paper cups Dangerous For Health: आपल्यापैकी बऱ्याच जणांना चहा आणि कॉफी पिणे आवडते. चहा कॉफी पसंत नसणारे आपल्याला क्वचितच मिळतील. बाहेर कुठं फिरायला गेल्यास आपण कुठं तरी थांबून आवर्जून चहा घेतो. परंतु सोयीसाठी आणि स्वच्छतेकरिता सध्या डिस्पोजेबल पेपेर कपचा वापर जास्त होवू लागला आहे. डिस्पोजेबल प्लास्टिक आणि पेपर कपमध्ये चहा आणि कॉफीसारखे गरम पेये पिणे आरोग्यासाठी हानिकारक आहे का? जेव्हा तुम्ही पेपर कपमध्ये गरम पदार्थ ओतता तेव्हा काय होते? असा प्रश्न तुम्हाला पडला अनेकदा पडला असेल.
एकेकाळी हॉटेल्स आणि रेस्टॉरंट्समध्ये स्टीलच्या ग्लासाऐवजी काचेचे ग्लास वापरले जात होते. मात्र, आता काचेचे ग्लास गायब झाले आहेत. पोर्सिलेन कप देखील क्वचितच दिसतात. हल्ली डिस्पोजेबल, कागदी ग्लासेसचा वापर वाढत्या प्रमाणात होत आहे. रस्त्यांवरील चहाच्या दुकानांमध्येही कागदी कपांचा वापर केल्याचे पहायला मिळते. परंतु, अशा पेपर कपचा आरोग्यावर काय परिणाम होतो? याबद्दल अनेक शंका आहेत.
- धोकादायक: कागदी कपमध्ये चहा आणि कॉफी पिणे धोकादायक असल्याचे तज्ञांचे म्हणणे आहे. सामान्यतः, कागदी कपमध्ये जलरोधक गुणधर्मांसाठी प्लास्टिकचा थर वापरला जातो. ते खूप नाजूक आणि पातळ असतो. अनेक अभ्यासातून असे दिसून आले आहे की, हे मायक्रोप्लास्टिक्स आरोग्यासाठी खूप धोकादायक आहेत.
- त्यामुळे कर्करोगासारखे आजार होऊ शकतो का? जेव्हा तुम्ही पेपर कपमध्ये चहा, कॉफी किंवा कोणताही गरम पदार्थ ओतता तेव्हा मायक्रोप्लास्टिकचा थर वितळू लागतो. या थरातून सूक्ष्म कण बाहेर पडतात. हे कण इतके लहान असतात की डोळ्यांना दिसत देखील नाही. हे फक्त सूक्ष्मदर्शकाद्वारे पाहता येतात. जेव्हा यात चहा ओतला जातो तेव्हा ते द्रवांमध्ये मिसळतात आणि पचनसंस्थेत जातात. परिणामी, प्लास्टिकचे कण आरोग्याला हानी पोहोचवू शकतात आणि कर्करोगासारखे आजार निर्माण करू शकतात असे तज्ञांचे म्हणणे आहे. (आयआयटी खरगपूरच्या संशोधनाकरिता येथे क्लिक करा)
- हार्मोनल असंतुलन: प्लास्टिक आणि कागदी कपमधील मायक्रोप्लास्टिक्स आरोग्यासाठी अत्यंत धोकादायक आहेत. एका अभ्यासानुसार, एका कागदी कपमध्ये अंदाजे 20,000 ते 25,000 मायक्रोप्लास्टिक कण असतात. यामुळे शरीरात हार्मोनल असंतुलन निर्माण होते आणि घातक आजार होतात. जेव्हा गरम द्रवपदार्थ कपमध्ये ओतले जातात, विशेषतः उच्च तापमानात, तेव्हा मायक्रोप्लास्टिकचा थर तुटतो आणि कण द्रवात सोडले जातात. मायक्रोप्लास्टिक्स व्यतिरिक्त, पॅलेडियम, क्रोमियम आणि कॅडमियम सारखी हानिकारक रसायने देखील पेपर कपच्या अस्तरातून गळतात. हे हार्मोनल असंतुलन, प्रजनन समस्या, कर्करोगाचा धोका आणि न्यूरोलॉजिकल विकार वाढवते असे संशोधनात दिसून आले आहे. आरोग्य तज्ञांच्या मते, शक्य असेल तेव्हा सिरेमिक किंवा स्टेनलेस स्टीलसारख्या साहित्यापासून बनवलेल्या कपमध्ये चहा घ्या. यामुळे तुम्ही स्वत:चा बचाव करू शकता.
(डिस्क्लेमर: ही सामान्य माहिती केवळ वाचनासाठी दिलेली आहे. ईटीव्ही भारत या माहितीच्या वैज्ञानिक मान्यतेबाबत कोणतीही पुष्टी करत नाही. अधिक माहितीसाठी डॉक्टरांकडून सल्ला घ्यावा.)