शिर्डी- दक्षिणेतील प्रसिद्ध अभिनेता आणि चित्रपट निर्माते डॉ. मोहन बाबू यांनी शिर्डीत येऊन साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले आहे. एक दोन नाही तर तब्बल पाच भाषेत एकाच दिवशी प्रदर्शित होणाऱ्या 'कन्नप्पा' या चित्रपटाच्या यशासाठी साई चरणी प्रार्थना केली असल्याच मोहन बाबू यांनी सांगितलं आहे. गेल्या 35 वर्षांपासून साईबाबांच्या दर्शनासाठी शिर्डीत येतोय. साईबाबांवर अपरंपार श्रद्धा असून माझ्या घरीही साईबाबांचे मोठे मंदिर आहे. माझा कुठल्याही नवीन चित्रपट प्रदर्शित होण्याआधी शिर्डी साईबाबांच्या दर्शनासाठी शिर्डीत येत असतो, साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेऊन नवीन चित्रपटाच्या यशासाठी प्रार्थना करतो. अनेक दिवसांपासून प्रेक्षक आतुरतेनं वाट पाहात असलेल्या 'कन्नप्पा या चित्रपटाच्या यशासाठी आज शिर्डी साईबाबांच्या दर्शनासाठी आलो असल्याच सांगत, लवकरच हा चित्रपट 5 भाषेत प्रदर्शित होणार असून प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याच निर्माते मोहन बाबू यांनी साई दर्शनानंतर 'ई टीव्ही भारतशी' बोलतांना सांगितलं आहे.
मोहन बाबूनं घेतलं साईबाबाचं दर्शन : 'कन्नप्पा' या चित्रपटाचे निर्माते आणि अभिनेता म्हणून काम करणारे मोहन बाबू यांनी यावेळी सांगितलं की , "कन्नप्पा' हा चित्रपट हिंदू धर्मावर आधारित असून शिव परमभक्त 'कन्नप्पा' यांच्या जीवनकथेवर आधारित आहे. या चित्रपटात मोहन बाबू यांचा मुलगा विष्णु मांचू मुख्य भूमिकेत दिसणार आहे. मोहन बाबूसह, मोहनलाल, प्रभास, अक्षय कुमार आणि काजल अग्रवाल यासारखे अनेक दिगग्ज अभिनेता या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. इंटरनेटवर जरी हा चित्रपट 25 एप्रिल रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याचं बोलल्या जात असलं तरी, हा चित्रपट प्रत्यक्षात प्रेक्षकांना कधी पाहायला मिळणार आहे ? यावर बोलण्यास मोहन बाबू यांनी नकार देत चित्रपटाची प्रदर्शित होण्याची तारीख मात्र यावेळी गुलदस्त्यात ठेवलीय.

मोहन बाबूनं केल्या व्यक्त भावना : 'कन्नप्पा' या चित्रपटाचा यशासाठी आज साईबाबांच्या चरणी प्रार्थना केलीय. तसेच हा चित्रपट देव आधी देव महादेव यांचे परमभक्त 'कन्नप्पा' यांच्या जीवनकथेवर आधारित असल्यानं , भीमाशंकर, त्र्यंबकेश्वर , घृष्णेश्वर या तिन्ही महादेवाच्या ज्योतिर्लिंग ठिकाणी जाऊन दर्शन घेणार असून या चित्रपटाच्या यशासाठी प्रार्थना करणार असल्याचही मोहन बाबू यांनी यावेळी सांगितलं आहे. साईबाबांच्या दर्शनानंतर संस्थानचे उपकार्यकारी अधिकारी भीमराज दराडे यांनी मोहन बाबू यांचा शॉल आणि साईमूर्ती देऊन सत्कार केला. तसेच साईबाबांच्या कृपेनं 'कन्नप्पा' हा चित्रपट यशस्वी ठरो आणि प्रेक्षकांच्या मनात स्थान मिळवो अशी भावना यावेळी त्यांनी व्यक्त केली.