मुंबई - Raanti Marathi Movie : अभिनेता शरद केळकरनं हिंदी-मराठी चित्रसृष्टीतील अनेक चित्रपटांमध्ये काम केलं आहे. सध्या तो आगमी चित्रपट 'रानटी' यामुळे चर्चेत आहे. या मराठी चित्रपटामध्ये शरद केळकरचा अनोखा अंदाज चाहत्यांना पाहायला मिळणार आहे. दरम्यान जंगलात राहणारे प्राणी हे जंगली असतात. पण तिथे राहत असलेले सगळेच प्राणी 'रानटी' नसतात. काही विशिष्ट प्राण्याचा उपजत गुणधर्म असतो. काही प्राण्यांना जगण्यासाठी, पोट भरण्यासाठी शिकार आणि हल्ले करावे लागतात. पण या हल्ल्यांना जेव्हा शांत प्राणी प्रतिकार करतो तेव्हा तो हल्ला खूप जास्त 'रानटी' असतो. अशाच एका हटके विषयावर आधारीत 'रानटी' हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.
'रानटी' चित्रपटाचा फर्स्ट लूक रिलीज : 'रानटी' चित्रपटाबाबत शरद केळकर खूप उत्साहित आहे. या चित्रपटाला अजित परबने संगीत दिलं आहे. 'रानटी' चित्रपटाची भव्यता जपण्याची जबाबदारी समित कक्कडने पार पाडली आहे. 'इंदोरी इश्क', 'हाफ तिकीट', 'धारावी बँक' आणि 'आयना का बायना', अशा भन्नाट कहाणींची स्टाईल हाताळणारा समित कक्कड यांनी या चित्रपटावर खूप मेहनत घेतली आहे. हा चित्रपट रुपेरी पडद्यावर 22 नोव्हेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाच्या नावावरून हा चित्रपट प्रेक्षकांचं मनोरंजन करून पैसा वसुल करणार हे सध्या दिसत आहे. आता या चित्रपटाच्या रिलीजची अनेकजण वाट पाहात आहेत.
शरद केळकरनं केल्या व्यक्त भावना : निर्मात्यांनी शेअर केलेल्या पोस्टवर अनेकजण आपल्या प्रतिक्रिया देत आहेत. या चित्रपटातील आपल्या भूमिकेबद्दल बोलताना शरदने सांगितलं की, ''अधर्मी वृत्तींचा नाश करणार्या विष्णूची भूमिका मी यात केली आहे. अशा प्रकाराची भूमिका साकारणे प्रत्येक कलाकाराचं स्वप्न असतं. उत्तम आणि पॉवरफुल दिग्दर्शक समित कक्कड यांच्या तगड्या आणि जबरदस्त 'रानटी' चित्रपटाच्या निमित्तानं ही वेगळी भूमिका मला करता आली याचा अतिशय आनंद आहे.'' आता निर्मात्यांनी शेअर केलेल्या फर्स्ट लूकमध्ये शरद कमालीच्या राउडी अंदाजात दिसत आहे. यापूर्वी या चित्रपटातील पहिलं पोस्टर रिलीज करण्यात आलं होतं. यातला शरदचा दमदार अंदाज चाहत्यांना खूप आवडला होता. या चित्रपटाची निर्मिती पुनित बालन हे करत आहेत.