वॉशिंग्टन - २००८ च्या मुंबई दहशतवादी हल्ल्यातील मुख्य आरोपी तहव्वुर राणा याची भारतात प्रत्यार्पण रोखण्याची याचिका अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली आहे. याबाबत सर्वोच्च न्यायालयानं आज आदेश दिले आहेत.
अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयानं सोमवार, ७ एप्रिल २०२५ रोजी दिलेल्या आदेशात म्हटलं, मुख्य न्यायाधीशांना उद्देशून न्यायालयाकडं पाठवलेला स्थगितीचा अर्ज फेटाळला जात आहे. मूळ पाकिस्तानचा वंशज असलेल्या राणानं २० मार्च २०२५ रोजी मुख्य न्यायाधीश रॉबर्ट्स यांच्याकडे अर्ज करत भारतात होणाऱ्या प्रत्यार्पणाला स्थगिती मिळावी, अशी मागणी करण्यात आली होती. यापूर्वी, अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीश एलेना कागन यांनी मार्चमध्ये राणाची प्रत्यार्पणाला विरोध करणारी याचिका फेटाळली होती.
प्रत्यार्पणाची ट्रम्प यांनी केली होती घोषणा-भारतात राष्ट्र, धर्म आणि सांस्कृतिक कारणांमुले जीविताला धोका होईल, अशी राणानं भीती व्यक्त केली होती. तसेच पार्किन्सचा आजार असताना मूत्राशयाचा कर्करोग होण्याची शक्यता असल्याचं म्हटलं होतं. फेब्रुवारीच्या सुरुवातीला पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अमेरिकेचे दौऱ्यावर गेले होते. त्यावेळी द्विपक्षीय बैठकीनंतर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी तहव्वुर राणा याचं भारतात प्रत्यार्पण करण्याची घोषणा केली होती
कोण आहे तहव्वुर राणा- तहव्वुर राणा हा पाकिस्तानी-अमेरिकन दहशतवादी डेव्हिड हेडलीचा सहकारी आहे, राणा हा २६ नोव्हेंबर २००८ मध्ये मुंबईवर झालेल्या हल्ल्यातील मुख्य सूत्रधारांपैकी एक आहे. पाकिस्तानी वंशाचा व्यापारी, डॉक्टर आणि उद्योजक असलेल्या राणाचा थेट लष्कर-ए-तैयबा (एलईटी) आणि पाकिस्तानच्या इंटर-सर्व्हिसेस इंटेलिजेंसशी (आयएसआय) संबंध असल्याचा आरोप आहे. भारतात त्याला आणण्यात आल्यानंतर त्याच्यावर नव्यानं खटला चालविला जाण्याची शक्यता आहे. मुंबईवरील हल्ल्यातील आरोपी अजबल कसाब याला पकडल्यानंतर पाकिस्तानमध्ये त्याला सैन्यदलाकडून प्रशिक्षण दिल्याची माहिती समोर आली होती. हशतवाद्यांसाठी पाकिस्तान हे नंदनवन असल्याच्या भारताचे आरोप खरे ठरले होते. थेट पाकिस्तानचा दहशतवादी हल्ल्यात सहभाग आढळल्यानंतर भारत-पाकिस्तानचे संबंध बिघडले.
हेही वाचा-