मुंबई : पाच वर्षांपूर्वी 2020 च्या जून महिन्यात बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूत याच्या आत्महत्येच्या बातमीमुळं खळबळ माजली होती. आता 2025 च्या जून महिन्यात अभिनेता-दिग्दर्शक तुषार घाडीगावकर यांनी डिप्रेशनमुळं आत्महत्या केली. तुषार घाडीगावकर यांनी 20 जूनला कामाच्या अपुऱ्या संधी आणि मानसिक दबावामुळं आपलं जीवन संपवलं असल्याची बातमी आहे.
अंकुर वाढवे यांच्या सोशल मीडिया पोस्टमुळं समजली बातमी : 'चला हवा येऊ द्या' फेम अभिनेता अंकुर वाढवे यांच्या सोशल मीडियावरील पोस्टमुळं तुषार घाडीगावकर यांच्या मृत्यूबाबत सर्वांना माहिती समजली. अंकुर वाढवे यांनी इन्स्टाग्रामवर भावनिक पोस्ट केली, “मित्रा का? कशासाठी? कामं येतात जातात. आत्महत्या हा मार्ग नाही. तुझा नाश म्हणजे आपण सगळे हरलो." तुषार घाडीगावकर यांच्या मृत्यूनंतर मराठी मनोरंजन विश्वात शोककळा पसरली आहे. ही घटना मनोरंजन क्षेत्रातील मानसिक ताण-तणावाची गंभीर समस्या अधोरेखित करते. कलाकारांकडं सतत कामाची उपलब्धता नसल्यामुळं ते अनेकदा नैराश्यात अडकतात. आगामी काळात त्यांच्याकडं बॅलन्स्ड मानसिक आरोग्यसेवा उपलब्ध करणं अत्यंत आवश्यक ठरलं आहे.
नाटक, मालिक आणि चित्रपटात केला होता अभिनय : तुषार घाडीगावकर हे मूळचे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली इथले. त्यांनी रुपारेल कॉलेजच्या नाट्य विभागात काम केलं होतं. कॉलेजनंतर त्यांनी नाटक, मालिका आणि चित्रपट अशा विविध माध्यमातून अभिनयाचा प्रवास सुरू केला. तुषार यांनी अनेक मराठी मालिका आणि चित्रपटांमध्ये काम केलय. 'तुमची मुलगी काय करते', 'लवंगी मिरची', 'सखा माझा पांडुरंग' यासारख्या मालिकांमध्ये त्यांनी काम केलं होतं. मराठी चित्रपट 'मन कस्तुरी रे', 'भाऊबळी', 'झोंबिवली' सारख्या चित्रपटात त्यांनी भूमिका साकारल्या होत्या.
कामाच्या अभावामुळं नैराश्याच्या अंधारात : घंटा नाद प्रॉडक्शनच्या माध्यमातून तुषार घाडीगावकर यांनी अनेक मालिका आणि लघुपटांचं दिग्दर्शन केलं होतं. आमचा मोरया रे, सारलेला क्षण, भाऊचा धक्का, माझ्या गजानना, बाप्पा, खत आया है या संगीत ध्वनिफिती तसंच चित्रपटासाठी त्यांनी दिग्दर्शक म्हणून काम पाहिलं होतं. 'तुझी माझी यारी' या मालिकेचं दिग्दर्शनही त्यांनीच केलं होतं. काही काळापासून तुषार घाडीगावकर कामाच्या अभावामुळं नैराश्याच्या अंधारात होते. नैराश्याला बळी पडत त्यांनी टोकाचं पाऊल उचलत आपली जीवन यात्रा संपवली.
हेही वाचा :