कराची- पाकिस्तानमध्ये गाढवांच्या किमती वाढल्या आहेत. बाजारात एका गाढवाची किंमत 2,00,000 रुपयांपर्यंत पोहोचली आहे. कारण, चीनमधून गाढवांची खरेदी करण्याचं प्रमाण आणि मागणी सातत्यानं वाढत आहे.
चीनमध्ये एजियाओच्या औषधाच्या उद्योगात अब्जावधी डॉलर्सची उलाढाल होते. या उद्योगात गाढवाची कातडी तयार करून औषध करण्यात येते. या औषधामुळे उर्जा मिळणे, रोगप्रतिकारक शक्ती वाढविणं असे फायदे मिळत असल्याचा दावा करण्यात येतो. त्यामुळे औषध तयार करण्यासाठी गाढवांची कातडी हा आता जागतिक व्यापार झाला आहे. कारण, त्यांची मागणी पुरवठ्यापेक्षा जास्त आहे, असे कराचीमधील पु-शेंग मेडिकल सेंटर चालवणारे डॉ. प्रोफेसर गुओ जिंग फेंग यांनी सांगितलं.
गाढवाची किंमत मजुरांच्या आवाक्याबाहेर- सर्वात मोठी गाढव बाजारपेठ असलेल्या कराचीमध्ये सर्वात स्वस्त आणि निरोगी गाढवाची किंमत 1,55,000 रुपये आहे. ही किंमत व्यवसायासाठी गाढवावर अवलंबून असलेल्या मजुरांच्या आवाक्याबाहेर आहे. गाढवे हा अनेक उद्योगांचा अविभाज्य भाग आहे. त्यापैकी प्रमुख म्हणजे वीटभट्टी, वाहतूक, शेती, कचरा संकलन आदी कामासाठी गाढवांचा उपयोग होतो. पाकिस्तानमध्ये काम करणाऱ्या गाढवांची संख्या 5.9 दशलक्ष असल्याचा अंदाज आहे. केवळ पाकिस्तानमध्येच नाही तर जागतिक स्तरावरील अहवालानुसार जगभरात सुमारे 50 कोटी गरीब लोक हे घोडे, गाढवे आणि खेचरावर उदरनिर्वासाठी अवलंबून आहेत.
चीनला लाखो गाढवांची गरज- पारंपारिक चिनी औषधांमध्ये वापरल्या जाणाऱ्या तीन टॉप टॉनिकपैकी एजियाओ हे आहे. चीनमध्ये गाढवांच्या कातड्यांची मागणी आहे. गेल्या पाच वर्षांत एजियाओ उत्पादनांच्या उत्पादनात 160 टक्के वाढ झाली आहे. ही मागणी पूर्ण करण्यासाठी चीनला लाखो गाढवांच्या कातड्यांची गरज भासत आहे. कराची चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीच्या मते गाढवांचं मांस हराम आहे. त्याचा व्यावसायिक, अनैतिक आणि बेकायदेशीर वापर केला जाणार नाही, याची खात्री करण्यासाठी नियमांचं पालन करणं आवश्यक आहे.
हेही वाचा-