how to make mehendi darker: घरात कोणताही समारंभ असो महिलांच्या हातावर मेहंदी हमखास असतेच असते. मेंहदी लावणं प्रत्येक मुलगी आणि महिलांना आवडते. भारतीय समाजात मेहंदीला मोठं स्थान आहे. स्त्रीयांच्या सौंदर्याला चार चांद लावण्याचं काम मेहंदी करते. लग्न समारंभात स्त्रीया न चुकता मेहंदी लावतात. लग्नामध्ये मेहंदी समारंभाची परंपरा वैदिक काळापासून चालत आलेली आहे. याशिवाय कोणताही सण असो मेहंदीशिवाय अपूर्ण आहे. धार्मिकदृष्ट्या मेहंदीला खूप महत्त्व आहे.

मेंहदी सोळा अलंकारांपैकी एक आहे. आजकाल मेहंदी अनेक शैलींमध्ये लावली जात आहे. दिवसेंदिवस मेहंदी लावण्याची पद्धत आणि डिजाईन सुद्धा बदलली आहे. आजकाल महिला अरेबिक स्टाइल मेहंदीला किंवा राउंड मेहंदी लावणं पसंत कतात. परंतु एक गोष्ट आजही स्थिर आहे ती म्हणजे मेहंदीचा रंग. मेहंदीचा रंग गडद होण्यासाठी महिला विशेष काळजी घेतात. मेहंदी खूप गडद व्हावी अशी प्रत्येकाची इच्छा असते. परंतु काही कारणास्तव मेहंदीला रंग येत नाही. चला तर जाणून घेऊया मेहंदीचा रंग गडद होण्यासाठी काय गोष्टी आवश्यक आहेत.

- हात धूवा: बरेच लोक मेहंदी लावताना कोणत्याही गोष्टीची काळजी घेत नाहीत. मात्र, मेहंदीला चांगला गडद रंग येण्यासाठी ती लावण्यापूर्वी अनेक गोष्टींची काळजी घ्यावी लागते. मेहंदी लावण्यापूर्वी हात साबणाने स्वच्छ धूवा आणि नंतरच मेहंदी लावण्यास सुरुवात करा.
- निलगिरीचं तेल: हात साबाणाने स्वच्छ धूतल्यानंतर त्यावर निलगिरीचं तेल लावा. यानंतर मेहंदूी लावण्यास सुरुवात करा. निलगिरीचं तेल लावण्यास रंग चांगला चढतो.
- लिंबू आणि साखरेचं पाणी: मेहंदी थोडी सुकल्यानतंर त्यावर साखरेचं पाणी जरूर लावा. याकरिता एक वाटी घ्या त्यात एक चमचा साखर घाला आणि लिंबूचा रस घाला. हे द्रावण कापसाच्या मदतीने हातावर लावा. असं केल्यास मेहंदी हाताला अधिक काळ चिकटून राहते. तसंच मेहंदी काढल्यानंतर हे मिश्रण पुन्हा हातावर लावा. यामुळे मेहंदीला चांगला गडद रंग प्रदान होतो.

- विक्स किंवा बाम: विक्स किंवा बामच्या मदतीनं देखील मेहंदीचा रंग गडद करता येतो. कारण बाम गरम असतो, ज्यामुळे मेहंदीला उष्णता मिळते परिणामी मेहंदीचा रंग गडद होतो. सर्वात आधी मेहंदी काढून घ्या आणि हात धूतापूर्वी त्यावर विक्स किंवा बाम लावून घ्या. मेहंदीचा रंग गडद करण्याचा हे एक रामबाण माध्यम आहे.
- मोहरीचं तेल: मेहंदी काढल्यांतर हलक्या हाताने मोहरीचं तेल लावा. मेहंदीवर मोहरीचं तेल लावण्याने त्याचा रंग गडद होतो.
- चुना: मेंहदी वाढल्यानंतर त्यावर पाणी न लावता चुना चोळल्याने मेहंदीचा रंग गडद होतो.
- लवंगाचा धूर: मेहंदीचा रंग गडद करण्यासाठी लवंगा फायदेशीर आहेत. याकरिता तवा घ्या. तवा गरम करा आणि त्यावर 4 ते 5 लवंगा घाला. लवंगा गरम होऊ लागल्यावर त्यातून धूर येण्यास सुरुवात होते. या धूरानं हात शेकल्यास मेहंदीला गडद रंग प्रदान होतो.