मुंबई - पंकज त्रिपाठी त्याच्या वाट्याला आलेल्या प्रत्येक भूमिकेमध्ये प्राण फुंकत असतो. त्यामुळं वेब सिरीजच्या दुनियेतील तो एक सर्वात लोकप्रिय स्टार म्हणून ओळखला जातो. क्रिमिनल जस्टीस ही मालिकाही त्याच्या सशक्त अभिनयामुळं हीट झाली. यात त्यानं साकारलेलं माधव मिश्रा हे पात्र जितकं वरुन शांत आहे तितकंच ते आतून बारकावे शोधणारं बेरकी आहे. पुन्हा एकदा हा बेरख्या वकील माधव मिश्रासमोर एक अतिशय किचकट केस दाखल झालीय.
पंकज त्रिपाठी स्टारर 'क्रिमिनल जस्टिस' या मालिकाचा चौथा हंगाम सुरू होणार आहे. यामध्ये एक अवघड गुंतागुंतीची सोडवणूक करण्यासाठी माधव मिश्रा सज्ज होणार असल्याचं या मालिकेच्या ट्रेलरमधून स्पष्ट झालंय. आज बुधवारी, शोचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला. यात मोहम्मद झीशान अय्युब, सुरवीन चावला, आशा नेगी, खुशबू अत्रे, बरखा सिंग, आत्म प्रकाश मिश्रा यांच्यासह मीता वशिष्ठ आणि श्वेता बसू प्रसाद यांच्याही प्रमुख भूमिका आहेत.
कसा आहे 'क्रिमिनल जस्टिस ४'चा ट्रेलर? - मुंबईतील नामवंत हॉस्पिटलचा डॉक्टर राज नागपालला त्याच्या गर्ल फ्रेडच्या खुनासाठी अटक होते. त्यानंतर डॉक्टरची पत्नी अंजू नागपाल माधव मिश्राच्या दारात मदतीसाठी याचना करते. नेहमीच्या स्टाईलमध्ये माधव मिश्रा ही केस घेतो आणि आपलं कसब पणाला लावण्याचं आश्वासन देतो. पुरावे मात्र सगळे डॉक्टरच्या विरोधात असल्यामुळं केस क्रिटिकल बनते आणि कोर्टासमोर माधव मिश्रा विरुद्ध पब्लिक प्रोस्यूक्यूटर लेखा पिरामल यांच्यात शह काटशहाचा सामना सुरू होतो. या प्रकरणात माधव मिश्रा कोणत्या नव्या युक्त्या करणार आणि ही केस कशी हाताळणार याबद्दलची उत्सुकता वाढीला लावण्यात ट्रेलर यशस्वी झालाय.
"क्रिमिनल जस्टिसचा हा सीझन माधव मिश्रासाठी कोर्टरूममध्ये केवळ परत येण्याचा नाही, तर ही एक मनाची तीव्र लढाई आहे आणि तो त्याच्या दोन सर्वात कट्टर विरोधकांना तोंड देत आहे आणि बहुआयामी केसवर लढत आहे. माधव मिश्राच्या जागी पाऊल टाकणं आणि क्रिमिनल जस्टिससाठी शूट करणं नेहमीच शिकण्याचा अनुभव असतो. ते एक प्रेमळ पात्र आहे आणि मला असं वाटतं की तो आता माझा पर्यायी अहंकार बनला आहे. या सीझनमध्ये आमच्यात काही अतिशय प्रतिभावान कलाकार देखील सामील झाले आहेत जे कथेला खूप महत्त्व देतात," असं पंकज त्रिपाठीनं प्रेस नोटमध्ये म्हटलंय.
'क्रिमिनल जस्टिस'चा चौथा सीझन २९ मे रोजी जिओहॉटस्टारवर प्रदर्शित होणार आहे.