मुंबई - सलमान खान आणि रश्मिका मंदान्ना यांच्या मुख्य भूमिका असलेल्या 'सिकंदर' या चित्रपटाला रिलीज होऊन आज दोन आठवडे पूर्ण झाले आहेत. ईदच्या पार्श्वभूमीवर थिएटरमध्ये झळकलेल्या 'सिकंदर'च्या १३ दिवसांच्या कमाईचे आतापर्यंतचे संपूर्ण आकडे समोर आले आहेत. 'सिकंदर' हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर संथ गतीनं हिट होत गेला. परंतु आता या चित्रपटाच्या कमाईच्या आलेख घसरगुंडीला लागला आहे. 'सिकंदर'ची कमाई आता कोट्यवधीच्या कमाईवरून लाखो रुपयांपर्यंत पोहोचली आहे. दुसरीकडे, सनी देओलची असलेला 'जाट' हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर प्रदर्शित होताच, 'सिकंदर'च्या यशाला दृष्ट लागली आहे. 'जाट'नं १० कोटींपेक्षा जास्त कमाई केली आणि प्रेक्षकांना हा चित्रपट पसंत पडताना दिसत आहे. 'जाट'बरोबरच 'गुड बॅड अग्ली' हा तमिळ चित्रपटही प्रदर्शित झाला आणि देशभर प्रेक्षकांनी त्याला साथ दिल्याचं चित्र पाहायला मिळतंय.
- 'सिकंदर' चित्रपटाची १३ व्या दिवसाची एकूण कमाई
सलमान खानचा 'सिकंदर' चित्रपट अपेक्षित जादू करू शकला नाही. सॅकनिल्कच्या मतानुसार, चित्रपटानं १२ व्या दिवशी ०.७ कोटी रुपये कमावले आहेत. चित्रपटाच्या कमाईला उतरती कळा लागली असून आता चित्रपटाची कमाई ४८ टक्क्यांनी कमी झाली आहे. रिलीजच्या १३ व्या दिवशी अवघे ३५ लाख कमावले आहेत. 'सिकंदर'ची भारतातील एकूण कमाई १०८.११५ कोटी रुपयांवर पोहोचली आहे.
- 'जाट' चित्रपटाची दुसऱ्या दिवसाची कमाई
सनी देओलचा 'जाट' हा चित्रपट ११.०८ कोटी रुपयांच्या दमदार कमाईसह रिलीज झाला. पण त्याच्या कमाईत दुसऱ्या दिवशी घट पाहायला मिळाली. सॅकॅनिल्कनं दिलेल्या आकड्यांनुसार 'जाट' चित्रपटानं दुसऱ्या दिवशी ७ कोटी रुपयांचा व्यवसाय केला आहे. चित्रपटानं पहिल्या दिवशी ९.५ कोटी रुपये आणि दुसऱ्या दिवशी अंदाजे ७ कोटी रुपये कमावले. अशाप्रकारे 'जाट' चित्रपटाचं भारतातील एकूण कलेक्शन १६.९६ कोटी रुपये झाले आहे. दुसऱ्या दिवशी मात्र, 'जाट' चित्रपटाच्या कमाईत २६.३२% घट झाली आहे.
- साऊथच्या चित्रपटाची बॉक्स ऑफिसवर बाजी
दरम्यान, 'जाट' आणि 'सिकंदर' यांच्यामध्ये बॉक्स ऑफिसवर लढाई जारी असताना तमिळ सुपरस्टार अजित कुमारच्या 'गुड बॅड अग्ली' चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर ताबा मिळवला आहे. या चित्रपटानं अधिकृतपणे ३०.९ कोटी रुपयांसह आपलं खातं उघडलं आहे. अजित कुमारचा 'गुड बॅड अग्ली' हा चित्रपट सर्वात मोठा ओपनिंग चित्रपट ठरला आहे. सॅकॅनिल्कच्या मतानुसार, गुड बॅड अग्लीने पहिल्या दिवशी २९.२५ कोटी, दुसऱ्या दिवशी १३.९ कोटी आणि तिसऱ्या दिवशी १.६२ कोटी रुपयांची कमाई केली आहे. तीन दिवसात या चित्रपटाची एकूण कमाई ४४.७७ कोटी रुपयांवर पोहोचली आहे.