मुंबई - मराठमोळा दिग्दर्शक आदित्य सरपोतदार आणि अभिनेत्री शर्वरी वाघ यांच्या ‘मुंज्या’नं १०० कोटींहून अधिक कमाई केली. हा चित्रपट प्रेक्षकाना खूप पसंत आला होता. ‘मुंज्या’नुकताच एक वर्षाचा झाला आणि चाहते त्याच्या सीक्वेलची वाट बघत आहेत. ‘मुंज्या’च्या वर्षपूर्तीनिमित्त शर्वरीनं फॅन्स बरोबर गप्पा मारल्या. याशिवाय तिनं या चित्रपटामधील ‘तरस’ गाण्यावर सुंदर डान्स करून पुन्हा एकदा चाहत्यांची मनं जिंकली. शर्वरी एका डान्स वर्कशॉपमध्ये अचानकपणे पोहोचली, तेव्हा तेथे उपस्थित असलेल्या चाहत्यांना आनंदाचा धक्का बसला. तिथे सरावासाठी जमलेल्या चाहत्यांसाठी हा एक अविस्मरणीय क्षण ठरला. कुणी आनंदानं किंचाळलं, तर कुणाच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले. शर्वरीला पाहताच सगळ्यांनी तिच्याकडे ‘तरस’ गाण्याचा हुक स्टेप करण्याची विनंती केली. शर्वरीनं डान्स स्टेप्स लगेचच सादर करत वातावरणात उत्साह निर्माण केला. चाहत्यांबरोबर ती मनमुराद नाचली आणि त्या गाण्याच्या लोकप्रियतेची आठवण ताजी केली.
शर्वरी वाघनं केलं चाहत्यांना खुश : शर्वरीनं आपल्या भावना शेअर करत सांगितलं, “मुंज्या’ प्रदर्शित होऊन आता एक वर्ष झालं, यावर विश्वास बसत नाही. बेला सारखी भूमिका साकारणं माझ्यासाठी एक अनमोल अनुभव होता. पण ‘तरस’ गाण्याला जे प्रेम मिळालं, त्यानं मला खूपच भारावून टाकलं. एका नवोदित कलाकाराला इतकं मोठं गाणं, तेही शंकर-एहसान-लॉय यांच्यासारख्या दिग्गजांकडून, हे स्वप्नासारखं होतं. आणि दिनेश विजन यांसारख्या निर्मात्याच्या प्रॉडक्शनमधून काम मिळणं म्हणजे एकच भाग्य.” या यशामध्ये दिग्दर्शक आदित्य सरपोतदार यांचं मोलाचं योगदान असल्याचं ती वारंवार नमूद करत ती म्हणाली, "आदित्य सर हे फक्त एक उत्कृष्ट दिग्दर्शक नाहीत, तर कलाकारांचं आत्मविश्वासाने मार्गदर्शन करणारे शिक्षक आहेत. त्यांनी प्रत्येक सीनमध्ये सखोल विचार करून अभिनयाला दिशा दिली. त्यांनी ‘मुंज्या’सारख्या कल्पनारम्य कथेला प्रेक्षकांच्या हृदयाशी जोडून ठेवलं, याचं मला खूप आश्चर्य आणि कौतुक वाटतं.”


शर्वरी वाघनं भावना केल्या व्यक्त : शर्वरीनं पुढं चित्रपटाच्या खास गोष्टीही उलगडल्या, “लहानपणापासून मी मुंज्या या लोककथांबद्दल ऐकत आले आहे. जेव्हा स्क्रिप्ट हातात आली, तेव्हा त्यातली कल्पकता आणि तपशील पाहून मी थक्क झाले. भारतातला पहिले सीजीआय CGI पात्र – ‘मुंज्या’ – त्यासाठी कुठलाही आधीचा संदर्भ नव्हता. आम्ही फक्त कल्पनाशक्तीवर आधारित अभिनय केला.” शेवटी ती म्हणाली, “मी जेव्हा आज चाहत्यांमध्ये गेले, त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून मन भरून आलं. हेच क्षण मला सतत आठवण करून देतात की, सिनेमा म्हणजे फक्त अभिनय नाही, तर प्रेक्षकांशी असलेली नात्याची एक सुंदर अनुभूती आहे.”
हेही वाचा :
- आलिया भट्ट आणि शर्वरी वाघ स्टारर 'अल्फा'चं शूटिंग काश्मीरमध्ये सुरू, फोटो व्हायरल - alia and sharvari pic viral
- जॉन अब्राहम आणि शर्वरी वाघ अभिनित 'वेदा' चित्रपटाचा ट्रेलर 'या' तारखेला होईल रिलीज - vedaa trailer release date
- आलिया भट्ट आणि शर्वरी वाघ स्टारर 'अल्फा'चं शूटिंग सुरू, पोस्ट व्हायरल - sharvari wagh and alia bhatt