मुंबई - शक्यतो १ हिरो आणि २ हिरॉईन, अथवा २ हिरो आणि १ हिरॉईन असलेली कथानकं चित्रपटांतून पाहायला मिळतात. परंतु आता एक मराठी चित्रपट येत असून त्यात एक, दोन नव्हे तर चक्क सहा हिरो एका हिरॉईनबरोबर दिसणार आहेत. सध्या मराठी सिनेसृष्टीत वेगळ्या आणि विचारप्रवृत्त कथांनी प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. याच धाटणीतील एक वेगळा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे, तो म्हणजे ‘मना’चे श्लोक’. या चित्रपटात मृण्मयी देशपांडेबरोबर राहुल पेठे, पुष्कराज चिरपुटकर, सुव्रत जोशी, सिद्धार्थ मेनन, हरीश दुधाडे आणि करण परब हे सहा हिरो दिसणार आहेत.
‘मना’चे श्लोक’ मराठी चित्रपटाची घोषणा : या सिनेमाचा एक व्हिडिओ नुकताच सोशल मीडियावर प्रसिद्ध झाला असून, त्यात दिसणाऱ्या वेगळ्या रंगांच्या दरवाज्यांनी उत्सुकता वाढवली आहे. एक दरवाजा निळसर तर दुसरा लालसर रंगाचा आहे, जे मानवी मनातील द्वंद्व आणि गुंतागुंत दर्शवतो. गणराज स्टुडिओ आणि संजय दावरा एक्सपरिअन्स निर्मित, नितीन वैद्य प्रॉडक्शन्स प्रस्तुत या चित्रपटाचं लेखन आणि दिग्दर्शन मृण्मयी देशपांडेनं केलं आहे. एका अभिनेत्रीभोवती सहा पुरुष पात्रांची कथा गुंफलेली असेल का, हे चित्रपट पाहिल्यानंतरच स्पष्ट होईल. पण या अभिनेत्यांच्या उपस्थितीमुळे चित्रपटाच्या कथानकाबद्दल प्रेक्षकांमध्ये तर्कवितर्क सुरु आहेत. एकंदरीत, ‘मना'चे श्लोक’ हा चित्रपट मनाच्या कोपऱ्यात खोलवर दडलेल्या भावना मांडणारा असून, सहा अभिनेत्यांबरोबर मृण्मयीचा अभिनय आणि दिग्दर्शन प्रेक्षकांना नव्या अनुभवाची सफर घडवून आणेल अशी आशा निर्मात्यांनी व्यक्त केली.
चित्रपटात दिसणार सहा हिरो : मृण्मयी देशपांडेनं ‘मन फकीरा’ हा पहिला दिग्दर्शित केलेला चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला होता. त्यानंतर ती पुन्हा एकदा लेखिका-दिग्दर्शिका म्हणून नव्या संकल्पनेबरोबर सिनेरसिकांच्या सामोरी जात आहे. या सिनेमासाठी निर्माता म्हणून संजय दावरा मराठी चित्रपटविश्वात पदार्पण करीत आहेत. त्यांच्याबरोबर ‘बाबू बँड बाजा’ फेम श्रेयश जाधव आणि ‘नाळ’ सारखा हृदयस्पर्शी चित्रपट देणारे नितीन वैद्य हे देखील सहभागी आहेत. मृण्मयी देशपांडेनं या चित्रपटाबद्दल म्हटलं की, "माझ्या मनात अनेक वर्षांपासून रेंगाळणारा विषय मी मोठ्या पडद्यावर मांडला आहे. या चित्रपटात माझ्याबरोबर सहा उत्तम अभिनेते आहेत. सर्वांनी अप्रतिम काम केलंय आणि आमचं चांगलं टीमवर्क दिसून येईल.” निर्माते संजय दावरा म्हटलं, “मृण्मयीबरोबर काम करताना एक वेगळाच अनुभव मिळाला. ‘मना'चे श्लोक’ ही कल्पना खूप विचारपूर्वक मांडण्यात आली आहे.”
मना'चे श्लोक कधी होणार प्रदर्शित : श्रेयश जाधवनं चित्रपटाबद्दल सांगितलं, “मृण्मयीच्या दिग्दर्शन शैलीमध्ये एक वेगळी आत्मीयता आहे. तिच्या कथांमध्ये असणारी सच्चाई प्रेक्षकांना नेहमी आकर्षित करत आली आहे. ‘मना'चे श्लोक’ देखील त्याच पद्धतीनं हृदयाला भिडणारा चित्रपट ठरेल.” प्रस्तुतकर्ता नितीन वैद्य म्हणाले, “मृण्मयी ही माझी चांगली मैत्रीण असून, एक गुणी कलाकार आणि संवेदनशील दिग्दर्शिका आहे. तिच्या कलेवर माझा पूर्ण विश्वास आहे, म्हणूनच या प्रोजेक्टचा भाग व्हायला मला आनंद आहे.” दरम्यान मृण्मयी देशपांडे अभिनित आणि दिग्दर्शित 'मना'चे श्लोक’ हा चित्रपट १ ऑगस्ट २०२५ रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.