How Toxic is nail polish: नखांचे सौंदर्य वाढवण्यासाठी महिला नेलपॉलिश वापरतात. मात्र, नेलपॉलिशच्या नियमित वापरामुळे आरोग्यविषयक विविध समस्या उद्भवू शकतात. नेलपॉलिशमध्ये फॉर्मल्डिहाइड, डायब्युटाइल फॅथलेट आणि टोल्युइन सारखी हानिकारक रसायनं आढळतात. ही आरोग्यासाठी अत्यंत घातक असतात. यामुळे नखांचे नुकसान तर होतेच सोबत त्वचेवर देखील जळजळ, लालसरपणा आणि खाज यासारख्या समस्या निर्माण होऊ शकतात. काही अभ्यासांवरून असं दिसून आलं की, कमी दर्जाच्या नेलपॉलिशमुळे स्वादुपिंडाच्या कर्करोगाचा धोका देखील वाढू शकतो. नेलपॉलिशचा वापर नखांवर आणि एकूण आरोग्यावर कसा परिणाम करू शकतो ते पाहूया.

- नखांचे आरोग्य बिघडते: नेलपॉलिशचा नियमित वापर नखांना विविध प्रकारचे नुकसान करू शकतो. नेलपॉलिशमुळे नखांवर ओलावा टिकून राहू शकतो. यामुळे संसर्ग होऊ शकतो, नखांचा रंग खराब होऊ शकतो आणि नखे ठिसूळ होऊ शकतात. तसंच यामुळे नखे कमकुवत देखील होऊ शकतात.

- श्वसन समस्या: कमी हवेशीर ठिकाणी रसायने असलेल्या नेलपॉलिशचा वापर विविध प्रकारच्या अस्वस्थतेस कारणीभूत ठरू शकतो. त्याचा तीव्र वासामुळे डोळे, नाक आणि आणि फुफ्फुसांचे नुकसान होऊ शकते. तसंच त्यामुळे दमा आणि श्वसनाच्या समस्यांचा धोका देखील वाढू शकतो. दमा असलेल्या लोकांमध्ये यामुळे गुंतागुंत वाढू शकते. हा वास जास्त वेळ घेतल्याने डोकेदुखी, चक्कर येणे आणि मळमळ यासारख्या आजारांचा धोका वाढू शकतो.

- त्वचेच्या समस्या: नखांना वारंवार नेलपॉलिश लावणे तुमच्या त्वचेसाठी हानिकारक ठरू शकते. त्यामुळे तुमच्या त्वचेवर लालसरपणा, खाज सुटणे आणि सूज येणे यासारख्या ऍलर्जीक समस्या उद्भवू शकतात.
- हार्मोनल व्यत्यय: नेलपॉलिशमधील फॅथलेट्स, रसायने, हार्मोनच्या कार्यात व्यत्यय आणू शकतात आणि हार्मोनल असंतुलन निर्माण करू शकतात. यामुळे थायरॉईडच्या समस्या उद्भवू शकतात. तसंच प्रजनन क्षमता आणि गर्भाच्या विकासावर नकारात्मक परिणाम होऊ शकतो.
- पोटदुखी: नेलपॉलिशमधील रसायने खाल्ल्यास अल्सर आणि पोटदुखी होऊ शकते.
(डिस्क्लेमर: ही सामान्य माहिती केवळ वाचनासाठी दिलेली आहे. ईटीव्ही भारत या माहितीच्या वैज्ञानिक मान्यतेबाबत कोणतीही पुष्टी करत नाही. अधिक माहितीसाठी डॉक्टरांकडून सल्ला घ्यावा.)
संदर्भ