मुंबई - सध्या ओटीटी प्लेटफॉर्मवर अनेक मराठी वेब सीरीज येत आहेत. आता लवकरच एक हॉरर वेब सीरीज चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. या वेब सीरीजचं नाव 'अंधार माया' असं आहे. 'अंधार माया' वेब सीरीजचं ट्रेलर सोशल मीडियावर प्रदर्शित करण्यात आलं आहे. या सीरीजचं ट्रेलर खूपच भीतीदायक आहे. दरम्यान हॉरर सीरिजचे दिग्दर्शन भीमराव मुडे यांनी केलं आहे. याशिवाय शर्मिष्ठा राऊत आणि तेजस देसाईनं सीरिजची निर्मिती केली आहे. या सीरीजचा ट्रेलर शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिलं गेलं आहे, 'सापळ्यात अडकत जाणार, भटकत जाणार, प्रश्न पडत जाणार, एका मागोमाग एक गोष्टी घडत जाणार...' आता या पोस्टवर अनेकजण आपल्या प्रतिक्रिया देत आहेत.
यूजर्सनं केलं 'अंधार माया'च्या ट्रेलरचं कौतुक : 'अंधार माया' या सीरीजच्या ट्रेलरचं यूजर्स कौतुक करत आहेत. एका यूजरनं या पोस्टवर लिहिलं, 'अनेक दिवसांनी अशी गोष्ट पाहायला मिळणार.' दुसऱ्या एकानं यावर लिहिलं, 'बाहेर रात्रीचा धो धो पडणार पाऊस आणि लॅपटॉपवर ही सीरीज, कहर.' आणखी एकानं या पोस्टवर लिहिलं, 'अंधार माया...' कधीच विचार केला नव्हता, असं काही तरी मराठीत येईल.' याशिवाय अनेकजण या पोस्टवर फायर इमोजी शेअर करून ट्रेलरला भरभरून प्रेम देत आहेत.
'अंधार माया'चा ट्रेलर : 'अंधार माया'च्या ट्रेलरमध्ये कोकणात एक कुटुंब अंतिम विधी कार्यासाठी पूर्वजांच्या वाड्यात एकत्र येत असतात. यानंतर एक भयानक खेळ सुरू होतो. कोकणातील या वाड्यामध्ये काही विचित्र गोष्टी घडतात. आता या वाड्यामध्ये काय रहस्य दडलं आहे आणि या सीरीजचा शेवट कसा असणार हे काही दिवसात समजेल. 'अंधार माया' वेब सीरीज झी५वर ३० मे रोजी प्रदर्शित होणार आहे. दरम्यान ' या सीरीजमध्ये ओमप्रकाश शिंदे, स्वप्नाली पाटील, ऋतुजा बागवे, किशोर कदम, अनुप बेलवलकर, शुभंकर तावडे हे कलाकार दिसणार आहेत. आता या सीरीजच्या रिलीजची अनेकजण आता वाट पाहात आहेत.