- लेखक काजल गणवीर
menopause: बदलती जीवनशैली, मुलांचं संगोपन, करिअर, कौंटुबिक जबाबदाऱ्या तसंच कामाचं ताण यामुळे महिला आपल्या आरोग्याकडे लक्ष देत नाही. ज्याचे गंभीर परिणाम त्यांच्या आरोग्यावर होतात. त्याचबरोबर वयानुसार देखील महिलांना अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. प्रत्येक महिन्यात येणाऱ्या मासिक पाळी सोबतच महिलांनी वयाची चाळीशी किंवा पन्नाशी ओलांडल्यानंतर रजोनिवृत्ती अर्थात मेनोपॉजच्या टप्प्यातून जावं लागते. हा टप्पा महिलांसाठी अतिशिय महत्वाचा आहे. पाश्चात्य देशाच्या तुलनेत भारतामधील महिलांना वयाच्या 46 वर्षाच्या आसपास रजोनिवृत्तीच्या टप्प्यातून जावं लागते. रजोनिवृत्ती अर्थात मेनोपॉजच्या टप्प्यामध्ये महिलांच्या दैनंदिन जीवनावर मोठा परिणाम होतो असं नुकत्याच प्रकाशित झालेल्या एका सर्वेक्षणातून दिसून आलं आहे. चला तर जाणून घेऊया रजोनिवृत्ती दरम्यान होणारे बदल आणि उपाय.
- तज्ञ काय म्हणतात?
प्रसिद्ध महिलारोगतज्ञ डॉ. रेनुका कोल्हापूरकर यांच्या मते, रजोनिवृत्तीच्या काळात महिलांमध्ये इस्ट्रोजेन, टेस्टोस्टेरॉन आणि प्रोजेस्टेरॉन हार्मोन्सची पातळी कमी होण्याची शक्यता जास्त असते. या काळात इस्ट्रोडजेनची पातळी कमी झाल्यामुळे अनेक महिलांमध्ये भावनिक चढउतार बघायला मिळतात. तसंच हार्मोनल बदलांचा मेंदूतील रासायनिक संतुलनावर विपरीत परिणाम होतो. परिणामी त्याचा थेट मूडवर प्रभाव पडतो. मेनोपॉज दरम्यान महिलांनी आपल्या आहाराकडे विशेष लक्ष द्यावं. तसंच आपल्यात होणाऱ्या बदलांबद्दल इतरांशी संवाद साधावा यामुळे महिलांना फायदा होतो.
- काय सांगतो अभ्यास: अबॉट आणि इप्सोस यांनी नुकत्याच केलेल्या एका सर्वेक्षणामध्ये, रजोनिवृत्तीचा महिलांच्या दैनंदिन जीवनावर मोठा परिणाम होत असल्याचे मत 87टक्के महिलांनी व्यक्त केलं आहे. यात 80 टक्के महिलांनी रजोनिवृत्ती दरम्यान होणाऱ्या समस्या किंवा प्रश्न कुटुंबीयांशी तसंच मित्र-मैत्रिणींजवळ शेअर करणे अवघड असल्याचं सांगितलं आहे. रजोनिवृत्ती दरम्यान महिलांना झोप न येणे, घामाघूम होणे, रात्री जास्त घाम येणे, मूड स्विंग्ज यासारख्या समस्यांचा सामना करावा लागतो आणि या समस्या इतरांना सांगणे त्यांच्यासाठी कठीण असतात. अबॉट आणि इप्सोस यांनी केलेल्या सर्वेक्षणामध्ये 1200 हून अधिक लोकांचे विचार नोंदवण्यात आले असून वेगवेगळ्या सात शहरांतील ही लोकं होती. रजोनिवृत्ती अर्थात मेनोपॉजबद्दल महिलांचा दृष्टिकोन काय आणि रजोनिवृत्तीदरम्यान त्यांना कोणत्या समस्यांचा सामना करावा लागतो याचा अंदाज घेणे हे या सर्वेक्षणामागील उद्देश होता. सर्वेक्षणामध्ये 45-55 वर्षे वयोगटातील स्त्रिया तसेच कुटुंबातील सदस्यांचा समावेश करण्यात आला होता.
- 80 टक्के महिलांना एकाग्रता साधणे कठीण: सर्वेक्षणातून केलेल्या अभ्यासमध्ये असं आढळून आलं की रजोनिवृत्तीचा सर्वात जास्त परिणाम नोकरी करणाऱ्या महिलांना सहन करावा लागतो. नोकरी करणाऱ्या महिलांपैकी 80 टक्के महिलांना एकाग्रता साधणे कठीण होते. तसंच 73 टक्के महिलांना वारंवार कामावरून रजा घ्यावी लागते. त्याचबरोबर 66 टक्के महिलांना मनोवस्थेतील चढउतारांचा सामना करावा लागतो. त्यात मुड स्विंग्ज आणि चिडचिडेपणाचा समावेश आहे. या समस्यांमुळे त्यांचा दैनंदिन कामावर आणि उत्पादकतेवर तसंच करिअरमधील प्रगतीवर गंभीर परिणाम होऊ शकतो.

- रजोनिवृत्ती दरम्यान आरोग्यावर होणारे परिणाम
- मूड स्विंग्ज: रजोनिवृत्तीमध्ये महिलांना मूड स्विंग्सचे प्रमाण जास्त आहे. यावेळी एखादी स्त्री एका क्षणी अचानक अत्यंत दु:खी तर दुसऱ्या क्षणी आनंदी होवू शकते. यामुळे वैयक्तिक नातेसंबंधावर तसंच दैनंदिन जीवनावर नकारात्मक परिणाम होण्याची दाट शक्यता असते असं तज्ञांचं म्हणणं आहे.
- रात्री जास्त घाम येणे: रजोनिवृत्ती दरम्यान रात्री घाम येणे सहाजिक आहे. अशावेळी शरीर पूर्णपणे घामानं भिजू शकते. यामुळे झोप येणे कठीण होते. तसंच उर्जापातळीवर आणि मनस्थितीवर विपरीत परिणाम होवू शकतो.
- मेंदूवर परिणाम: रजोनिवृत्ती दरम्यान केवळ भावनिक आरोग्यावर परिणाम होत नाही तर मेंदूच्या कार्यावरही परिणाम होतो. शरीरातील इस्ट्रोजनचे प्रमाण कमी झाल्यामुळे मेंदूतील रासायनिक संतुलन बिघडू शकते. यामुळे महिलांना स्मृती संबंधित समस्यांचा सामना करावा लागू शकतो. तसंच स्मरणशक्ती आणि संज्ञात्मक कार्यात देखील लक्षणीय बदल दिसू शकतात. मेंदूच्या कार्यपद्धतीत बदल झाल्यामुळे विचार करण्याची गती कमी होऊ शकते. यामुळे कामे करताना विचार करण्याची गती मंदावते. परिणामी अनेक अडचणींचा समाना करावा लागू शकतो.
- हॉट फ्लॅश: रजोनिवृत्ती दरम्यान हॉट फ्लॅस ही सर्वात सामान्य समस्या आहे. यामुळे अनचानक उष्णतेची भावना निर्माण होते. जी सहसा छातीवर, मान आणि चेरऱ्यावर सर्वात तीव्र असते. यालाच हॉट फ्लॅश म्हणतात. यामध्ये शरीराचं तापमानात अचाणक वाढते. तसंच शरीर लालसर देखील होते. त्याचबरोबर अचानक धडधड वाढते. साधारणता आठवड्यातून तसंच कधीकधी दिवसातून 20 ते 30 मिनिटं हा त्रास होतो. यामुळे झोपेत अडथडा निर्माण होतो.
- अनियमित पाळी: रजोनिवृत्तीचा काळ जवळ येत असताना मासिक पाळीत अनियमितता दिसू लागते. यामागील मुख्य कारण म्हणजे शरीरातील हार्मोनल बदल आहे. रजोनिवृत्तीच्या काळात मासिक पाळी नेहमीपेक्षा कमी किंवा जास्त काळ जावू शकते तसंच रक्तप्रवाह कमी किंवा जास्त होवू शकतो.
- हार्ट अटॅकचा धोका जास्त: युनिव्हर्सिटी ऑफ टेक्सास साउथवेस्टर्न मेडिकल सेंटर, यूएस 2015 मध्ये झालेल्या एका अभ्यासाच्या लेखिका डॉ. स्टेफनी मोरेनो यांच्या मते, रजोनिवृत्तीनंतर महिलांमध्ये हार्ट अटॅकचा धोका वाढतो. यामागील मुख्य कारण म्हणजे, रजोनिवृत्तीदरम्यान महिलांमध्ये अनेक हार्मोनल बदल होतात. या काळात महिलांच्या शरीरातील एस्ट्रोजन हार्मोन कमी होत जातो. रजोनिवृत्तीपूर्वी शरीरात एस्ट्रोजन प्रमाण अधिक असते. शरीरात एस्ट्रोजन कमी प्रमाणात असल्यास महिला सुरक्षिततेची हमीही कमी होते. ज्यामध्ये कोरोनरी आर्टरी डिसीजसारख्या समस्यांचा समावेश आहे.

- रजोनिवृत्ती दरम्यान हा आहार घ्या
- भरपूर फळं आणि पालेभाज्या घ्या: फळं आणि पालेभाज्यांमध्ये जीवनसत्त्वे, फायबर, अॅंटिऑक्सिडंट्स तसंच खनिजे पुरेशा प्रमाणात असतात. जे चांगल्या आरोग्यासाठी आवश्यक आहेत. आहारात विशेषत: कोबी, केळ, ब्रोकोली, बोक चाय, ब्रसेल्स स्प्राउट्स यासारख्या क्रूसिफेरस भाज्यांचा समावेश करणे फायदेशीर आहे. कारण त्या इस्ट्रोजेनची पातळी कमी करण्यास तसंच हार्मोनल संतुलन राखण्यास मदत करतात. त्याचबरोबर स्ट्रॉबेरी आणि ब्लूबेरी सारखी गडद रंगाची फळं रक्तदाब कमी करण्यास मदत करू शकतात. म्हणून दररोज कच्ची, ताजी हंगामी फळं आणि पालेभाज्या खाण्याची शिफारस तज्ञ करतात.
- व्हिडॅमिन डी आणि कॅल्शियम असलेले पदार्थ: या काळाताली हार्मोनल बदलांमुळे हाडं कमकुवत होऊ शकतात. त्यामुळे त्यांना मजबूत ठेवण्यासाठी तसंच ऑस्टियोपोरोसिसचा धोका कमी करण्यासाठी तुमच्या आहारात पुरेसे व्हिटॅमिन डी आणि कॅल्शियम असणे अत्यंत आवश्यक आहे. तुम्ही तुमच्या आहारात दही, दूध, हिरव्या भाज्या, बीन्स, टोफू, चीज, अंजीर, मणूके यासारख्या पदार्थांचा समावेश करा. यामुळे हाडे निरोगी राहतात तसंच व्हिटॅमिन डी सुधारण्यास देखील मदत होते.
- संपूर्ण धान्य: रजोनिवृत्ती दरम्यान संपूर्ण धान्य खाणं चांगलं आहे. कारण यामध्ये व्हिटॅमिन, नियासिन, फायबर, थायमिन यासरखे पोषक घटक असतात. तुम्ही तुमच्या आहारात राजगिरा, कॉर्न, बार्ली,ओट्स, बाजरी यासारख्या पदार्थांचा समावेश करू शकता.
- फायटोएस्ट्रोजेन समृद्ध आहार: या आहारामुळे रजोनिवृत्ती संबंधित लक्षणं कमी करण्यास मदत होते. बार्ली, हरभरा, फ्लेक्स सीड, सोयाबीन यामध्ये फायटोएस्ट्रोजेन्सचे प्रमाण जास्त असते.
- ही पदार्थ टाळा
- रजोनिवृत्ती दरम्यान कॅंडी, चिप्स, तळलेले पदार्थ टाळा
- सोडा एनर्जी ड्रिक्स आणि बेक्ड पदार्थ यासारखे साखरेचे जास्त प्रमाण असलेले पदार्थ टाळा
- तसंच दारू कॅफिन आणि जास्त मीठ असलेले पदार्थ खावू नये.
- रजोनिवृत्तीनंतर आयुष्याची गुणवत्ता सुधारण्यासाठी खालील उपाय करा
- छंद जोपासणे: आवडी जोपासल्यास ताण कमी होण्यास आणि मानसिक आरोग्य राखण्यास मदत होते. यामुळे तुम्ही तुमच्या आवडीचा छंद जोपासा यामुळे तुम्ही नेहमी हॅपी राहू शकता.
- नियमित आरोग्य तपासणी करा: रजोनिवृत्तीनंतर तसंच रजोनिवृत्ती दरम्यान आरोग्याची तपासणी करा. आरोग्याचा मागोवा ठेवल्यानं संभाव्य समस्या लवकर ओळखल्या जावू शकतात तसंच योग्य खबरदारी घेऊन निरोगी जीवन जगता येवू शकते.
- मानसिक व्यायाम: मेंदूचे आरोग्य सुधारण्यासाठी कोडी सोडवणे तसंच नवनवीन कौशल्य शिकणे यासारख्या क्रियालाप केल्यास मेंदूचे आरोग्य चांगलं राहिल.
- व्यायाम आणि ध्यान: नियमित व्यायाम तसंच ध्यान धारणा केल्यास मन शांत राहते.
- सामाजिक संबंध मजबूत करणे: कुटुंब मित्र-मंडळ तसंच आजूबाजूंच्या सोबत वेळ घालवल्यानं नैतिक आधार मिळतो आणि एकाकीपणाची भावना कमी होते.
- कामाच्या ठिकाणी हे बदल करा
- इतरांसमोर व्यक्त व्हा तसंच मदत मागा: रजोनिवृत्ती दरम्यान होणाऱ्या हार्मोनल बदलांमुळे कामावर कसा विपरीत परिणाम होतो याबद्दल आपल्या सहकाऱ्यांशी तसंच वरिष्ठांशी बोला आणि यावर मार्ग काढा. कारण तुम्ही कोणत्या स्थितीतून जात आहात याबद्दल इतरांना सांगितल्यास किंवा चर्चा केल्यास त्यांचं पाठबळ मिळू शकते. कदाचित इतर कुणी अशाच प्रकारच्या अनुभवातून गेलेले असेल आणि त्यांनी हे प्रश्न कशाप्रकारे हाताळले हे तुम्हाला त्यांच्याकडून कळू शकेल.
- स्वत:ची काळजी घ्या: कामाचं ताण येत असल्यास किंवा मूड स्विंग्ज होत असेल तर, ताण कमी करणाऱ्या गोष्टींवर भर टाका. ताण आणि थकवा टाळण्यासाठी माइंडफुलनेस आणि शरीरावरचा ताण घालवणाऱ्या रिलॅक्सेशनच्या तंत्रांचा सराव करा. तसंच काही हलकेफुलके व्यायाम करा. यामुळे तुमचं मन प्रसन्न राहिल.
- वैद्यकीय मदत घ्या: आपल्या शरीरामध्ये होणाऱ्या बदलांबद्दल स्त्रीरोगतज्ञांशी बोला. त्यांनी दिलेल्या टिप्स किंवा उपचारांचं पालन करा. योग्य औषधोपचार तसंच जीवनशैलीतील बदलांमुळे रजोनिवृत्तीच्या काळातील बदल प्रभावीपणे हाताळता येऊ शकतात.
हेही वाचा