मुंबई : चला हवा येऊ द्या फेम भाऊ कदम यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा विधानसभा निवडणुकीत प्रचार करण्याचा निर्णय घेतला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भाऊ कदम यांनी आज भेट घेतली. स्टार प्रचारक म्हणून आपण राज्यभरात पक्षाचं काम करणार असल्याचं कदम यांनी सांगितलं. मंगळवारी सकाळी भाऊ कदम यांनी अजित पवार यांची भेट घेतली. त्यावेळी राष्ट्रवादीचे प्रदेशअध्यक्ष सुनील तटकरे, सिद्धार्थ कांबळे उपस्थित होते.
एक-दोन दिवसात बंडखोरांची समजूत काढू - काही मतदारसंघात कार्यकर्त्यांनी अर्ज दाखल केले असले तरी आम्ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची अजित पवार यांच्यासोबत चर्चा झाली असून जे मतदारसंघ सोडण्याचा निर्णय झाला आहे त्या ठिकाणी एकत्रित काम करुन विजय मिळवू असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी व्यक्त केला. देवळाली जागेवरील वादाबाबत हेमंत गोडसे यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे समजूत काढण्यात यशस्वी होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. ही जागा राष्ट्रवादीची आहे. विद्यमान आमदार सरोज अहिरे या ठिकाणी महायुतीच्या उमेदवार आहेत, असं तटकरे म्हणाले.
अजित पवारांचं मोठं योगदान - अजित पवारांनी बारामतीत प्रचंड काम केलं असून बारामतीकरांना त्यांचं काम माहीत आहे. त्यामुळे देशभरात नेहमीच बारामती पॅटर्नचं कौतुक झालं आहे. त्यामध्ये अजित पवारांचं मोठं योगदान आहे. त्याबाबत बारामतीच्या जनतेला माहिती आहे. त्यामुळे सुज्ञ बारामतीकर विधानसभेत कुणाला पाठवायचे हे ठरवतील, असं तटकरे म्हणाले. त्यामुळे अजित पवार मोठ्या मताधिक्याने विजयी होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. महायुती 288 जागांवर पूर्ण ताकदीने लढत असून आम्ही या निवडणुकीत विजयी होऊ असा विॆश्वास त्यांनी व्यक्त केला. राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या जाहीरनाम्याचं बुधवारी प्रकाशन करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
हेही वाचा...