मुंबई - अभिनेता आमिर खान यांच्या ‘सितारे जमीन पर' हा नवीन चित्रपट प्रदर्शनाच्या मार्गावर आहे. आमिर खान नेहमीच त्याचे चित्रपट प्रदर्शनाच्या पूर्वी विविध स्तरातील सामान्य लोक तसेच वेगवेगळ्या क्षेत्रातील प्रतिष्ठित लोक यांना दाखवितो आणि त्यांचे अभिप्राय घेतो. आताही त्यानं सुधा मूर्ती यांना खास निमंत्रण देऊन, हा चित्रपट दाखविला. सुधा मूर्ती प्रामुख्यानं त्यांच्या परोपकारी कार्यासाठी ओळखल्या जातात. त्या सध्या इन्फोसिस फाऊंडेशनच्या अध्यक्षा म्हणून काम करत आहेत आणि इन्फोसिसचे सह-संस्थापक एन आर नारायण मूर्ती यांच्या पत्नी आहेत.
सुधा मूर्ती यांनी केल्या भावना व्यक्त : चित्रपटाच्या खास स्क्रिनिंगदरम्यान उपस्थित असलेल्या प्रसिद्ध समाजसेविका आणि लेखिका सुधा मूर्ती यांनी चित्रपटाबद्दल आपली मनोगते व्यक्त केली. त्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितलं की, "सितारे जमीन पर ही केवळ एक कलाकृती नाही, तर सामाजिक भान जागवणारा आरसा आहे. 'स्पेशल' मुलांना कसं समजून घ्यावं, यावर प्रकाश टाकणारा हा सिनेमा मन हेलावून टाकतो." त्यांनी पुढे नमूद केलं, "सामान्यता म्हणजे काय, हा खरा प्रश्न आहे. ही मुलं फार निरागस, आनंदी आणि साधेपणात जगणारे असतात. इतरांच्या यशातही आनंद मानणारी ही मुलं आपल्याला अनेक गोष्टी शिकवतात. या चित्रपटात त्यांच्या भावना आणि जगण्याची धडपड फार प्रभावीपणे मांडली गेली आहे. 'सितारे जमीन पर' हा चित्रपट समाजाच्या दृष्टिकोनात बदल घडवू शकतो. तो लोकांना बौद्धिक अपंगत्वाबाबत अधिक जागरूक आणि संवेदनशील बनवण्याची ताकद बाळगतो. या मुलांकडे सहानुभूतीनं पाहणं हे आपलं सामाजिक कर्तव्य आहे."
‘सितारे जमीन पर' चित्रपटाबद्दल : या चित्रपटाचे दिग्दर्शन आर. एस. प्रसन्ना यांनी केलं असून, आमिर खान आणि जेनेलिया देशमुख यांच्यावर अभिनीत असलेल्या या चित्रपटाला संगीत शंकर-एहसान-लॉय यांनी दिलं आहे, तर गीते लिहिली आहेत अमिताभ भट्टाचार्य यांनी. कथा दिव्य निधी शर्मा यांनी लिहिली असून, निर्मितीची जबाबदारी आमिर खान आणि अपर्णा पुरोहित यांनी सांभाळली आहे. सहनिर्माते बी. श्रीनिवास राव आणि रवी भगचंदका आहेत. 'सितारे जमीन पर' हा बहुप्रतीक्षित चित्रपट २० जून २०२५ रोजी संपूर्ण भारतभर फक्त चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.
हेही वाचा :