ETV Bharat / entertainment

अमेरिकेतील 'नाफा फिल्म फेस्टिव्हल'मध्ये मराठी सेलिब्रिटीज लावणार हजेरी...

डॉ. मोहन आगाशे, दिलीप प्रभावळकर, अमोल पालेकर यांच्यासह अनेक मराठी सेलिब्रिटीज अमेरिकेतील 'नाफा फिल्म फेस्टिव्हल'मध्ये उपस्थित राहणार आहेत.

NAFA Film Festival 2025
नाफा फिल्म फेस्टिव्हल (NAFA Film Festival 2025 (Source : reporter))
author img

By ETV Bharat Entertainment Team

Published : May 26, 2025 at 9:59 AM IST

1 Min Read
Choose ETV Bharat

मुंबई - जगभरात चित्रपट महोत्सवांमध्ये अनेकभाषिक चित्रपटांचा समावेश असतो. परंतु मराठीचा स्वतःचा म्हणता येईल असा आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिवल अमेरिकेत गेल्या वर्षीपासून सुरु करण्यात आला श्री अभिजित घोलप यांच्याकडून. त्यांनी गेल्यावर्षी 'नॉर्थ अमेरिकन मराठी फिल्म अससोसिएशन' (NAFA) सुरु केला. मागील वर्षी, २०२४ मध्ये, २७ आणि २८ जुलै रोजी अमेरिकेतील कॅलिफोर्नियातील सॅन होजे येथे पार पडलेला, हा भव्य महोत्सव, भारतीय आणि विशेषतः मराठी समाजाच्या उत्स्फूर्त प्रतिसादानं, यशस्वी ठरला. यावर्षी २५ ते २७ जुलै २०२५ या काळात ‘नाफा २०२५’ अमेरिकेतील मराठी रसिकांच्या भेटीला येणार आहे.

मराठी चित्रपट : चित्रपटांचे निर्माते अभिजित घोलप यांच्या संकल्पनेतून निर्माण झालेल्या North American Marathi Film Association (NAFA) या उपक्रमाच्या दुसऱ्या पर्वाची औपचारिक घोषणा नुकतीच करण्यात आली. अमेरिका आणि कॅनडामधील साडेपाच लाखांहून अधिक मराठीजनांपर्यंत दर्जेदार, आशयघन मराठी सिनेमे पोहोचावेत, यासाठी नाफा सातत्यानं प्रयत्नशील आहे. २०२४ पासून दर महिन्याला एक मराठी चित्रपट उत्तर अमेरिका आणि कॅनडातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होत असून ‘गुलकंद’, ‘सुजित सुशीला’, ‘गुलाबी’, ‘पाणी’, ‘स्थळ’, ‘नवरा माझा नवसाचा २’ अशा विविधतेनं नटलेल्या चित्रपटांना तिथल्या प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद लाभत आहे.

'नाफा'मध्ये 'हे' कलाकार लावणार हजेरी : नाफाचे संस्थापक अभिजित घोलप यांनी हॉलिवूडच्या धर्तीवर मराठी चित्रपटविश्वाचा जागतिक विस्तार घडवून आणण्याचा विडा उचलला असून, सध्या अनेक तरुण कलावंत, दिग्दर्शक, गायक, नृत्यदिग्दर्शक आणि लेखक नवनव्या कल्पना घेऊन ‘नाफा फिल्म क्लब’शी जोडले जात आहेत. वर्षाअखेरीस दोन लघुपटांची निर्मिती ही देखील या क्लबचे महत्त्वाचे पाऊल असणार आहे. या उपक्रमाअंतर्गत उमेश कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यशाळा, तसेच डॉ. मोहन आगाशे, दिलीप प्रभावळकर, सचिन खेडेकर, सलील कुलकर्णी, समीर चौघुले यांच्याबरोबर चर्चासत्रे, टॉक शोज यांचं आयोजनही करण्यात येत आहे. गेल्या वर्षी ‘नाफा २०२४’ महोत्सवात दिलीप प्रभावळकर, महेश मांजरेकर, सुबोध भावे, मृणाल कुलकर्णी, जब्बार पटेल अशा मराठी सिनेसृष्टीतील मान्यवरांनी उपस्थिती लावली होती. यावर्षीच्या महोत्सवात डॉ. मोहन आगाशे, अमोल पालेकर, महेश कोठारे, सचिन खेडेकर, अश्विनी भावे, सोनाली कुलकर्णी (ज्येष्ठ), अवधूत गुप्ते, आदिनाथ कोठारे, वैदेही परशुरामी आणि मधुर भांडारकर यांची उपस्थिती निश्चित झाली आहे. 'नाफा' म्हणजे सातासमुद्रापलीकडील मराठी अस्मितेचा भव्य सोहळा असून 'बीएमएम’च्या ५७ महाराष्ट्र मंडळांचे सहकार्य लाभलेला हा महोत्सव आहे.