मुंबई - चित्रपट दिग्दर्शक करण जोहरनं बॉलिवूडला अनेक रोमँटिक आणि कौटुंबिक चित्रपट दिले आहेत. आता करण हा संजय लीला भन्साळीप्रमाणे ऐतिहासिक चित्रपट बनवण्यास सज्ज झाला आहे. त्यानं २०२०मध्ये त्याचा आगामी चित्रपट 'तख्त'ची घोषणा केली होती. या चित्रपटामध्ये कुठले स्टार्स असणार, हे देखील ठरलं होतं. तसेच हा चित्रपट कधी प्रदर्शित होणार याबद्दल देखील सांगण्यात आलं होतं. मात्र या चित्रपटाचं काम अचानकपणे थांबलं. एका मुलाखतीत करण जोहरला 'तख्त' चित्रपट रद्द करण्याबद्दल विचारण्यात आलं होतं. याबद्दल त्यानं सांगितलं होतं, 'हे रद्द झालेले नाही, ते फक्त पुढे ढकलण्यात आले आहे. हा चित्रपट माझ्या टेबलावर आहे. मी हा चित्रपट एक दिवस नक्कीच बनवेन.'
करण जोहराचा तख्त चित्रपट : याशिवाय करणनं या चित्रपटाबद्दल आणखी पुढं सांगितलं की, 'या चित्रपटाची कहाणी आतापर्यंतची सर्वोत्तम असेल. ' या चित्रपटामध्ये रणवीर सिंग, आलिया भट्ट, जान्हवी कपूर, करीना कपूर खान, विक्की कौशल, आणि अनिल कपूर सारखे कलाकार दिसेल, असं सांगण्यात आलं होतं. हा चित्रपट २०२१ च्या ख्रिसमसमध्ये प्रदर्शित होणार होता. तसेच तो धर्मा प्रॉडक्शनच्या लाइनअपमधून अचानक गायब झाला. हा करण जोहरचा ड्रीम प्रोजेक्ट आहे, असं बोललं जात आहे. 'तख्त' चित्रपट मुघल सत्तेवर आधारित आहे. या चित्रपटाची कहाणी औरंगजेब आणि दारा शिकोह या दोन भावांच्या आयुष्यभोवती फिरणारी आहे. दोघांमध्ये सत्तेसाठी कोणत्या प्रकारची लढाई होते, हेच या चित्रपटात दाखविण्यात येणार आहे.
करण जोहरचं वर्कफ्रंट : करण जोहरनं 'तख्त' चित्रपटाचा एक टीझरही शेअर केला होता. यामध्ये रणवीर सिंगचा आवाज होता आणि भव्य सिंहासन दाखवण्यात आलं होतं. मात्र 'तख्त'च्या घोषणेनंतर करणनं २०२३ रोजी रोमँटिक कॉमेडी चित्रपट 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' हा चित्रपट प्रदर्शित केला. त्याचा हा चित्रपट प्रेक्षकांना खूप पसंत आला. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट ठरला. आता करण जोहर त्याच्या पुढील चित्रपटांसाठी काम करत आहे. या चित्रपटामध्ये धमाकेदार अॅक्शन प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. करण जोहरचा पुढचा चित्रपट 'नागझिला' आहे. यामध्ये प्रमुख भूमिकेत कार्तिक आर्यन दिसणार आहे. तसेच त्याचा 'धडक २' आणि 'तू मेरी मैं तेरा, मैं तेरा तू मेरी' हे चित्रपट देखील प्रदर्शित लवकरच होणार आहेत.
हेही वाचा :