मुंबई - बॉलिवूड अभिनेता रितेश देशमुख सध्या त्याच्या आगामी चित्रपट 'राजा शिवाजी' चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटाचं सध्या शूटिंग सुरू आहे. नुकतीच 'राजा शिवाजी' चित्रपटाची रिलीज डेटची घोषणा करण्यात आली आहे. यानंतर चाहते या चित्रपटाला पाहण्यासाठी खूपच उत्सुक असल्याचे दिसून आले. हा चित्रपट नवीन वर्षात धमाका करेल असं सध्याचं चित्र दिसत आहे. आता या चित्रपटामध्ये आणखी एक मराठी स्टार दिसणार आहे. 'सुख म्हणजे नक्की काय असतं' या लोकप्रिय मालिकेतील मराठमोळ्या अभिनेता कपिल होनराव 'राजा शिवाजी' चित्रपटात दिसणार आहे.
'राजा शिवाजी'मध्ये कपिल होनरावची एंट्री : आता या चित्रपटामध्ये त्यांची कुठली भूमिका असणार याबद्दल उघड झालेलं नाही. 'राजा शिवाजी' चित्रपटाची स्टार कास्ट खूप तगडी आहे. यामध्ये मुख्य भूमिकेत रितेश देशमुख , जेनेलिया डिसूजा अभिषेक बच्चन आणि संजय दत्त दिसणार आहेत. दरम्यान कपिल होनराव याला 'राजा शिवाजी' चित्रपटात काम करण्याची मोठी संधी मिळाल्यानं तो खूप खुश आहे. यामुळे त्यानं इंस्टाग्रामवर 'राजा शिवाजी' चित्रपटाच्या डेट रिलीजचे पोस्टर शेअर केले आहे. या पोस्टरमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांची झलक दिसत आहे.

कपिल होनरावनं शेअर केली पोस्ट : यापूर्वी कपिल होनरावनं 'मल्हार'ची देखील भूमिका साकारली आहे. त्याची ही भूमिका देखील रसिकांना खूप पसंत पडली होती. दरम्यान कपिल होनरावनं इंस्टाग्रामवर 'राजा शिवाजी' चित्रपटातील पोस्टर शेअर करत आपल्या पोस्टवर लिहिलं, 'राजा शिवाजी' चित्रपटाचा मी भाग आहे, याचा मला अभिमान आहे... ही संधी मला मिळाली हे माझे भाग्य आहे..." दरम्यान 'राजा शिवाजी' चित्रपटामधील पोस्टर हे अनेकांना आवडत आहे. जिओ स्टुडिओज् आणि मुंबई फिल्म कंपनी निर्मित 'राजा शिवाजी', एक भव्य, ऐतिहासिक आणि अॅक्शननं भरलेला चित्रपट असणार आहे. तसेच या चित्रपटात सचिन खेडेकर, भाग्यश्री, फरदीन खान, जितेंद्र जोशी, अमोल गुप्ते हे कलाकार देखील महत्वाच्या भूमिकेत असणार आहेत. दरम्यान या चित्रपटाचं दिग्दर्शन स्वतः रितेश विलासराव देशमुख करत आहे. हा चित्रपट रुपेरी पडद्यावर १ मे २०२६ रोजी प्रदर्शित होणार आहे.
हेही वाचा :