मुंबई : अभिनेता कमल हासन यांच्या कर्नाटक भाषेवरील विधानावरून सुरू असलेला गोंधळ थांबण्याचे नाव घेत नाही. अलीकडेच कर्नाटक उच्च न्यायालयानं त्यांना माफी मागण्यास सांगितलं होतं, मात्र आता अभिनेत्यानं माफी न मागता निवेदन दिलं आहे. कर्नाटक फिल्म चेंबर ऑफ कॉमर्स (KFCC) चे अध्यक्ष नरसिम्हालू यांना लिहिलेल्या पत्रात त्यांनी म्हटलं आहे की, कन्नड भाषेबद्दलच्या त्यांच्या विधानाचा गैरसमज झाला आहे आणि चुकीचा अर्थ लावला गेला आहे. 'ठग लाईफ'च्या ऑडिओ लॉन्चवेळी 'कन्नडचा जन्म तमिळ भाषेतून झाला' या त्यांच्या विधानामुळे कर्नाटकात गोंधळ उडाला. यामुळे केएफसीसीनं कर्नाटकात मणिरत्नम दिग्दर्शित चित्रपटावर बंदी घातली.
कमल हासन यांनी व्यक्त केल्या भावना : चित्रपटावर बंदी घालण्यात आल्यानंतर अभिनेत्यानं कर्नाटक उच्च न्यायालयात धाव घेतली. मंगळवारी सकाळी या प्रकरणाची सुनावणी झाली आणि त्यांनी हासन यांना माफी मागण्यास सांगितलं. या प्रकरणाची सुनावणी आज दुपारी २.३० वाजेपर्यंत स्थगित करण्यात आली होती. दरम्यान, हासन यांनी केएफसीसी अध्यक्षांना लिहिलेले पत्र माध्यमांबरोबर शेअर केले आहेत. माफी न मागता, अभिनेत्यानं लिहिलं की त्यांच्या विधानाचा चुकीचा अर्थ लावण्यात आला आहे. 'ठग लाईफ' ऑडिओ लॉन्चमधील माझे विधान - जे महान डॉ. राजकुमार यांच्या कुटुंबाबद्दल, विशेषतः शिव राजकुमार यांच्या कुटुंबाबद्दलच्या प्रेमामुळे होते - आता याला चुकीचे समजले गेले आहे याबद्दल मला दुःख आहे. माझे शब्द फक्त हे सांगण्यासाठी होते की, आपण सर्व एक आहोत आणि एकाच कुटुंबाचे आहोत आणि कोणीही कन्नडला कमी लेखू नये. तमिळप्रमाणेच, कन्नड भाषेचीही एक गौरवशाली परंपरा आहे, ज्याची मी नेहमीच प्रशंसा करतो.'


कन्नड लोकांबद्दल माझे प्रेम : यानंतर त्यांनी पुढं लिहिलं, 'कन्नड लोकांबद्दलचे माझे प्रेम नेहमीच खरे राहिले आहे. माझ्या कारकिर्दीत, मी कन्नड लोकांनी मला दिलेल्या प्रेमाची कदर केली आहे आणि माझे त्यांच्यावरील प्रेम खरे आहे. तमिळ, कन्नड, तेलुगू, मल्याळम आणि या देशातील सर्व भाषांशी माझे नाते कायमचे आणि मनापासून आहे. मी नेहमीच सर्व भारतीय भाषांच्या समान प्रतिष्ठेसाठी उभा राहिलो आहे. कोणत्याही एका भाषेच्या दुसऱ्या भाषेवर वर्चस्वाच्या विरोधात मी आहे, कारण अशा गोष्टी भारताच्या सांस्कृतिक रचनेला कमकुवत करतात. चित्रपट ही देखील आपल्या सर्वांना जोडणारी भाषा आहे. कमल हासन यांनी कन्नड अभिनेता शिव राजकुमार, ज्यांना ते त्यांचा मुलगा मानतात, त्यांच्या विधानामुळे वादात ओढले गेल्याबद्दल खंत व्यक्त केली. ते म्हणाले, 'या प्रेम आणि बंधनामुळेच शिवन्ना ऑडिओ लॉन्च कार्यक्रमाला उपस्थित राहिले. शिवन्ना यांना यामुळे इतक्या लाजिरवाण्या अनुभवातून जावे लागले याबद्दल मला खरोखर वाईट वाटते. परंतु मला खात्री आहे की आमचे एकमेकांबद्दलचे खरे प्रेम आणि आदर नेहमीच राहील आणि आता अधिक मजबूत राहिल. अभिनेत्यानं पुन्हा एकदा सांगितलं की त्यांचे विधान कधीही कन्नड लोकांच्या भावना दुखावण्यासाठी किंवा वैर निर्माण करण्यासाठी नव्हते. ते म्हणाले, 'चित्रपट हा लोकांमधील पूल राहिला पाहिजे, कधीही त्यांना विभाजित करणारी भिंत नाही.'
हेही वाचा :