मुंबई - नवविवाहित मुलीच्या मनात अनेक भावनांचे तरंग उठत असतात, आनंद, संकोच, उत्सुकता आणि थोडंसं काळजीचं गूढ. नव्या घरात, नव्या माणसांमध्ये आपली जागा शोधताना तिच्या मनात स्वप्नांची गुंफण सुरू असते. ती आपल्या नव्या आयुष्याच्या सुरुवातीला आशा, प्रेम आणि विश्वास याची अपेक्षा करीत असते. आपल्या पतीच्या प्रेमासाठी आसुसलेली नवविवाहिता थोडीशी गोंधळलेलीही असते. अश्याच प्रकारच्या भावना ‘सजना’ या आगामी चित्रपटातील एक सुरेल आणि हृदयस्पर्शी गीत 'रात सजनाची' यातून अभिव्यक्त होतात.
‘सजना’ चित्रपटामधील गाणं रिलीज : शशिकांत धोत्रे यांच्या कल्पनाशक्तीतून साकार झालेल्या या चित्रपटातील हे गाणं नवविवाहित स्त्रीच्या मनात उमटणाऱ्या भावनांचे कोमल चित्रण करतं. नव्या नात्याची पहिली रात्र, तिचं स्वप्नमय विश्व आणि त्यात गोडसं विलीन होण्यासाठी असलेलं आसूसलेपण, या सगळ्याला शब्द आणि सुरांनी गुंफलेलं हे गीत प्रेमाच्या गहिऱ्या अनुभूतीला स्पर्श करतं.
‘सजना’ चित्रपटाबद्दल : मराठमोळ्या विवाहसोहळ्याच्या पार्श्वभूमीवर चित्रित झालेल्या या गीतात परंपरा आणि भावना यांचा सुरेख मिलाफ पाहायला मिळतो. प्रियांका बर्वे आणि ओंकारस्वरूप यांच्या मधुर आवाजात हे गीत हृदयाच्या तारा छेडतं. सुहास मुंडे यांचे भावस्पर्शी शब्द आणि ओंकारस्वरूप यांचे भावस्पर्शी सूर यामुळे गाण्याला एक खास सौंदर्य प्राप्त झालं आहे. हे गीत भुंगा म्युझिकनं प्रकाशित केलं आहे. प्रेमातल्या हळुवार क्षणांना आणि मनाच्या गूढ भावना उमटवणाऱ्या ‘सजना’ चित्रपटाची निर्मिती, दिग्दर्शन आणि लेखन यांची जबाबदारी शशिकांत धोत्रे यांनी पार पाडली आहे. प्रेमाच्या विविध छटांचा अनोखा प्रवास दाखवणारा हा चित्रपट २७ जून २०२५ रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. आता हा चित्रपट पाहण्यासाठी अनेकजण आतुर आहेत. या चित्रपटामधील 'रात सजनाची' हे आता रसिकांना खूप पसंत पडत आहे. तसेच या चित्रपटामध्ये एका गरीब, मोठ्या कुटुंबाच्या संघर्षाची आणि प्रेमाच्या नाजूक प्रवासाची हृदयस्पर्शी कहाणी मांडण्यात आली आहे. तसेच या चित्रपटात तृप्ती मोरे आणि आकाश सर्वगोड यांच्या मुख्य भूमिका आहेत.
हेही वाचा :