांना लक्ष केलं आहे. या प्रकरणावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, "कोण कुणाला भेटलं याच्यावर जर असं राजकारण होत असेल तर लोकशाहीमध्ये ते कसे योग्य ठरेल. सुरेश धस यांनी या प्रकरणात गंभीर भूमिका घेतली आहे. ती सर्वांनी पाहिली. ते गंभीर भूमिका घेत असताना त्या माध्यमातून संवादच तोडून टाकायचा असं करणं योग्य नाही. लोकशाहीमध्ये संवाद हा सुरू राहिला पाहिजे. धनंजय मुंडे हे सुद्धा राज्याचे मंत्री आहेत. त्यामुळं एखादा आमदार, एखाद्या मंत्र्याला भेटला तर काय फरक पडतो?"
अमृता याचं गाणं सर्व समाजाला आवडलं : खासदार संजय राऊत यांच्याबद्दल विचारलेल्या प्रश्नावर देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "मुर्खांना मी उत्तर देत नाही. हे माहीत असतानाही तुम्ही हे विचारता". तर अमृता फडणवीस यांच्या गाण्याबाबत बोलताना फडणवीस म्हणाले की, "संत सेवालाल महाराजांच्या जयंतीच्या पार्श्वभूमीवर ते गाणं रिलीज झालं. फक्त बंजाराच नाही तर सर्व समाजाला ते गाणं आवडलं. एक प्रकारे ते आपल्या गुरूंच्या प्रती, संतांच्या प्रती एक आराधना आहे".
मराठी शाळेची टक्केवारी घसरली : मुंबईत मराठी शाळांची टक्केवारी घसरली त्याबद्दल देवेंद्र फडणवीस यांनी भूमिका मांडली. ते म्हणाले की, "कुठल्याही मराठी शाळा बंद होणार नाही, याबाबत सातत्यानं आम्ही निर्देश दिले आहेत. शाळा इंग्रजी असो की, हिंदी असो त्यांना मराठी शिकवावं लागणार आहे. त्याची सक्ती आपण केली आहे. या सक्तीचं ते योग्य प्रकारे पालन करत आहेत की, नाही याकडं आमचं लक्ष आहे. त्यामुळं कुठल्याही शाळेला मराठी हे शिकवावं लागेल, अशा पद्धतीचा निर्णय आहे".
जळगाव पोलीस अपहरण : जळगावतील चोपडा येथील पोलीस कर्मचाऱ्याचं अपहरण आणि त्यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या घटनेबाबत फडणवीस म्हणाले की, "मध्यप्रदेश पोलिसांना आपण सांगितलं आहे की, तुमच्याकडं या पद्धतीच्या होणाऱ्या बेकायदेशीर कारवाया रोखल्या गेल्या पाहिजे. या सगळ्या गोष्टींच्या परिणाम आमच्याकडं होत आहे. दोन्ही राज्यांच्या पोलीस दलात समन्वय निर्माण करण्याचे प्रयत्न सुरु आहेत."
हेही वाचा -