joe biden: अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जो बायडेन अॅग्रेसिव्ह प्रोस्टेट कॅन्सरने ग्रस्त आहेत. हा आजार त्यांच्या हाडांपर्यंत पसरला आहे. बायडेन यांच्या कार्यालयाने रविवारी निवेदन जारी करून ही माहिती दिली. बायडेन हे 82 वर्षाचे आहेत. 10 वर्षापूर्वी त्यांचा मुलगा ब्यू याने देखील कर्करोगाने जीव गमावला. मागील आठवड्यात बायडेन यांना लघवी करण्यास त्रास झाला होता त्यामुळे त्यांनी शुक्रवारी डॉक्टरांशी सल्ला साधला. तपासणी दरम्यान केलेल्या चाचण्यांमध्ये त्यांना प्रोस्टेट कर्करोग असल्याचं निदान झालं. अमेरिकेत पुरुषांमध्ये प्रोस्टेट कॅन्सर सामान्य कॅन्सरपैकी एक आहे. अभ्यासानुसार जगभरामध्ये दरवर्षी 1.4 लक्ष लोक प्रोस्टेट कर्करोगाच्या आजाराला बळी पडतात. वयाच्या 50 शी नंतर प्रोस्टेट कॅन्सर होण्याचा धोका जास्त असतो.

प्रोस्टेट कर्करोग म्हणजे काय? पुण्यातील रुबी हॉल क्लिनिकमधील युरोलॉजिस्ट डॉ. क्षितिज रघुवंशी यांच्या मते, वाढत्या वयानुसार पुरुषांना लघवीशी संबंधित समस्या उद्भवतात. काही प्राणात ही समस्या सामान्य असू शकते. परंतु, बराच काळ टिकून राहिल्यास किंवा लघवीचा प्रवाह कमकुवत झाल्यास हलक्यात घेणे धोकादायक ठरू शकते. तज्ञांच्या मते, हे प्रोस्टेट कर्करोगाचे प्रारंभिक लक्षण देखील असू शकते. आरोग्य तज्ञांचे म्हणणे आहे की, ५० वर्षांनंतर प्रत्येक पुरुषांनी प्रोस्टेट चाचणी करून घ्यावी. यामुळे कोणताही आजार वेळेत ओळखता येऊ शकतो.

पुरुषांच्या पुर:स्थ ग्रंथीमध्ये होणारा सर्वात सामान्य कर्करोग आहे. हा आजार बहुतेक वृद्ध लोकांमध्ये आढळतो. काही प्रमाणात हा अनुवांशिक देखील आहे. वेळीच निदान झाल्यास त्यावर नियंत्रण मिळवात येते. परंतु परिस्थिती हाताबाहेर गेल्यास रुग्णांना अनेक स्मस्यांना तोंड द्यावे लागते. पुरूषांमध्ये प्रोस्टेट कर्करोग हा सामान्य आजार असला तरी लोकांना त्याबद्दल फारशी माहिती नाही. यामुळे गुंतागुत वाढते.

- अॅग्रेसिव्ह प्रोस्टेट कॅन्सर कोणत्या टप्प्यात असतो? आक्रमक प्रोस्टेट कर्करोगाचे निदान स्टेज 4 वर देखील केले जाऊ शकते. स्टेज 4 किंवा मेटास्टॅटिक कर्करोग, हा सर्वात प्रगत टप्पा आहे आणि याचा अर्थ कर्करोगाचा असा टप्पा आहे जो वाढत जाऊन शरीराच्या दुसऱ्या भागात पसरतो.

- अॅग्रेसिव्ह प्रोस्टेट कॅन्सरची लक्षणं
- कमकुवत मूत्र प्रवाह
- वारंवार लघवी होणे किंवा लघवी करण्यास त्रास होणे
- मूत्रात रक्त येणे
- कंबर किंवा ओटीपोटात वेदना
- पाठदुखी
- अत्यंत थकवा
- चक्कर येणे
- अशक्तपणा
- धाप लागणे
- हृदयाच्या गतीमध्ये बदल
- अचानक वजन कमी होणे
तुमच्या प्रोस्टेटचे रक्षण करण्यासाठी काय करावे? जर चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला तर तुम्ही ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घ्यावा आणि डॉक्टरांच्या सूचनांचे पालन करावे. याशिवाय, जर अहवाल निगेटिव्ह आला तर तुम्ही निरोगी राहण्यासाठी खाली दिलेले उपाय अवलंबले पाहिजेत.
- आहारात बदल करणे गरजेचं आहे. हिरव्या पालेभाज्या, फायबर आणि पौष्टिक अन्नपदार्थांचा समावेश करा.
- दररोज व्यायाम करा - निरोगी वजन राखा.
- धूम्रपान आणि मद्यपान टाळा.
50 वर्षांनंतर दरवर्षी प्रोस्टेटची तपासणी आवश्यक: 50 वर्षांनंतर दरवर्षी तुमच्या प्रोस्टेटची तपासणी करावी. युरोलॉजिस्ट डॉ. क्षितिज रघुवंशी म्हणतात की जर पहिल्या टप्प्यात प्रोस्टेट कर्करोग आढळला तर त्यावर उपचार करणं शक्य आहे. म्हणून, जर तुम्हाला वारंवार लघवी होणे, वेदना होणे किंवा रक्तस्त्राव होणे यासारख्या समस्या आढळल्यास त्याकडे दुर्लक्ष करू नका. ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घ्या. योग्य वेळी चाचणी घ्या आणि निरोगी जीवनशैलीचा अवलंब करा.
(डिस्क्लेमर: ही सामान्य माहिती केवळ वाचनासाठी दिलेली आहे. ईटीव्ही भारत या माहितीच्या वैज्ञानिक मान्यतेबाबत कोणतीही पुष्टी करत नाही. अधिक माहितीसाठी डॉक्टरांकडून सल्ला घ्यावा.)
संदर्भ
https://www.nejm.org/doi/full/10.1056/NEJMoa2214122
https://bmccancer.biomedcentral.com/articles/10.1186/s12885-023-11281-8