मुंबई - स्टँड अप कॉमेडियन कुणाल कामरानं एकनाथ शिंदे यांचं थेट नाव न घेता विडंबन गीत तयार केल्यानंतर त्याच्या विरोधात अनेक शक्ती एकवटल्या आहेत. एका बाजूला हॅबिटेट क्लबमध्ये घुसून स्टुडिओची तोडफोड केल्यानंतर त्याला धमकी देण्याचं सत्र सुरू झालंय. मुंबई पोलिसात त्याच्या विरोधात एफआयआर दाखल झाली असून त्याला अटक करण्याची तयारी पोलीस करत आहेत. कुमाल कामरा आणि त्याचं समर्थन करणाऱ्या सुषमा अंधारेंच्या विरोधात हक्कभंग प्रस्ताव आणण्याची तयारीही सुरू झालीय. अशातच टी सिरीज कंपनीनं कुणाल कामराला कॉपीराईट कायद्याचं उल्लंघन केल्याबद्दल नोटीस पाठवली आहे. त्यानं युट्यूबवर अपलोड केलेल्या 'नया भारत' या नव्या व्हिडिओमध्ये कॉपीराईट कायद्याचा भंग केल्याचा त्याच्यावर आरोप करण्यात आला आहे.
कुणाल कामराला नोटीस मिळाल्यानंतर त्यानं टी सिरीजवर टीका केली आहे. त्यानं त्याच्या कार्यक्रमात सादर केलेल्या गाण्यामध्ये मूळ बोल किंवा मूळ वाद्यांचा उपयोग केलेला नसल्याचा दावा त्यानं केलाय. एक्स या सोशल मीडियावर पोस्ट लिहून त्यानं आपलं मत नोंदवलंय. त्यानं लिहिलंय,
"नमस्ते टी सिरीज, कुठपुतळी व्हायचं बंद करा. विडंबन आणि व्यंग कायदेशीरपणे योग्य उपयोगांतर्गत येतं. मी गाण्याची बोल किंवा मूळ वाद्य याचा वापर केलेला नाही. जर तुम्ही हा व्हिडिओ काढून टाकला तर प्रत्येक कव्हर गीत आणि नृत्याचा व्हिडिओ काढून टाकला जाऊ शकतो. कृपया निर्मात्यांनी याची नोंद घ्यावी.
मी म्हटलं त्याप्रमाणे भारतात प्रत्येक मक्तेदारी ही माफियाहून कमी नाही, म्हणून कृपा करुन याला काढून टाकण्यापूर्वी पाहा आणि डाऊनलोड करा. टी सिरीज, तुमच्या माहितीकरीता मी तामिळनाडूत राहतोय."
Hello @TSeries, stop being a stooge.
— Kunal Kamra (@kunalkamra88) March 26, 2025
Parody & Satire comes under fair use Legally.
I haven’t used the lyrics or the original instrumental of the song.
If you take this video down every cover song/dance video can be taken down.
Creators please take a note of it.
Having said… pic.twitter.com/Q8HXl1UhMy
काय आहे कुणाल कामराचं प्रकरण? - कुणाल कामरानं काही दिवसापूर्वी मुंबईतील द हॅबिटेट क्लबमध्ये उपस्थित प्रेक्षकांच्या समोर स्टँडअप कॉमेडी शो केला होता. यामध्ये त्यानं त्याच्या नेहमीच्या स्टाईलनं सत्ताधारी पक्ष आणि त्यांचे समर्थन करणाऱ्यांच्या विरोधात अनेक प्रहसनं सादर केली. याच कार्यक्रमात त्यानं एकनाथ शिंदे यांनी शिवसनेतून बाहेर पडल्यानंतर गुहाटीमार्गे मुंबई गाठली आणि सत्ता पदरात पाडून घेतली यावर आधारित एक विडंबन गीत सादर केलं. हे गीत जेव्हा सोशल मीडियावरुन व्हायरल झालं तेव्हा एकनाथ शिंदे समर्थक असलेल्या कार्यकर्त्यांना कुणाल कामराचा राग आला. त्यांनी द हॅबिटेट क्लबमध्ये घुसून कुणालला बाहेर काढण्याची मागणी केली. क्लबच्या व्यवस्थापकांनी आक्रमक झालेल्या कार्यकर्त्यांना हा शो खूप दिवसापूर्वी झाल्याचं समजवण्याचा प्रयत्न केला. परंतु आक्रमक झालेल्या या कार्यकर्त्यांनी द हॅबिटेट क्लबमध्ये सुरू असलेला शो बंद पाडला आणि तिथल्या मालमत्तेचं नुकसान केलं. या कार्यकर्त्यांना पोलिसांनी अटक केली आणि सध्या त्यांची जामिनीवर मुक्तता झाली आहे.
कुणाल कामरा कुठं आहे? - कॉमेडियन कुणाल कामरा सध्या तामिळनाडूत असल्याचं समजतंय. काही दिवसापूर्वी त्याचा फोन नंबर लीक झाला आणि त्यावरुन त्याला धमकी देण्याचा प्रयत्न झाला. याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसिद्ध झाला असून यात धमकी देण्याचा प्रयत्न करणाऱ्या व्यक्तीला कुणाल कामरा आपण तामिळनाडूत असल्याचं सांगताना दिसतोय. याशिवाय टी सिरीजनं त्याला नोटीस पाठवल्यानंतर त्यानं आपण तामिळनाडूत असल्याचा उल्लेख केला आहे.
हेही वाचा -