मुंबई- बारामती लोकसभा निवडणुकीत पत्नी सुनेत्रा पवार यांना बहिण सुप्रिया सुळे यांच्या विरोधात उमेदवारी देऊन चूक केल्याचं उपमुख्यमंत्री पवार यांनी म्हटलं. ते एका माध्यमाशी मुलाखतीत बोलत होते.
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यात 'जन सन्मान' यात्रा काढली आहे. त्या संदर्भात एका माध्यमाशी बोलताना अजित पवार यांनी बारामती लोकसभा निवडणुकीबाबत वक्तव्य केलं. उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, "सुनेत्रा पवार यांना बारामती लोकसभा निवडणुकीत उमेदवारी देणं, ही माझी चूक होती. राजकारण घरात येऊ देऊ नये. राजकारण हे राजकारणाच्या जागी तर कुटुंब हे कुटुंबाच्या जागी असते. राखीपौर्णिमेला तुम्ही सुप्रिया सुळे यांची भेट घेणार का, असा प्रश्न विचारला असता त्यांनी दौऱ्याच्यावेळी तिथे असल्या तर सुप्रिया सुळे यांची राखीपौर्णिमेला भेट घेणार असल्याचं सांगितलं.
माझे सर्व बहिणींवर माझे प्रेम आहे. घरात राजकारण येऊ देऊ नये. माझ्या बहिणीविरुद्ध सुनेत्रा पवार यांना निवडणुकीच्या मैदानात उतरविण्याची मी चूक केली आहे. असे व्हायला नको होतं. पण राष्ट्रवादीच्या संसदीय मंडळानं सुनेत्रा पवार यांना उमेदवारी देण्याचा निर्णय घेतला. ते चुकीचे होते, असे मला वाटते-उपमुख्यमंत्री अजित पवार
शरद पवार यांच्या टीकेवर बोलणार नाही-"शरद पवार हे ज्येष्ठ नेते तसेच कुटुंबाचे प्रमुख आहेत. त्यांनी केलेल्या कोणत्याही टीकेला उत्तर देणार नाही," असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितलं. यापूर्वी अजित पवार यांनी थेट उल्लेख न करता शरद पवार यांनी निवृत्त व्हावं, असं वक्तव्य केलं होतं. लोकसभा प्रचार निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शरद पवार यांचा उल्लेख 'भटकती आत्मा' असा उल्लेख केला होता. त्यावर नुकतेच अजित पवार यांनी माध्यमांशी बोलताना पंतप्रधान मोदींनी तसे वक्तव्य करायला नको होते, असं म्हटलं होतं.
सुनेत्रा पवार यांचा सुप्रिया सुळे यांच्याकडून पराभव- अजित पवार यांनी राष्ट्रवादीतून बाहेर पडल्यानंतर थेट लोकसभा निवडणुकीत खासदार सुप्रिया सुळे यांच्या विरोधात पत्नी सुनेत्रा पवार यांना उमेदवारी दिली. बारामती लोकसभा मतदारसंघात प्रथमच पवार घराण्यातील दोन उमेदवार लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरले. सुनेत्रा पवार यांच्या प्रचाराकरिता पंतप्रधान मोदी यांनी पुण्यात मोठी प्रचार सभा घेतली. तसेच अजित पवार यांनीदेखील सुनेत्रा पवार यांच्या विजयासाठी संपूर्ण शक्ती पणाला लावली. मात्र, सुप्रिया सुळे यांनी सुनेत्रा पवार यांचा मोठा मताधिक्यानं पराभव केला. अजित पवार आणि शरद पवार यांच्यासाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची असल्यानं या निवडणुकीची देशभरात चर्चा झाली होती. मात्र, सुनेत्रा पवार यांना भाजपाच्या कोट्यात राज्यसभेची उमेदवारी मिळवून देण्यात अजित पवार यांना यश आलं. सुनेत्रा पवार या राज्यसभेच्या खासदार आहेत.
हेही वाचा-