स्टॉकहोम- पर्यटनासाठी जगभरात प्रसिद्ध असलेलं स्वीडन देश हा शाळेतील गोळीबारानं ( sweden gun firing) हादरला आहे. स्वीडनच्या स्थानिक वेळेनुसार मंगळवारी दुपारी ओरेब्रो शहरातील रिसबर्गस्का स्कोलन शाळेत गोळीबार झाला. या गोळीबाराची स्वीडनच्या पोलिसांनी पुष्टी केली. शाळेतील गोळीबारात १० जणांचा मृत्यू झाला. त्याचबरोबर गोळीबार करणाऱ्या संशयिताचादेखील मृत्यू झाल्याचं पोलिसांनी सांगितलं.
रिसबर्गस्का स्कोलन शाळेत २० वर्षांपेक्षा जास्त वयाच्या मुलांना शिक्षण दिलं जातं. स्थलांतरितांसाठी प्राथमिक आणि माध्यमिक शालेय अभ्यासक्रम तसेच स्वीडिश भाषेचे वर्ग शाळेत घेण्यात येतात. या शाळेतील गोळीबारामुळे स्वीडनमध्ये चिंता व्यक्त होत आहे. पंतप्रधान उल्फ क्रिस्टरसन यांनी शाळेतील गोळीबार हा इतिहासातील सर्वात भयकंर गोळीबार असल्याचं म्हटलं आहे. जनतेनं हल्ल्याबाबत कोणत्याही अटकळींपासून दूर राहत पोलीस अधिकाऱ्यांना चौकशीसाठी वेळ द्यावा, असे स्वीडनच्या पंतप्रधानांनी आवाहन केलं. प्राथमिक निष्कर्षांवरून संशयितानं एकट्यानंच गोळीबार केल्याचं दिसून आल्याचं एका वृत्तसंस्थेनं म्हटलं आहे. हल्लेखोर हा दहशतवादी होता का? याबाबत अधिकृत माहिती समोर आली नाही.
जे बाहेर घडते, तेच शाळेत घडते- "स्वीडिश जनतेला हल्ल्यामागची कारणं जाणून घ्यायची आहेत. परंतु त्यांना उत्तरांसाठी वाट पाहावी लागेल. पोलिसांच्या तपासानंतर चित्र स्पष्ट होईल," असे स्वीडिश न्यायमंत्री गुन्नार स्ट्रॉमर यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं. स्वीडिश रेडिओशी (SR) बोलताना स्थानिक शाळा सुरक्षातज्ञ लीना लजुंगडाहल म्हणाल्या, "स्वीडनमध्ये शाळांमध्ये सशस्त्र हिंसाचार ही अत्यंत दुर्मीळ घटना आहे. मात्र, शैक्षणिक संस्थांबाहेर हिंसाचार वाढला आहे. अलीकडच्या काही वर्षांत शाळांजवळ अनेक गोळीबाराच्या घटना घडल्या आहेत. जे बाहेर घडते, तेच शाळेत घडते. "
- स्वीडनमध्ये सशस्त्र हिंसाचाराच्या घटना, स्फोट आणि गोळीबाराच्या घटना वाढल्याची माहिती एसआरचे राजकीय विश्लेषक मॅट्स नटसन यांनी दिली. "स्वीडन आता संकटाच्या परिस्थितीत आहे. एकत्र आणण्याची जबाबदारी सरकारची आहे," असे एसआरचे राजकीय विश्लेषक मॅट्स नटसन यांनी म्हटलं.