मुंबई - स्त्रीच्या संघर्षाची आणि सन्मानासाठीच्या लढाईची तीव्रता प्रेक्षकांपर्यंत पोहोचणारे 'वामा - लढाई सन्मानाची’ मधील टायटल सॉंग नुकतेच प्रदर्शित करण्यात आहे. त्यातील दमदार सादरीकरणामुळे रसिकांच्या मनात चित्रपटाबद्दल नवे कुतूहल निर्माण झाले आहे. प्रसिद्ध गायक कैलास खेर आणि मंजिरा गांगुली यांच्या जोशपूर्ण स्वरांनी सजलेले हे गीत, मंदार चोळकर यांच्या प्रभावी लेखणीतून उतरले आहे. रिजू रॉय यांनी या गीताला संगीताची ताकद दिली असून, गाणं ऐकताना स्त्रीशक्तीचा अभिमान जागवणारा अनुभव मिळतो.
हे गाणं केवळ सुरांमध्ये अडकलेलं नाही, तर त्यातून एक सामाजिक जाणिवही ठळकपणे समोर येते. ‘वामा - लढाई सन्मानाची’ या शीर्षकगीताचे बोल नारीशक्तीच्या आत्मबळाचा, स्वाभिमानाचा आणि जिद्दीच्या प्रवासाचा प्रेरणादायी आरसा ठरतात. चित्रपटाच्या मध्यवर्ती संकल्पनेला साजेसे असे हे गीत, प्रत्येक स्त्रीच्या संघर्षाला उजाळा देत तिच्या सन्मानासाठीच्या लढ्याचं प्रतीक ठरतं.
या गाण्याविषयी बोलताना कैलास खेर म्हणाले, “या गीतात ज्या प्रकारे उर्जा आहे, ती ऐकणाऱ्याला आतून प्रेरणा देते. हे गाणं महिलांना निर्भय, आत्मविश्वासी आणि धैर्याने भरलेलं बनवतं. खरं तर, हे गीत स्त्री सक्षमीकरणाचं घोषवाक्य ठरावं इतकं प्रभावशाली आहे.”
‘ओंकारेश्वरा’ प्रस्तुत आणि सुब्रमण्यम के. निर्मित या चित्रपटाची संकल्पना, लेखन आणि दिग्दर्शन अशोक आर. कोंडके यांचे असून, प्रमुख भूमिकांमध्ये कश्मीरा कुलकर्णी, डॉ. महेश कुमार, गणेश दिवेकर आणि जुई बी. यांच्या भूमिका आहेत. दिग्दर्शक अशोक कोंडके यांचंही या गाण्याबाबत विशेष मत आहे. ते म्हणतात, “कैलास खेर आणि मंजिरा गांगुली यांचे सशक्त आवाज, उत्कृष्ट संगीत आणि भावपूर्ण शब्दांनी सजलेलं हे शीर्षकगीत प्रेक्षकांच्या मनावर कायमचा ठसा उमटवेल. या गीतात संघर्षाची उर्मी, आत्मसन्मानाचा ठाव आणि स्त्रीशक्तीच्या गौरवाचा झंकार आहे.”
हेही वाचा -