मुंबई - पाणी म्हणजे जीवन. परंतु स्वातंत्र्यानंतर ७७ वर्षांनंतरही देशाच्या ग्रामीण भागात पाण्याचे दुर्भिक्ष्य असल्याचे दिसून येतं. अर्थात काही ठिकाणी तेथील लोक पाण्यासाठी लढा देताना दिसतात. अशाच प्रकारची कहाणी 'पायवाटाची सावली’ या चित्रपटातून लेखक आणि दिग्दर्शक मुन्नावर शमीम भगत घेऊन येत आहेत. या चित्रपटात विजे भाटिया, शाल्वी शाह, रेवती अय्यर, प्रसाद माळी आणि शीतल भोसले यांच्यासारख्या कलाकारांच्या भूमिका पाहायला मिळणार आहेत.
गावाकडच्या मातीत रुजलेली, संघर्षांची पावलं मांडणारी आणि एका लेखकाच्या भावविश्वातील गूढ गुंतवण मांडणारी ‘पायवाटाची सावली’ ही कलाकृती असून नुकतेच मुंबईत याचे ट्रेलर लॉन्च करण्यात आले. या कार्यक्रमाला अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभली होती. या चित्रपटाचे लेखन व दिग्दर्शन मुन्नावर शमीम भगत यांनी केले असून निर्मिती मीना शमीम फिल्म्सची आहे. सुप्रसिद्ध संगीतकार अनिल बिस्वास यांचे सुपुत्र अमित अनिल बिस्वास यांनी या चित्रपटासाठी संगीत दिले आहे. चित्रपटाचे वितरण ‘अकात डिस्ट्रीब्यूशन’चे चंद्रकांत विसपुते आणि समीर सक्सेना यांच्या माध्यमातून होणार आहे. तसेच समीर सक्सेना यांनी कार्यकारी निर्माता आणि सिंडिकेशनची जबाबदारीही सांभाळली आहे.
दिग्दर्शक मुन्नावर शमीम भगत म्हणाले की, “एका कोरडवाहू गावाची आणि त्या गावातील लोकांच्या पाण्यासाठी चाललेल्या झुंजीची ही गोष्ट आहे. याच धाग्यावर एका लेखकाच्या जीवनात आलेली मरगळ, नैराश्य आणि आत्मशोध यांचं वास्तव या चित्रपटात मांडलं आहे. ही कथा अनेकांच्या मनाला भिडेल, त्यांचं स्वतःचं प्रतिबिंब त्यांना या कथेच्या पात्रांमध्ये दिसेल.”
मीना शमीम फिल्म्स चा 'पायवाटाची सावली’ हा चित्रपट येत्या २३ मे रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.
हेही वाचा -