मुंबई : प्रसिद्ध स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरानं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर एक गाणं तयार केलं होतं. हे गाणं सोशल मीडियावर धुमाकूळ घालत होतं. कुणालनं 'दिल तो पागल है' चित्रपटामधील 'भोली सी सुरत' या गाण्याच्या चालीवर एकनाथ शिंदे यांच्यावर थेट निशाणा साधला होता. या गाण्यात शिंदे यांचा थेट नामोल्लेख न करता 'गद्दार' देखील म्हणण्यात आलं होतं. या गाण्यामुळे महाराष्ट्रामध्ये बराच वाद सुरू झाला आहे. कुणाल कामरानं माफी मागावी अशी मागणी महायुतीचे नेते आणि कार्यकर्ते आक्रमकपणे करत आहेत. हे गाणं व्हायरल झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि स्वत: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील प्रतिकिया दिली होती.
सुशांत शेलारनं केली कुणाल कामरावर टीका : आता आणखी मराठी अभिनेत्यानं कुणाल कामरावर बाण चालवला आहे. मराठी अभिनेता सुशांत शेलारनं याप्रकरणी कुणालला चांगलेच खडेबोल सुनावले आहेत. सुशांतने आपल्या अधिकृत इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओला त्यानं कॅप्शन दिलं आहे की, 'कुणाल कामरा, तू तुझ्या लायकीत राहा.' व्हिडिओत सुशांतनं म्हटलं, "कुणाल कामरानं, जे काही कविता करण्याचा प्रयत्न केला आणि कलाकार म्हणून अभिव्यक्तीच्या स्वातंत्र्याच्या नावाखाली जे काही गुण उधळले आहेत, याविषयी मी आधी निषेध करतो. तू एक कलाकार आहेस तर, तू एक कलाकारप्रमाणे वाग. टीका किंवा कवित्व करायची तुझी लायकी नाही.'
कुणाल कामरा मिळाली धमकी : यानंतर सुशांत पुढं व्हिडिओमध्ये म्हणतो, "अशा व्यक्तीवर कविता करणं, ज्यानं महाराष्ट्राच्या जनतेसाठी आयुष्यभर इतकं काम केलं आहे. ज्यांना 'अनाथांचा नाथ' म्हणून ओळखलं जातं. त्याच्यातील एक टक्का काय, एक अंशसुद्धा तुझ्यात नाही. याशिवाय तुझ्यात तेवढी पात्रताही नाही. मी तुला वॉर्निंग देतो की, तू ही जी कविता केली आहे, याबद्दल चोवीस तासांत माफी माग. तुझ्या तोंडाला काही काळ फासणार नाही. पण तू जिथे असशील तिथे तुला शिवसेना स्टाइलनं फटकावलं जाईल. तू जे महाराष्ट्रात कार्यक्रम करत असतो, ते कुठेही होऊ देणार नाही. त्याचबरोबर मी काही स्टुडिओजनाही वार्निंग देतो की, तुम्ही त्याला कार्यक्रमासाठी स्टुडिओ दिलात आणि नंतर काही नुकसान झालं तर आम्ही त्याला जबाबदार राहणार नाही. पुन्हा एकदा कुणाल कामरा स्वत:च्या लायकीत राहा. अभिव्यक्तीच्या नावाखाली कविता करणं बंद कर, नाही तर तुझं काही खरं नाही." तसेच कुणाल कामरान दी हॅबिटॅटमध्ये शो केला होता, त्याठिकाणी शिवसेना कार्यकर्त्यांनी तोडफोड केली होती. दरम्यान याप्रकरणी कुणाल कामरा देखील माफी मागणार असं त्यानं एक पोस्टद्वारे सांगितलं आहे.
👀👀👀 pic.twitter.com/C5Bnn81p5E
— Kunal Kamra (@kunalkamra88) March 25, 2025
सुशांत शेलार झाला ट्रोल : दरम्यान सुशांत शेलारच्या व्हिडिओवर अनेकजण आपल्या प्रतिक्रिया देत आहेत. अनेकजण या मराठी अभिनेत्याला ट्रोल करत आहेत. एका यूजरनं या व्हिडिओच्या पोस्टमध्ये लिहिलं, 'आधी जेवण कर मग धमकी दे.' दुसऱ्या एकानं लिहिलं, 'महाराजांचा अपमान झाला तेव्हा कुठल्या बिळात लपला होता?' आणखी एकानं लिहिलं, 'सर त्याला मराठी कळत नाही, एवढं सगळं एका दमात हिंदीत बोला.' या पोस्टवर अनेक यूजर्स सुशांतची खिल्ली उडवत आहेत.
हेही वाचा :