मुंबई - अभिनेता रितेश धेशमुखनं त्याच्या आगामी राजा शिवाजी या छत्रपती शिवाजी महाराजांवरील चित्रपटाची पुन्हा एकदा अपडेट दिली आहे. या चित्रपटासाठी सर्जनशील कलाकार आणि डिझायनर्स यांच्यासह मिळून काही उपक्रम राबवण्याची घोषणा त्यानं केली आहे. या चित्रपटाच्या शीर्षकाचा लोगो त्याला डिझाईन करुन घ्यायचा आहे. यासाठी त्यानं एक व्हिडिओ पोस्ट केला आहे.
पोस्ट केलेल्या व्हिडिओतून त्यानं शीर्षक लोगो डिझाईन करण्याचं आवाहन कलाकारांना केलंय. लोकसहभागातून या चित्रपटाची निर्मिती व्हावी अशा प्रकारची तळमळ त्यांनी व्यक्त केली आहे. "नमस्कार, आपले आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांवर आम्ही चित्रपट काढतोय. त्या चित्रपटाचं शीर्षक आहे 'राजा शिवाजी'. आम्ही अजून या चित्रपटाच्या टायटल लोगो, टायटल फॉन्डच्या शोधात आहोत. आपल्या पैकी जर कोणी डिझायनर असेल, कुणी कॅलिग्राफी आर्टीस्ट असतील तरी कृपया या चित्रपटावरती आपण आपले डिझाइन्स तयार करावेत आणि खाली दिलेल्या ईमेल आयडीवरती पाठवून द्यावेत. ज्याचं डिझाईन यासाठी सिलेक्ट होईल त्यांना आम्ही योग्य श्रेय देऊ. हा चित्रपट आपला स्वतःचा आहे असं समजून कृपया डिझाईन करा, धन्यवाद!", असं रितेश व्हिडिओमध्ये म्हणाला. तुमच्या सर्व तपशीलांसह आम्हाला contact@mfco.in वर मेल करा, असंही त्यानं पोस्टच्या कॅप्शनमध्ये म्हटलंय.
छत्रपती शिवाजी महाराजांवर चित्रपट बनवण्याचं स्वप्न रितेश देशमुखनं खूप अगोदर पाहिलं आहे. कोविडच्या काळात या स्वप्न पाहाण्याचा थोडा ब्रेक लागला. त्यावेळी त्यानं छत्रपती शिवाजी महाराजांवर तीन भागामध्ये चित्रपट बनवण्याचं ठरवलं होतं. यासाठी नागराज मंजुळेंवर दिग्दर्शनाची जबाबदारीही सोपवली होती. परंतु गेली पाचवर्षे वेगवेगळ्या कारणांनी हा चित्रपट लांबणीवर पडला आहे. आता पुन्हा एकदा रितेशनं या चित्रपटाच्या निर्मितीसाठी कंबर कसली असल्याचं दिसत आहे. राजा शिवाजी या चित्रपटाची निर्मिती रितेश आणि जेनिलिया देशमुखच्या मुंबई फिल्म कंपनीच्या आणि जिओ स्टुडिओजच्या सहकार्यानं होणार आहे. हा आगामी चित्रपट रितेश देशमुख दिग्दर्शित करत आहे.
हेही वाचा -