इस्लामाबाद : पाकिस्तानच्या बलुचिस्तान प्रांतात रविवारी सैन्याच्या ताफ्यावर झालेल्या हल्ल्यात अनेक सैनिक ठार झाले आहेत. दक्षिण-पश्चिम पाकिस्तानमध्ये सुरक्षा दलांना घेऊन जाणाऱ्या बसजवळ रस्त्याच्या कडेला बॉम्बचा स्फोट झाला, अशी माहिती पोलिसांनी दिली. स्थानिक पोलीस प्रमुख जफर जमानानी यांनी सांगितलं की, हा हल्ला बलुचिस्तानमधील नौशाकी जिल्ह्यात झाला. स्फोटामुळं जवळच असलेल्या आणखी एका बसचंही मोठं नुकसान झालंय. मृत आणि जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलंय.
स्फोटकांनी भरलेले वाहन सैन्याच्या ताफ्याला धडकवलं : प्राथमिक तपासात हा आत्मघाती हल्ला असल्याचं दिसतंय. एका आत्मघाती हल्लेखोरानं स्फोटकांनी भरलेले वाहन सैन्याच्या ताफ्यावर घातल्यानं मोठा स्फोट झाला. पाकिस्तानी वृत्तपत्र 'द डॉन'ने अधिकाऱ्यांच्या हवाल्यानं म्हटलं आहे की, नोशाकी येथील राष्ट्रीय महामार्गावर पाकिस्तानी सैन्याच्या फ्रंटियर कॉर्प्स (एफसी) च्या ताफ्यावर हा हल्ला करण्यात आला.
कोणीही जबाबदारी स्वीकारली नाही : बलुचिस्तानचे मुख्यमंत्री सर्फराज बुगती यांनी या हल्ल्याचा निषेध केला आहे. या घटनेची सध्या तरी कोणीही जबाबदारी स्वीकारली नाही, मात्र, बलुच लिबरेशन आर्मीनं हा हल्ला केला असल्याचा संशय स्थानिकांनी व्यक्त केला. याच संघटनेनं काही दिवसांपूर्वी ट्रेनवर हल्ला केला होता, सुमारे 400 लोकांना त्यावेळी ओलीस ठेवलं होतं. तसंच 26 ओलिसांना ठार मारले होते.
काय आहे हल्लेखोरांची मागणी? : हल्ल्यानंतर सुरक्षा दलानं या भागात ऑपरेशन राबवत सर्व 33 हल्लेखोरांना ठार केलंय. तेल आणि खनिजांनी समृद्ध बलुचिस्तान हा पाकिस्तानचा सर्वात मोठा आणि कमी लोकसंख्या असलेला प्रांत आहे. जातीय बलूच रहिवाशांनी केंद्र सरकारवर भेदभावाचा आरोप केला आहे. इस्लामाबादनं हा आरोप फेटाळून लावला आहे. त्यामुळं बलुच लिबरेशन आर्मी केंद्र सरकारकडे स्वातंत्र्याची मागणी करत आहे.
हेही वाचा
रेल्वे हल्ल्यानंतर पाकिस्तानी सैन्याच्या तळावर आत्मघातकी हल्ला, बीएलएनं काय केली मागणी?