मुंबई - काही वर्षांपूर्वी संजय मिश्रा आणि नीना गुप्ता यांच्या प्रमुख भूमिका असलेला 'वध' नावाचा हिंदी चित्रपट प्रदर्शित झाला होता आणि त्यातून प्रेक्षकांना भावनिक आणि रहस्यांनी भरलेला अनुभव मिळाला होता. तो बॉक्स ओळीवेस वर हिट ठरला होता आणि त्याची निर्मिती लव फिल्म्स ने केली होती. या सिनेमाच्या कथानकावर आधारित मराठी चित्रपट येतोय ज्याचे नाव आहे 'देवमाणूस'. लव रंजन आणि अंकुर गर्ग यांच्या लव फिल्म्स या प्रसिद्ध निर्मिती संस्थेने याची निर्मिती केली असून त्यांचा हा पहिलाच मराठी सिनेमा आहे. ‘देवमाणूस’ चे दिग्दर्शन तेजस प्रभा विजय देऊस्कर याने केले असून या सिनेमात मराठी चित्रपटसृष्टीतील मातब्बर कलाकार महेश मांजरेकर, रेणुका शहाणे, सुबोध भावे आणि सिद्धार्थ बोडके यांच्या प्रमुख भूमिका आहेत.
नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला. मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या या सोहळ्यात चित्रपटाची संपूर्ण टीम, दिग्दर्शक तेजस देऊस्कर, कलाकार मंडळी, लेखक नेहा शितोळे आणि निर्माते लव रंजन व अंकुर गर्ग उपस्थित होते. हा सिनेमा केवळ मराठी नव्हे तर आंतरराष्ट्रीय स्तरावर आपली छाप सोडेल, असा विश्वास निर्मात्यांनी व्यक्त केला. गूढ, उत्कंठावर्धक आणि एका वयस्क जोडप्याच्या भावनिक जीवनप्रवासाची झलक यातून उलगडेल. तसेच कथा आणि पात्रांमधील गुंतागुंत, कलाकारांची सशक्त अभिनय शैली आणि दृश्यांमधून निर्माण होणारा भावनांचा ठसठशीत प्रवाह यात असून हा सिनेमा एक अतिशय वेगळा अनुभव देईल अशी ग्वाहीसुद्धा निर्मात्यांनी दिलीय.
दिग्दर्शक तेजस देऊस्कर यांनी भावना व्यक्त करताना सांगितले की, “देवमाणूस मध्ये भावना, रहस्य आणि नाट्य यांचा सुरेख मेळ साधला आहे. लव रंजन आणि अंकुर गर्ग यांनी या संकल्पनेवर विश्वास दाखवून मला संधी दिली याबद्दल मी त्यांचा ऋणी आहे." निर्माते लव रंजन म्हणाले की, “देवमाणूस हे महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वैभवाला आमचं मन:पूर्वक वंदन आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून आम्ही केवळ एक कथा मांडत नाही, तर ती संपूर्ण परंपरेचा आणि सौंदर्याचा सन्मान करत आहोत. मराठीत पदार्पण करताना आम्ही दर्जेदार सिनेमा सादर करण्याचा नवा अध्याय सुरू करीत आहोत.”
लव फिल्म्स निर्मित, तेजस प्रभा विजय देऊस्कर दिग्दर्शित ‘देवमाणूस’ हा चित्रपट येत्या २५ एप्रिल ला चित्रपटगृहांत प्रदर्शित होणार आहे.
हेही वाचा -