मुंबई - साऊथ स्टार अजित कुमार याचा 'गुड बॅड अग्ली' चित्रपट १० एप्रिल रोजी रिलीज झाला. या चित्रपटाला प्रेक्षकांनी उत्तम प्रतिसाद दिला आहे. चित्रपटाला उत्तम यश मिळत असतानाच ज्येष्ठ संगीतकार इलैय्याराजा यांनी 'गुड बॅड अग्ली' चित्रपटाच्या प्रॉडक्शन हाऊसला नोटीस पाठवली आहे. या बातमीनं तमिळ फिल्म इंडस्ट्रीमध्ये खळबळ उडाली आहे.
आदिक रविचंद्रन यानं दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटात अजित कुमारसह त्रिशा, अर्जुन दास, प्रसन्ना, प्रभू, योगी बाबू, सुनील असे अनेक लोकप्रिय कलाकार आहेत. या चित्रपटासाठी संगीत जी.व्ही. प्रकाश कुमार यांनी दिलं आहे. प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या या चित्रपटाची निर्मिती अतिशय गाजलेला बॅनर मैथ्री मुव्ही मेकर्सनं केली आहे. देशभर या चित्रपटाला प्रेक्षकांच्या भरभरुन प्रतिसाद मिळत आहे.
अजित कुमारचा 'गुड बॅड अग्ली' हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करत आहे. चित्रपट प्रदर्शित होऊन ५ दिवस झाले आहेत आणि या ५ दिवसामध्ये चित्रपटानं जगभरात १५० कोटी रुपये कमावलं आहेत. मात्र सध्या हा चित्रपट वेगळ्या कारणानंच चर्चेत आला आहे.
संगीतकार इलैय्याराजा यांनी मैत्री मूव्ही मेकर्स या चित्रपटाच्या निर्मिती कंपनीला गाण्याच्या हक्कांचं उल्लंघन केल्याबद्दल नोटीस पाठवली आहे. त्यांची गाणी परवानगीशिवाय चित्रपटात वापरली गेली असल्याचा आरोप नोटीसमध्ये करण्यात आला आहे. त्यांच्या परवानगीशिवाय काही गाणी 'गुड बॅड अग्ली' चित्रपटात वापरली गेली असल्याचा आरोप त्यांनी यामध्ये केला आहे. 'नट्टुपुरा पट्टू' चित्रपटातील 'ओथा रूपयुम थारे' हे गाणं, तसेच 'विक्रम'मधील 'एन जोडी मांजा कुरुवी' आणि 'सकाळकाला वल्लवन' चित्रपटातील 'इलामाई इथो इथो' या गाण्यासह अनेक रेट्रो गाणी 'गुड बॅड अग्ली' चित्रपटात वापरण्यात आली आहेत. वरील तिन्ही गाणी इलैय्याराजा यांनी संगीतबद्ध केली आहेत.
संगीतकार इलैय्याराजा यांनी त्यांच्या वकिलामार्फत 'गुड बॅड अग्ली'च्या प्रॉडक्शन हाऊसला नोटीस पाठवली आहे. नोटीसमध्ये त्यांनी परवानगीशिवाय तीन गाणी वापरल्याबद्दल ५ कोटी रुपयांची भरपाई मागितली आहे. त्या तीन गाण्यांचे प्रदर्शन तात्काळ थांबवावं असंही त्यांनी म्हटलंय. या प्रकरणी प्रॉडक्शन हाऊसनं बिनशर्त लेखी माफी मागावी अशी मागणीही त्यांनी केली आहे. नोटीस जारी केल्यापासून सात दिवसांच्या आत जर या अटी पूर्ण केल्या नाहीत तर हे प्रकरण न्यायालयात पोहोचेल आणि त्याविरुद्ध कायदेशीर कारवाई केली जाईल, असंही या नोटीसमध्ये पुढं म्हटलं आहे.
हेही वाचा -