Those Who Should Avoid Cold Shower: आपल्यापैकी अनेकांना गरम पाण्याने तर काहीना थंड पाण्याने आंघोळ करायला आवडते. त्यातही थंड पाण्यानं आंघोळ करण्याचे अनेक फायदे आहेत. थंड पाणी केवळ ताजेपणाची भावना देत नाही तर यामुळे झोप देखील चांगली येते. थंड पाण्याने आंघोळ केल्यस रक्तप्रवाह सुधारतो आणि रोगप्रतिकार शक्ती मजबूत होते. नियमित थंड पाण्याने आंघोळ केल्यास शरीरातील एंडोर्फिन हार्मोन्सची पातळी वाढते. परिणामी ताणतणाव दूर होतो आणि मानसिक आरोग्य सुधारते. परंतु थंड पाण्यानं आंघोळ करणं प्रत्येकासाठी योग्य नाही. काही विशिष्ट आरोग्य समस्या असलेल्यांसाठी थंड पाणी हानिकारक आहे. यामुळे आरोग्यविषयक गुंतागुंत वाढण्याची शक्यता जास्त असते. चला तर जाणून घेऊया थंड पाण्याने आंघोळ करणं कुणी टाळावं.

- हृदयरोग: थंड पाणयामुळे हृदरोग असलेल्या लोकांच्या रक्तवाहिन्या आकुंचन पावतात असं अनेक अभ्यासामध्ये दिसून आलं आहे. तसंच थंड पाण्यामुळे रक्तदाब आणि हृदय गती वाढू शकते. हृदयविकार आणि कोरोनरी धमनी संबंधित आजार असलेल्या लोकांनी थंड पाण्याने आंघोळ केल्यास त्यांची लक्षणं आणखी वाढू शकतात. म्हणून, कोणत्याही प्रकारचे हृदयरोग असलेल्या लोकांनी थंड पाण्यानं आंघोळ करणं टाळावं.

- उच्च रक्तदाब असलेले व्यक्ती: उच्च रक्तदाब असलेल्या लोकांनी थंड पाण्यात आंघोळ करणं टाळावं. कारण त्यामुळे रक्तदाब वाढू शकतो. परिणामी स्ट्रोक आणि हृदयविकाराचा झटका यांसारखे आजार उद्भवू शकतात. म्हणून, उच्च रक्तदाब असलेल्या लोकांनी थंड पाण्यात आंघोळ करणं टाळावं.

- दमा: थंडीच्या संपर्कात आल्याने ब्रोन्कोस्पाझम नावाची स्थिती उद्भवू शकते, ज्यामुळे श्वसनमार्ग आकुंचन पावतो. परिणामी श्वास घेण्यास त्रास होऊ शकतो आणि दम्यासारखे आजार उद्भवू शकतात.
- रेनॉड रोग: रेनॉड रोग असलेले व्यक्ती थंडीच्या संपर्कात आल्यावर बोटांच्या आणि पायांच्या बोटांमधील लहान रक्तवाहिन्या जास्त प्रमाणात आकुंचन पावतात. यामुळे थंड पाण्यात आंघोळ करताना सुन्नपणा, तीव्र वेदना आणि अस्वस्थता जाणवू शकते.
- रोगप्रतिकार शक्ती कमकुवत: ज्यांची रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत आहे त्यांनीही थंड पाण्यानं आंघोळ करणं टाळावं. तसंच जे लोक कोणत्याही आजारातून लवकर बरे होत आहेत किंवा केमोथेरपीसारखे उपचार घेत आहेत त्यांनी थंड पाण्याच्या संपर्कात येणे टाळावं. यामुळे रोगप्रतिकार शक्तीवर ताण येऊ शकतो.
- हायपोथायरॉईडीझम: हायपोथायरॉईडीझम असलेल्या लोकांना सामान्यतः थंडी जास्त जाणवते. त्यामुळे थंड पाण्याने अंघोळ केल्याने शरीराचे तापमान कमी होऊ शकते. त्यामुळे थकवा आणि थंडी सहन न होणे देखील वाढू शकते.
(डिस्क्लेमर: ही सामान्य माहिती केवळ वाचनासाठी दिलेली आहे. ईटीव्ही भारत या माहितीच्या वैज्ञानिक मान्यतेबाबत कोणतीही पुष्टी करत नाही. अधिक माहितीसाठी डॉक्टरांकडून सल्ला घ्यावा.)
संदर्भ