मुंबई - मराठी चित्रपटात यश मिळवून स्टार बनलेले कलाकार हिंदी चित्रपटांमध्ये संधी मिळावी म्हणून आशावादी असतात. परिणामी बरेच मराठी कलाकार हिंदीमध्ये लहानसहान भूमिका साकारताना दिसतात. परंतु आता मराठी चित्रपटसृष्टीतील प्रमुख कलाकार प्रथमेश परब हिंदी चित्रपटातही नायक बनला आहे. मराठीत अनेक गाजलेल्या चित्रपटांमधून प्रमुख भूमिका साकारत आपली छाप पाडणाऱ्या प्रथमेशची ही नवी झेप त्याच्या फॅन्ससाठी उत्साहवर्धक ठरणार आहे.
मराठी अभिनेता प्रथमेश परबला मिळली मोठी संधी : हिंदी सिनेमात नायकाच्या भूमिकेत प्रथमेश परब झळकणार असून चित्रपटाचे नाव आहे 'पोडर'. गुलमोहर टॉकीज या निर्मिती संस्थेअंतर्गत समीर शेख या चित्रपटाची निर्मिती करत आहेत आणि आदित्य केळगावकर दिग्दर्शनाची धुरा सांभाळत आहेत. या आगामी हिंदी चित्रपटातून प्रथमेशची ही नवी इनिंग सुरू होत असून, या चित्रपटात तो मुख्य भूमिका साकारणार आहे. प्रथमेश परबच्या चाहत्यांसाठी ही एक अत्यंत आनंदाची बातमी आहे. विनोदी, भावनिक आणि गंभीर अशा विविध भूमिका लीलया पेलणाऱ्या या गुणी अभिनेत्याला आता हिंदी प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण करण्याची ही मोठी संधी आहे. ‘पोडर’मधून तो काय धमाल उडवतो, याची उत्सुकता साऱ्यांनाच लागून राहिली आहे!
प्रथमेश परबनं हिंदी चित्रपटसृष्टीत केल्या आहेत सहायक भूमिका : यापूर्वी प्रथमेशनं हिंदी चित्रपटांमध्ये काही महत्त्वाच्या सहायक भूमिका साकारल्या होत्या. मात्र आता प्रथमच त्याला हिंदी सिनेमात प्रमुख नायक म्हणून पाहायला मिळणार आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये झालेल्या एका साध्या पण उत्साही सोहळ्यात, गणेश पूजन करून प्रथमेशच्या हस्ते चित्रपटाच्या क्लॅपनं ‘पोडर’च्या शूटिंगला सुरुवात झाली. चित्रपटाचं चित्रीकरण सध्या छत्रपती संभाजीनगरच्या विविध आकर्षक लोकेशन्सवर सुरू आहे. या चित्रपटात रजत कपूर, राजसी भावे, आणि दुर्गेश कुमार हे प्रतिभावान कलाकारही झळकणार आहेत. संदीप यादव हे या चित्रपटासाठी छायाचित्रण करत असून, त्यांच्या अनुभवानं सिनेमॅटोग्राफी अधिक उठावदार होणार आहे. आता या चित्रपटाच्या रिलीजची वाट प्रथमेश चाहते पाहात आहेत.
हेही वाचा :